राज्यात पावसाची उसंत

0
150

राज्याला मागील तीन दिवस झोडपून काढणार्‍या मुसळधार पावसाचे प्रमाण काल कमी झाले. मागील तीन दिवसांत १०.५४ इंच तर राज्यात आत्तापर्यंत १०४.३६ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मागील चोवीस तासांत २.४८ इंच पावसाची नोंद झाली असून पेडणे येथे सर्वाधिक ५.९० इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात ४८ तासांत १५.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पावसाचे एकूण प्रमाण २३ टक्के जास्त आहे. पावसाचे प्रमाण उत्तर गोव्यात २६ टक्के आणि दक्षिण गोव्यात २१ टक्के एवढे जास्त आहे.

राज्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेती, बागायती, घरे, वीज यंत्रसामग्री, बांधकामे कोसळणे व इतर प्रकाराचे नुकसान झाले आहे. जोरदार वारा व पावसाने एकाचा बळीही घेतला आहे. यंदाच्या पावसाळी मोसमातील मागील ६७ दिवसांपैकी ३५ दिवस निर्धारीत अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. राज्यात १७ जूनला सर्वाधिक ५.४९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

साखळी येथे ४.३३ इंच, काणकोण येथे ३.१७ इंच, म्हापसा येथे १.५३ इंच, ओल्ड गोवा येथे १.२३ इंच, वाळपई येथे २,६८ इंच, सांगे येथे २.४८ इंच, केपे येथे १.८९ इंच, पणजी ०.६२ इंच, मुरगाव येथे ०.६९ इंच पावसाची नोंद झाली आहे.