>> राज्यात नवे १७४ पॉझिटिव्ह रुग्ण
मंगळवारी कोविडमुळे राज्यात तिघा रुग्णांचे निधन झाले. मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचे काल सकाळी निधन झाले. मधुमेहाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कोविड इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. काल त्याचे निधन झाले.
त्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिला रुग्णाचे गोमेकॉतून कोविड इस्पितळात नेताना वाटेत निधन झाले. या महिलेचे वयही ६५ वर्षे एवढे होते. गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिला ताप होता व श्वास घेण्यास त्रास होत होता. गोमेकॉतून तिला मडगाव येथील कोविड इस्पितळात हलवताना वाटेतच तिचे निधन झाल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काल आझिलो इस्पितळात उपचारासाठी आणलेल्या एका इसमाचे इस्पितळात पोचण्यापूर्वीच निधन झाले. तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे नंतर आढळून आले. एका खासगी इस्पितळातून त्याला उपचारासाठी आझिलोमध्ये हलवण्यात आले होते. पण इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.
मृतांची संख्या २६ वर
काल तिघा जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६वर गेली आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत
आणखी एक रुग्ण
कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत काल आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यापूर्वी या औद्योगिक वसाहतीत तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. काल आणखी १७४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४०२७ वर पोहोचली आहे. तर ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १५५२वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत रोगमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २४४९ आहे. कोरोनामुळे आजतागायत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चाचणीसाठी पाठविलेल्या २८३६ नमुन्यांपैकी काल १६१२ नमुन्यांचे अहवाल हाती आले असता त्यापैकी १७४ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. काल रोगमुक्त होवून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ८८ आहे. तर हॉटेल्स व विविध रेसिडन्सीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १६१ एवढी आहे. तर विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची संख्या ३६ आहे.