ऊस उत्पादकांना आज ५.२३ कोटींची आधारभूत किंमत वितरित करणार

0
152

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

राज्यातील ऊस उत्पादकांनी आधारभूत किंमतीसाठी केलेली मागणी मान्य करीत काल गोवा सरकारने त्यांच्यासाठी ५.२३ कोटी रु. एवढा निधी वितरित करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी कृषिमंत्री बाबू कवळेकर व सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हजेरीत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना शनिवारपर्यंत (आज) ही आधारभूत किंमत वितरित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

यासंबंधी बोलताना मंत्री गोविंद गावडे हे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आधारभूत किमतीच्या रुपात ५ कोटी २३ लाख रु. एवढा निधी राज्य सरकार वितरित करील. या शेतकर्‍यांना प्रती टन १८०० रु. एवढी आधारभूत किंमत आम्ही देऊ केली आहे. उद्यापर्यंत त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांनी त्यांना ऊस तोडणीसाठी टनामागे जो ६०० रु. एवढा खर्च आलेला आहे. ते पैसेही सरकारने द्यावेत, अशी मागणी केलेली आहे. ते पैसे कालांतराने त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहितीही गावडे यांनी यावेळी दिली.
ऊसावर आपणाला आधारभूत किंमत देण्यात यावी तसेच ऊस तोडणीवर आलेला खर्चही देण्यात यावा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी बुधवारी निदर्शने केली होती.

मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी निदर्शने मागे घेतली होती. संजीवनी सहकारी साखर कारखान्याची दुरुस्ती करायची असल्याने सरकारने २०१९ साली तो कारखाना बंद केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत संजीवन कारखाना सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. त्यासंबंधी नंतर काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.