Home बातम्या गैरगौष्टींची पाठराखण कॉंग्रेसने करू नये

गैरगौष्टींची पाठराखण कॉंग्रेसने करू नये

0

– एन. शिवदास

स्व. दत्तात्रेय भावेंची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. येणार्‍या परिस्थितीला धाडसाने तोंड देण्याची क्षमता लुप्त असते अथवा मनामध्ये कोणता तरी अपराध घर करून राहतो, तेव्हा माणूस जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा कमकुवत माणसाला आपण शिळ्या नक्षत्राचे म्हणतो. स्व. दत्तात्रेय भावेंच्या आत्महत्येमागची नेमकी कारणे अजून स्पष्ट झालेली नाहीत, मात्र भावे यांनी प्रचंड दबावाखाली आल्याने आत्महत्या केली असून असे टोकाचे पाऊल उचलण्यास त्यांचा झालेला मानसिक छळ कारणीभूत आहे असा निष्कर्ष काढता येईल अशी चिठी मिळालेली नाही. कॉंग्रेसतर्फे बोलणारे नवोदित तरूण ताम्हणकर आपण बरेच धाडसी व बेडर असल्याचा आव आणून बरीच बेताल विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. सुदीप ताम्हणकरांसारख्या तरूणांची गोव्याला गरज आहे यात शंकाच नाही. बस संघटनेच्या चिटणीसपदाचा वापर त्यांनी माहिती हक्क कायदा कार्यकर्त्यापर्यंत आणि आता कॉंग्रेस पक्ष प्रवेशापर्यंत चांगल्या प्रकारे केला, मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असताना भावे प्रकरणात नवोदित सुदीपचा वापर ही बेरकी कॉंग्रेस नेतेमंडळी स्वतः पडद्यामागे राहून करीत आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे.

पक्षात आपल्यासारख्या नवख्याला पक्षप्रवेश करताक्षणी भलताच भाव आला या भ्रमात सुदीप राहणे स्वाभाविक आहे, कारण कॉंग्रेस नेत्यांचा त्यांना अनुभव नाही. त्यांनाही वापरून फेकून देऊ नये म्हणजे झाले. सुदीप यांना एक माजी कॉंग्रेस प्रवक्ता व सरचिटणीस या नात्याने इशारा द्यावासा वाटतो. पत्रकारांचा जिथे जिथे सरळ सामना करायचे धैर्य कॉंग्रेस नेत्यांपाशी नसते, तेव्हा ते सुदीपसारख्यांचा वापर करतात, हा माझा प्रवक्ता म्हणून अनुभव आहे, हे सुदीप यांनी ध्यानात ठेवावे. तर मुद्दा असा आहे की, पस्तीस हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचे शाह आयोगाने उघड केले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत नतद्रष्ट भस्मासुर कॉंग्रेसचा टिळा कपाळी लावून जनतेचा पैसा दोन्ही हातांनी कसा ओरबाडत होते हे आता उघड झाले आहे. नावेली येथील एका साकवाच्या बांधकामासाठी झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार एका इंग्रजी साप्ताहिकाने हल्लीच प्रसिद्ध केला आहे. खाण खाते तर सतत मुख्यमंत्री राहिलेल्या दिगंबर कामतांच्या हाती बारा वर्षे होते. एवढा सगळा भ्रष्टाचार, बेकायदेशीर नोकरभरती, सरकारी नियमांना, पात्रतेला, योग्यतेला कुठल्याही प्रकारे किंमत न देता आपल्याला हवे त्याप्रमाणे हवे त्या अपात्र उमेदवाराची नोकरीत वर्णी लावणे या सगळ्या कॉंग्रेसी अधर्माचे, अनीतीचे व लूटमारीचे समर्थन करावे असे ताम्हणकरांसारख्यांना वाटते काय? जो तरूण माहिती हक्क कायद्याचा वापर करून सत्य बाहेर आणण्यासाठी झटत असे, तोच आता कॉंग्रेस पक्षात जाऊन त्यांच्या कारस्थानांचे समर्थन करणार आहे का? जे जे बेकायदा काम कॉंग्रेसच्या राजवटीत झाले आहे, त्याची चौकशी या सरकारने करू नये तर कोणते सरकार अथवा कोणता अधिकार करील?

न्यायनीतीची अपेक्षा व चाड बाळगणार्‍या सद्गृहस्थांना आडमुठेपणा शोभत नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी सत्तेवर येताक्षणीच उतावळेपणाने जीभ टाळ्याला लावून ज्या अनेक प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत, त्यांची मोठी जंत्री आहे. मुख्यमंत्री हा दिलेला शब्द पाळतात की नाही हे येणार्‍या काळात दिसेल. माझाही एक वैयक्तिक असा अनुभव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी अवधी द्यावा असे मला वाटते. बड्या खाणमालकांविरुद्ध व माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर पंधरा दिवसांत नोंदवणार अशी घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी अजूनही कारवाई केलेली नाही. ज्या प्रमाणे खाण संचालक व कर्मचार्‍यांचे निलंबन केले गेले, त्याच धाडसाने त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची तत्परता दाखवायला हवी होती. बड्या धेंडांवर हात टाकायला घाबरणारे मुख्यमंत्री गोव्यात आहेत अशी प्रतिमा देशात उत्पन्न व्हावी असे कोणालाही वाटणार नाही.

कॉंग्रेस पक्षाने पर्रीकरांविरुद्ध केलेली तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या… असे म्हणायला वाव आहे. आजपर्यंत कॉंग्रेस राजवटीत जो प्रचंड घोटाळा अनेक खात्यांमध्ये झाला, जनतेच्या पैशाची जी लुटालूट झाली, जे बेकायदेशीर धंदे कॉंग्रेस नेत्यांनी करून ठेवले आहेत, ते सारे खोटे आहेत व कॉंग्रेसच्या राजवटीतले सारे व्यवहार हे कायदेशीर व नियमांना धरून होत होते हे सिद्ध करण्याची कॉंग्रेसच्या त्या गुन्हेगारीचा आरोप असलेल्या नेत्यांची जबाबदारी होती, परंतु एवढे मोठे अपराध होत असताना ते घुबडासारखे दडून राहिलेले आहेत. ‘‘म्हाका काय खोबोर ना’’ एवढेच म्हणून माजी बांधकाम मंत्र्यांचे काम संपले काय? बांधकाममंत्री, खाणमंत्री यांनी पर्रीकरांना एव्हाना आव्हान देत मैदानात उतरायला हवे होते. झालेला सर्व व्यवहार कायदेशीर असेल तर घाबरण्याचे कारण काय?

कॉंग्रेसतर्फे जे काही अकांडतांडव चालले आहे व भावेंच्या मृत्यूचे निमित्त करून कॉंग्रेस पर्रीकर सरकारने कॉंग्रेस नेत्यांविरुद्ध पुढील कारवाई करू नये यासाठी जर दडपण आणण्याचा हा प्रयत्न असेल तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल व कॉंग्रेस पक्ष हा बेकायदा कृत्ये, गुन्हेगारी, चोर लुटारूंचे समर्थन करणारा पक्ष आहे हे आणखी अधोरेखित होईल. वास्तविक पर्रीकर सरकारला चौकशी करण्याचे जाहीर आव्हान यांनी द्यायला हवे होते, ज्यामुळे सत्य बाहेर येऊन कॉंग्रेस पक्षाला आज बदनाम करणारे नेते कॉंग्रेस पक्षात नेमके कोणते धंदे करीत होते हे सिद्ध झाले असते व त्याचा लाभ पक्षाच्या स्वच्छतेसाठी झाला असता. कॉंग्रेसमधील बदनाम, भस्मासुर, लफंग्यांच्या संगतीत आपण नको म्हणून माझ्यासारख्यांना पक्षापासून दूर राहण्याचा प्रसंग आला. आमच्या स्वप्नातील अपेक्षित कॉंग्रेस बाजूला फेकली गेली. निष्ठावंत नेत्यांपैकी एक नेत्या सुलोचना काटकर यांचे परवा निधन झाले. अगदी हाताच्या बोटांवर मोजावेत इतकेच निष्ठावंत सध्या कॉंग्रेसमध्ये राहिले आहेत. मुद्दाम नाव घेता येईल ते शांताराम नाईक यांचे. बाकीचे सर्व नेते आपल्या पक्षाचा कधी ना कधी विश्वासघात करून स्वतःचा स्वार्थ साधलेलेच आहेत!

कॉंग्रेस पक्षाने सुदीपसारख्या नवख्या कार्यकर्त्याचा वापर पक्षबांधणीसाठी व गेलेली इभ्रत परत मिळवण्यासाठी करावा. भावे यांच्या आत्महत्येचे भांडवल करून कॉंग्रेस राजवटीत झालेल्या बेकायदेशीर राज्यकारभाराची व भ्रष्टाचार करणार्‍यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न नेत्यांनी करू नये.