राज्यात आत्तापर्यंत ३२ इंच पाऊस

0
112

राज्यात जून महिन्यात आत्तापर्यंत अठरा दिवसात ३२.०८ इंच पावसाची नोंद झाली असून जून महिन्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ७१ टक्के जास्त आहे. राज्यभरात मागील चोवीस तासात ३.२९ इंच पावसाची नोंद झाली असून मुरगाव येथे सर्वाधिक ५.३४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पेडणे येथे मागील चोवीस तासांत ५.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे. दाबोळी येथे ४.२४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजीमध्ये चोवीस तासांत ३.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, गुरूवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत २.५१ इंच पावसाची नोंद झाली आहे.

ओल्ड गोवा येथे ४.४० इंच, म्हापसा येथे १.८५ इंच, साखळी येथे २.४३ इंच, वाळपई येथे २.४५ इंच, काणकोण येथे २.३८ इंच, मडगाव येथे २.४१ इंच, केपे येथे १.९३ इंच, सांगे येथे १.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथील पावसाबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

राजधानीला झोडपले
राज्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरूच आहे. गुरूवारी सकाळी जोरदार पावसाने पणजी शहराला पुन्हा एकदा झोडपून काढले. जोरदार पावसामुळे विविध भागात पुन्हा एकदा पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कांपाल, मिरामार, पाटो, मळा, कदंब बसस्थानक व इतर ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहन चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कांपाल भागात पाण्याचा निचरा होत नाही. या भागातील काही घरात पावसाचे पाणी घुसले आहे. गटारातील कचरा हटविण्यासाठी महानगरपालिकेने विविध भागात कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.