>> वाहतूक तीन दिवस बंद, रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलला
मुसळधार पावसामुळे मालपे रेल्वे स्थानकापासून सातशे मीटर अंतरावर असलेल्या मालपे – खाजने पेडणे येथे कोकण रेल्वे मार्गावरली बोगद्याचा भाग रात्री ३.३० च्या दरम्यान कोसळला. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या दरम्यान रेल्वे वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
बोगदा सुरू होतो तेथून तीनशे मीटरच्या अंतरावर मुंबईकडे जाणार्या मार्गाचा उजवीकडील सुमारे चार मीटर बोगद्याच्या भिंतीचा भाग कोसळून रेल्वे मार्गावर माती दगड पडले. तर काही भाग हा कोसळण्याच्या स्थितीत होता.
मालपे रेल्वे स्थानकापासून पुढे असलेला हा बोगदा दीड किमी लांब असून तो खाजने गावात बाहेर पडतो. गेले तीन चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या बाजूच्या भागात पाणी खेचले गेले. तसेच डोंगराळ भागातील पाणी शिरल्याने बोगद्याचा भाग कोसळला.
तीन दिवस रेल्वे बंद
सध्या माती काढण्यासाठी काल दुपारी रेल्वेकडून जेसीबी यंत्र आणण्यात आले. त्यापूर्वी सुमारे तीस मजुरांच्या मदतीने काही प्रमाणात माती बाजूला काढण्यात आली. बोगद्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू असून किमान तीन दिवस तरी हे काम पूर्ण करण्यासाठी लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी बबन गाडगीळ यांनी दिली.
मालपे येथील बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करून ती पनवेल, पुणे, मिरज, मडगाव अशी वळविण्यात आल्याची माहिती श्री. गाडगीळ यांनी सांगितले. बोगद्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
कोकण रेल्वेच्या मार्गात बदल
मडुरे व मारपे-पेडणे रेल्वेमार्गावर बोगदे कोसळल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्या रेल्वेगाड्या लोंढा-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे गाडी क्र. ०२६१७ ही एर्नाकुलम निजामुद्दीन सुपर फास्ट जलद गाडी मडगाव रेल्वेस्थानकावरून लोंढा, मिरज, पुणे, पनवेल, कल्याणमार्गे वळविली. गाडी क्रमांक ०६३४६ तिरुअनंतपूरम लोकमान्य टिळक मडगाव येथून लोंढा ते मिरज, पुणे, पनवेलमार्गे, ०२४३२ नवी दिल्ली ते तिरुअनंतपूरम राजधानी स्पेशल गाडी पनवेल, पुणे, मिरज, लोंढा, मडगाव वळविली.
क्रमांक ०६३४५ लोकमान्य टिळक ते तिरुअनंतपूरम सेंट्रल पनवेल, पुणे मिरज, लोंढा ते मडगाव मार्गे वळविण्यात आली. पेडणे येथे माती उपसून मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. काल केसरलॉक ते करंजाळे अशा मार्गावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक अडकून राहिली. दिल्ली येथून मडगाव येथे येणारी गाडी केसरलॉक रेल्वे स्थानकावर ठेवून जेवणासाठीची व्यवस्था केली व रेल्वेतील प्रवाशांना बसने गोव्यात आणण्यात आले.