लोटली खून प्रकरण
कारवट्टा लोटली येथील लुईस पावलू बाप्तीस्ता (२२) याच्या खून प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी गुलबर्गा कर्नाटक येथील संतोष सुभाष पुजारी (२५) याला अटक केली. त्याने कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.
शनिवारी सकाळी घरापासून १०० मीटर अंतरावर लुईस बाप्तीस्ताचा मृतदेह सापडला. त्यात चेहरा व अंगावर तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या खुणा होत्या. लगेच त्याचे काका व्हिसेन्त बाप्तीसा यांनी मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदविली होती.
पोलिसांनी पकडलेला आरोपी संतोष पुजारी हा गेले तीन महिने मृताच्या घरी कामाला होता व लुईस त्याला दारू पिण्यासाठी जबरदस्ती करीत असे व छळ करीत असल्याचे पुजारीने जबानीत सांगितले. तो छळ सहन न झाल्याने कोयत्याने खून केल्याचे सांगितले आहे. पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदास कदम यांनी तपास केला.