२८६ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

0
148

राज्यात बळींची संख्या ५६ : कुठ्ठाळीत सापडले सर्वाधिक रुग्ण; मृतांमध्ये मेरशी, सांगे, वास्कोतील रुग्णांचा समावेश

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून सोमवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ५६ झाली आहेत. तसेच, नवीन २८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या १८८४ झाली आहे.
आरोग्य खात्याने २०८ रुग्ण बरे झाल्याचे सोमवारी जाहीर केले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६८१६ एवढी झाली आहे. त्यातील ४८७६ रुग्ण बरे झाले आहेत.

मेरशी येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये सांगे येथील ७० वर्षीय महिला आणि वास्को येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांचे को-मॉर्बिडमुळे निधन झाल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. बांबोळी येथील गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ५७ जणांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना संशयित म्हणून १७४२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत.

जीएमसीच्या प्रयोगशाळेने २२६५ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर केला आहे. आता प्रयोगशाळेत प्रलंबित नमुन्यांची संख्या ९८३ वर आली आहे. आरोग्य विभागाने १२९७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

पणजीत नवे ७ रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवीन ७ रुग्ण आढळून आले आहेत. आल्तिनो, भाटले, पाटो- पणजी, करंजाळे, सांतईनेज, कांपाल या भागात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सांतइनेज येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण मागील ६ दिवस शहरातील विविध भागात फिरलेला आहे. त्यामुळे अनेक जणांवर होम क्वारंटाइन होण्याची पाळी आली आहे. पणजीतील रुग्णांची संख्या ७९ झाली आहे.

कांदोळी येथे १५ रूग्ण
कांदोळी येथे नवे १५ रूग्ण आढळून आले असून रूग्णसंख्या ५१ झाली आहे. कोलवाळ येथे नवीन १ रूग्ण आढळला आहे. हळदोणा येथे नवीन २ रूग्ण आढळून आले असून रूग्णसंख्या २२ झाली आहे.

खोर्लीत १० रूग्ण
खोर्ली ओल्ड गोवा येथे नवीन १० रूग्ण आढळून आले असून रूग्णसंख्या २८ झाली आहे. बेतकी येथे नवीन २ रूग्ण आढळून आले आहेत.

धारबांदोडा, शिरोड्यात रूग्ण
धारबांदोडा येथे नवीन ८ रूग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३० झाली आहे. शिरोडा येथे ७ रूग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २९ झाली आहे. मडकईत २ रुग्ण आढळले आहेत. सांगे येथे ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १३ झाली आहे. केपे येथे नवीन २ रुग्ण आढळले असून एकूण संख्या २१ झाली आहे.

वाळपईत नवीन १८ रूग्ण
वाळपई भागात नवीन १८ रुग्ण आढळून आले असून रूग्णसंख्या ४६ झाली आहे. म्हापसा येथे ५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ६८ झाली आहे. पेडणे येथे नवीन ४ रुग्ण आणि साखळी येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत. कुठ्ठाळीत नवीन २३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३१२ झाली आहे. कुडतरी येथे नवीन ३ रूग्ण, मडगावात १ रुग्ण, काणकोण येथे १ रुग्ण, कुडचडे येथे नवीन ५ रुग्ण आढळले आहेत. नावेली येथे ४ रूग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३२ झाली आहे.