राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होण्याचा प्रकार सलग तिसर्य दिवशी सुरूच असून मागील चोवीस तासांत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ४५ झाली आहे. तर, नवीन २०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या १६५७ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या सहा हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. एकूण रुग्णांची संख्या ५९१३ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह २०६ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत ४२११ रुग्ण बरे झाले आहेत.
केरी सत्तरी येथील ४९ वर्षीय रुग्णाचे मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी निधन झाले. तसेच मडगाव येथील एका ७३ वर्षीय महिला रुग्णाचे बांबोळी येथील जीएमसीमध्ये निधन झाले आहे. दोघांचाही को-मोर्बिडमुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने अहवालात नमूद केले आहे.
जीएमसीच्या कोरोना वॉर्डात ५४ रुग्ण
बांबोळी येथील जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात ५४ कोरोना संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले. जीएमसीमध्ये कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असून जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत ४०१९ स्वॅबच्या नमुन्याच्या चाचण्या प्रलंबित आहे. २४१२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
चिंबल, पणजीत नवे रुग्ण
चिंबल येथे नवीन १५ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ८१ झाली आहे. तसेच पणजी परिसरात नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७८ झाली आहे. भाटले, रायबंदर आणि सांतइनेज येथे नवे रुग्ण आढळले.
शिवोली, पर्वरी, डिचोलीत नवे रुग्ण
शिवोली येथे नवीन ३ रुग्ण तर पर्वरी येथे नवीन २ रुग्ण आढळल्याने पर्वरीत रुग्णसंख्या २१ झाली आहे. डिचोली व पेडण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
वाळपई, बेतकीत नवे रुग्ण
वाळपई येथे नवे ४ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १३ झाली आहे. बेतकी येथे आणखी ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १२ झाली आहे.
म्हापसा, कांदोळीत नवीन रुग्ण
म्हापशात ८ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ५१ झाली आहे. कांदोळी येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले आहेत.