नवे २५९ रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

0
155

>> ७ दिवसांत कोरोनाने घेतला २५ जणांचा बळी

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची २९ जुलैपासून सुरू झालेली मालिका कायम असून मंगळवारी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ६० झाली असून मागील ७ दिवसांत २५ जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान, नवे २५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने सात हजाराचा टप्पा पूर्ण केला असून ती संख्या ७०७५ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या १९०१ एवढी झाली आहे. फर्मागुडी, फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात सायंकाळी ६.३० वा. निधन झाले. त्याला २३ जुलैला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह २३८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५११४ एवढी झाली आहे.
पणजी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. आल्तिनो, पणजी येथील २९ वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाला २ ऑगस्टला कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

वाडे-वास्को येथील ७९ वर्षीय महिला रुग्णाचे, कालकोंडा-मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचे आणि घोगळ – मडगाव येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. या सर्व रुग्णांचे को-मॉर्बिड परिस्थितीत निधन झाले.

म्हापसा येथील आझिलो इस्पितळात हातुर्ली, मये येथील एका रुग्णाचे सोमवारी निधन झाले. त्याचा स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, आरोग्य खात्याच्या कोविड बुलेटिनमध्ये या रुग्णाच्या मृत्यूबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही.

पणजीत नवे १० रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मळा येथे ३ रुग्ण, करंजाळे येथे २ रुग्ण, आल्तिनो येथे ३ रुग्ण, पाटो-रायबंदर आणि मिरामार येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. पणजीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पणजीतील रुग्णांची संख्या ७८ एवढी आहे.

साखळी, वाळपईत रुग्ण
साखळी भागात नवे १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ५८ झाली आहे. वाळपई भागात १२ रुग्ण आढळून आले. डिचोलीमध्ये नवे २ रुग्ण, पेडण्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत.
बेतकी येथे नवीन ६ रुग्ण आढळले. खोर्ली – ओल्ड गोवा येथे २, मये येथे २, कोलवाळ येथे ३ रुग्ण आढळले. फोंड्यात १२ रुग्ण आढळून आले. धारबांदोडा येथे नवे ८ रुग्ण आढळले आहेत. शिरोडा येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत.