चोप्राच्या संघाचा धोनी कर्णधार

0
155

 

भारताचा माजी कसोटी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या सार्वकालीक आयपीएल एकादश संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपविले आहे.

धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने सातवेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. चोप्रा याने आपला यूट्यूब चॅनेल ‘आकाशवाणी’वर संघ जाहीर करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार व सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांची डावाची सुरुवात करण्यासाठी संघात निवड केली.

टीम इंडियाचा व आरसीबीचा कप्तान विराट कोहली याला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडण्यात आले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत सातत्यपूर्ण फलंदाज सुरेश रैना, ‘मि. ३६० डिग्री’ एबी डीव्हिलियर्स व महेंद्रसिंग धोनी यांना अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या स्थानासाठी पसंती देण्यात आली आहे.

चोप्राने रविचंद्रन अश्‍विनला डावलताना टर्बिनेटर हरभजन सिंग व विंडीजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नारायण यांना दोन स्पेशलिस्ट फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले आहे. भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह व लसिथ मलिंगा हे तीन जलदगती गोलंदाज संघात आहेत. विंडीजचा स्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल, आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल यांना आकाश चोप्राच्या संघात स्थान मिळालेले नाही.