पावसाळ्यात ‘योगसाधना’ आवश्यक

0
200
  •  डॉ. मनाली पवार

कोविड-१९च्या महामारीत विशेष काळजी म्हणून गुळवेल काढा घ्यावा. पचायला हलकासा आहार सेवन करावा. हलका व्यायाम, योगसाधना करावी. प्राणायाम करावेत. वेखंड, सुंठ, ओवा, ऊद, जटामासी, कडुनिंबाची सुकलेली पाने यांचे मिश्रण वापरून घरामध्ये धुपन करावे.

सहाही ऋतूंमध्ये पावसाळ्यात आरोग्य सांभाळणे सर्वांत अवघड असते. या काळात शरीरशक्ती सर्वांत कमी होत असते. पावसाळ्यात थंड झालेल्या वातावरणामुळे तसेच गार वार्‍यामुळे शरीरात वातदोष वाढतो, तर आधीच्या ग्रीष्मातील उष्णतेमुळे तप्त झालेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडल्याने येणार्‍या गरम वाफांमुळे शरीरात पित्तदोष साठावयास सुरुवात होते. अग्नी मंद झाल्याने पचनही खालावते. पावसाळ्यातील दमट हवा एकंदरीत जंतुपोषक व त्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गांनाही कारण ठरते. पावसाळ्यात शरीरशक्ती कमी होत असल्याने व्यायामही निषिद्ध सांगितला आहे. हो पण हलका व्यायाम जरूर करावा. मैदानी खेळ, घामाघूम होईपर्यंत व्यायाम जरी निषिद्ध असला तरी ‘योगासने’ जरूर करावीत. या काळात ‘सूर्य देवता’ जी शरीर व मनाला ऊर्जा देते ती बर्‍याचवेळा ढगाआड लपून, दर्शन कमी देत असल्याने मनही थोडे अस्वस्थ होत असते, म्हणून या ऋतूत ‘योगसाधना’ जरूर करावी.

या पावसाळ्यात पावसातील इतर आजारांबरोबर कोरोनाचे संसर्गही आहे. त्यामुळे अतिसावधगिरी घेणे अपेक्षित आहे.
कोविड-१९ला हरविण्यासाठी पावसाळ्यातील आहार ….
* ताजे, गरम आणि हलके अन्न सेवन करावे.
* दही, चीज, पनीर आणि जड मिठाई तसेच या काळात जे घरोघरी केक विविध तर्‍हेने बनविले जात आहेत ते टाळावेत.
* पालेभाज्या वापरण्यापूर्वी खूप पाण्याने काळजीपूर्वक धुऊन घ्याव्यात. भाज्या शिजवून खाव्यात, कच्च्या सॅलड करून खाऊ नयेत व तशाही सध्या पालेभाज्या नाही खाल्ल्या तरी चालतील.
* तांदळाचा (जुन्या) भात, मूग- तांदळाची खिचडी, फुलका, ज्वारीची भाकरी असा आहार घ्यावा.
* कडधान्यांपैकी मूग, तूर, कुळीथ वापरावेत.
* भाज्यांमध्ये दुधी, दोडका, पडवळ, घोसाळी, बटाटा यांचा वापर करावा.
* मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी जिरे, हिंग, धणे, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद सारख्या मसाल्याचा वापर करावा.
* जेवताना तोंडाला चव यावी व अन्न पचनासाठी पुदिनाची चटणी खावी.
* ओली हळद, लिंबापासून तयार केलेले लोणचे तोंडी लावण्यास घ्यावे.
* दुपारी जेवणानंतर ताज्या ताकात आले, चिमूटभर हिंग व काळे मीठ टाकून प्यावे.
* ज्यांना फारशी भूक लागत नाही त्यांनी या काळात एकभुक्त रहावे. दुपारी साधे जेवून रात्री काहीही खाऊ नये. रात्री खायचे असल्यास फक्त मुगाचे कढण, रव्याची पातळ लापशी असा द्रवाहार करावा.
* आठवड्यातून एकदातरी उपवास करावा. तसाही सध्या व्यायाम बंद असल्याने पचन नीट होत नाही म्हणून काहीही न खाता पचनसंस्थेला विश्रांती द्यावी.
* जेवणानंतर मुखवास म्हणून ओवा, बडीशेप, धण्याची डाळ यांचे सैंधव मिठासह भाजून केलेले मिश्रण वापरावे.
* पावसाळ्यात शक्य तेथे सुंठ किंवा आले वापरावे.
* भाजी, आमटी किंवा सूप करतानाही तिखटापेक्षा शक्य तिथे आल्याचाच वापर करावा.
* दुधात चिमूटभर सुंठ व हळद टाकून दूध प्यावे.
* चहामध्ये आले किसून टाकावे.
* जेवणापूर्वी अर्धातास आल्याचा तुकडा सैंधव लावून तोंडात धरून चघळावा.
* सकाळी उठल्या उठल्या तुळशीची पाने, दालचिनी, मिरी व सुंठ या द्रव्यांनीयुक्त चहासारखा काढा प्यावा.
* पावसाळ्यात एकंदरच हवा आणि पाण्यामधून जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने प्यायचे पाणी निश्‍चित गाळून आणि उकळूनच प्यावे. आयुर्वेदीय ग्रंथात तर पावसाळ्यात पाण्याचा काढा करून घेण्यास सांगितले आहे. म्हणजेच पाणी चांगले उकळून प्यावे व शक्यतो गरम चहाप्रमाणे एक एक घोट घेत प्यावे.
जेवणानंतर शेवटी पाणी पिऊ नये. कारण अन्नपचन होत नाही व ते तसेच अपाचित अन्न सडते. परिणामी विविध व्याधी होतात.
* पचनशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचे सरबत पिण्यास हरकत नाही.
आहाराची पथ्ये पाळल्यास औषधांची गरज भासत नाही. योग्य आहार घेतला नाही, तर औषधांचा पुरेसा परिणाम दिसून येत नाही. आपल्या प्रकृतीत त्वरेने सुधारणा व्हायला हवी असेल तर आहाराचे पथ्य कटाक्षाने पाळावे.

पावसाळ्यातील इतर विकार ः-

या काळात वात-पित्त-कफाचे असंतुलन होत असल्याने प्रामुख्याने पचनाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. सामान्यतः भूक न लागणे, पोट जड होणे, उलट्या-जुलाब होणे, आव पडणे, जंत, कावीळ, सर्दी, खोकला, थकवा, निरुत्साह वाटणे असे त्रास होताना दिसतात. गुडघेदुखी, पाठदुखी किंवा दम्याचा त्रास असणार्‍यांना तर हा काळ नकोसाच वाटतो. असे त्रास होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने आपली प्रकृती, वय, कामकाजाचे स्वरूप यांचा विचार करून काळजी घ्यावी.

सध्या या काळात शक्यतो जेवढे शक्य असेल तेवढे आहार-विकाराचे वर्षाऋतुचर्येप्रमाणे आचरण करावे व शक्य असेल तेवढी आपली प्रकृती इतर व्याधींपासून लागण होण्यापासून परावृत्त करावी. मुलांचीही विशेष काळजी घ्यावी. तरीही त्रास होत असल्यास… उदाहरणार्थ ः-
* जुलाब होत असल्यास चमचाभर आल्या-लिंबाचा रस घ्यावा व दिवसभर फक्त ताक-भात किंवा मुगाचे कढण प्यावे.
* उलट्या होत असल्यास साळीच्या लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळिंबाचा रस खडीसाखर टाकून थोडा-थोडा पीत रहावा व लंघन करावे.
* आमवात, संधिवात असणार्‍यांनी रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप यांपासून तयार केलेली सुपारीच्या आकाराची गोळी घ्यावी. सांध्यांना नियमित तेल लावून शेकावे.
* सर्दी, घसा दुखणे, भूक न लागणे, तापासारखे वाटणे असा त्रास होत आहे.. असे लक्षात आल्यावर लगेचच अर्धा चमचा सीतोपलादि चूर्ण गरम पाण्याबरोबर/मध सकाळ-संध्याकाळ प्यावे. हे चूर्ण अगदी लहान मुलांनाही पाव चमचा मधाबरोबर द्यावे.
* पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटणे, गॅसेस होणे, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण जेवणाच्या सुरुवातीला घासभर भात आणि तुपाबरोबर मिसळून खावे व नंतर जेवण जेवावे.
* पोटाचे रोग उदा. मलावरोध, गॅसेस, ऍसिडिटी, मूळव्याध यांपैकी काहीही त्रास होत असल्यास जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
* वासावलेह – खोकला, दमा, असणार्‍यांनी विशेषतः छातीत कफ साठून राहिला असल्यास हा अवलेह सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
* सितोपलादि चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, वासावलेह, च्यवनप्राश, एरंड तेल, कुमारी आसव, कनकासव इत्यादी औषधे प्रत्येकाच्या घरात असावीत.
* सांधेदुखी व दम्याचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी विशेषतः त्रास सुरू होण्याची वाट न बघता पावसाळ्याच्या चाहुलीबरोबर योग्य ते उपचार सुरू करावेत व ऋतू संपेपर्यंत उपचार सुरू ठेवावेत, जेणेकरून त्रास होणार नाही; आणि झाला तरी सुसह्य होईल.
* शरीरात वाढलेला वात कमी होण्यासाठी सर्वांगास आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाचा किंवा तीळ तेलाचा अभ्यंग करावा व गरम पाण्याने आंघोळ करावी.
* वातशामक तेलाचा वस्ती (एनिमा) घ्यावा.
* कोविड-१९च्या महामारीत विशेष काळजी म्हणून गुळवेल काढा घ्यावा. पचायला हलका असा आहार सेवन करावा. हलका व्यायाम करावा. योगसाधना करावी. प्राणायाम करावेत.
* वेखंड, सुंठ, ओवा, ऊद, जटामासी, कडुनिंबाची सुकलेली पाने यांचे मिश्रण वापरून घरामध्ये धुपन करावे.
* लहान मुलांना आंघोळीनंतर कपडे घालण्यापूर्वी व्यवस्थित धूप करावा. धूपासाठी ओवा, देवदार, गुग्गुळ, वावडिंग यांचे चूर्ण वापरावे.