आत्महत्येमागील गुंता

0
156

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे. आतापावेतो जो तो या आत्महत्या प्रकरणातून स्वतःचे हिशेब पूर्ण करण्यामागे लागलेला दिसतो आहे. या आत्महत्या प्रकरणातून अनेक गोष्टी प्रकाशात आल्या. बाह्य झगमगाटाखाली दडलेले हिंदी चित्रपटसृष्टीमधील अंतर्गत खुनशी राजकारण, हेवेदावे, व्यावसायिक मक्तेदारीचे प्रयत्न याचेही विरूप दर्शन रसिकांना घडले. सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये आतापावेतो अनेक कारणे पुढे केली गेली आहेत. व्यावसायिक दुष्मनीपासून त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती, काही दिवस आधी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून ठार झालेली व्यवस्थापक दिशा, ते थेट मुंबईस्थित एका बड्या युवा नेत्यापर्यंत अनेकांशी या आत्महत्येचा संबंध जोडण्याचा प्रयत्न विविध घटकांकडून होत आला आहे, तर कोणी त्याच्या आत्महत्येचा संबंध तो घेत असलेल्या मानसोपचारांशीही लावून मोकळे झाले आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस तपास सुरू आहे, त्यामुळे त्यामधून सत्य बाहेर येईल अशी आशा आहे, परंतु या निमित्ताने ज्या अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत, त्या विदारक आहेत. विशेषतः बॉलिवूडमधील घाणेरडे राजकारण यानिमित्ताने रसिकांसमोर आले. सुशांतसिंहने यशराज फिल्म्सशी तीन चित्रपटांसाठी २०१२ मध्ये करार केला. त्यापैकी ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘ब्योमकेश बक्षी’ प्रदर्शित झाले, परंतु तिसरा चित्रपट ‘पानी’ काही पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यानंतर सुशांतसिंहने करार मोडला. परंतु तत्पूर्वी त्याच्यासाठी संजय लीला भन्साली ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आले असता ‘यशराज’ने त्याला त्यात काम करू दिले नाही हा जो आरोप आहे, त्याला मिळणारे समर्थन लक्षात घेता बॉलिवूडमध्ये सारे काही आलबेल नाही हे लक्षात येते. कंगना रानावतपासून शत्रुघ्न सिन्हांपर्यंत जेव्हा या गलीच्छ राजकारणाविषयी बोलतात तेव्हा ते दुर्लक्षिण्याजोगे नक्कीच नसेल. सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट नाही. मृत्यूपूर्वी त्याने ‘वेदनारहित मृत्यू’ अशा शोध गुगलवर घेतला होता असे काल पोलिसांनी जाहीर केले आहे. आपली आधीची व्यवस्थापक दिशा हिचे नावही त्याने गुगलवर पाहिले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिशाच्या मृत्यूने तो व्यथित होता व त्यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग सुचवला असे यातून सूचित होते, परंतु त्यामुळे त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने आणि तिच्या भावाने त्याच्या खात्यामधून काढलेल्या पैशांसंदर्भात स्पष्टीकरण मिळत नाही. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीचीही शहानिशा होण्याची गरज आहे. सुशांतच्या बँक खात्यामधून पंधरा कोटी रुपये उडवले गेले असे त्यांचे म्हणणे आहे.
हे सगळे दोषारोप होत असतानाच मुंबईस्थित एका बड्या राजकीय नेत्याच्या पुत्राला या वादामध्ये ओढण्याचा प्रयत्नही झाला. एका पार्टीत सहभागी असल्याचे कारण देत या आत्महत्या प्रकरणाशी त्या युवा नेत्याचा संबंध जोडून यातून राजकारण खेळण्याचा हा प्रकार सोशल मीडियावर सध्या रंगलेला आहे. यातून आपले राजकीय हिशेब पूर्ण करून घेण्याची काहींना फार घाई झालेली दिसते.
एकूण हे प्रकरण एखाद्या चित्रपटापेक्षाही गुंतागुंतीचे आहे. अनेक कंगोरे त्यातून समोर येतात. सुशांत हा काही काळापूर्वी मानसोपचार घेत होता असेही आढळून आलेले आहे. त्यामुळे या सर्वातून नेमके काय कारण घडले की आपली यशस्वीततेकडे वाटचाल करणारी चित्रपट कारकीर्द तो अशी अर्ध्यावर सोडून का गेला हे कळायला मार्ग नाही. परंतु एक उमलता गुणी कलाकार दिशाहीन भरकटत असा अकाली काळाच्या पडद्याआड गेला ही मात्र चित्रपटरसिकांची मोठी हानी आहे. असे काय कारण घडले की त्याला ‘वेदनारहित मृत्यू’ ला जवळ करावेसे वाटले? चित्रपटाची दुनिया रंगबिरंगी जरूर आहे, परंतु मिळणार्‍या यशाची धुंदी चढली, त्यातून दिशा भरकटली वा इतरांच्या असूयेच्या आणि मत्सराच्या भोवर्‍यात अडकली तर एखादी उमलणारी कारकीर्दही अकाली रसातळाला जाऊ शकते याचे सुशांतसिंह राजपूत हे उदाहरण आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार्‍या प्रत्येकासाठी त्याची आत्महत्या हा एक धडा आहे. येथे एका रात्रीत लोक तारे – तारका जरूर होतात, परंतु येथे पाय रोवून उभे राहणे आणि टिकणे सोपे नाही. त्यासाठी कष्ट, साधना आणि अविचल ध्येयनिष्ठा यांना पर्याय नाही हेच सुशांत आत्महत्या प्रकरण सांगते आहे.