Home बातम्या गौरीपूजन

गौरीपूजन

0

– सौ. पौर्णिमा केरकर

लाट गे लाटाला काय पाणी जावनी पाटाला

काय पानी जावनी पाटाला

पानी जावनी पाटाला काय

आबोलेच्या बेटाला… काय आबोलेच्या बेटाला

आबोलीची पाच आबोली

धाडा गौरीच्या हौशाला

श्रावण सरून भाद्रपद महिन्यात सार्‍या सृष्टीने पदार्पण केले की गावागावांत लहानापासून थोरापर्यंत सार्‍यांनाच वेध लागतात ते गौरी गणपतीचे. उत्साहाची पर्वणी तनामनाला बहाल करणारा हा सण सर्वांनाच वेड लावणारा; त्यातही आई-मुलांच्या नात्याचे वैविध्यपूर्ण पैलू यातून वृद्धिंगत होताना दिसतात. पार्वतीच्या अंगीचा मळ व या मळापासून तयार करण्यात आलेले बाळ म्हणजे गणपती. खरं तर अंगीचा मळ येऊन येऊन कितीसा येणार व त्यातून तयार झालेले बाळ त्याला जीवनदान देऊन उंबर्‍यावर बसविणे साराच चमत्कार! परंतु या चमत्काराला सामोरे जाताना लोकमानसाने आपली श्रद्धा त्याच्याशी गुंतविलेली आहे. त्यामुळेच वास्तव जगण्यातील दाहकतेला सामोरे जाण्यासाठीचे बळ त्यातून आपोआपच मिळत गेले. त्याशिवाय त्यातील नैसर्गिक तत्त्व अबाधित राहिले. निसर्गाशी जवळीक साधूनच या सणाची निर्मिती झाल्याने गणेशचतुर्थी हा निसर्गोत्सव झाला. पार्वतीच्या रूपातली गवर लोकसंस्कृतीतील मालनीला कधी आपल्यापेक्षा वेगळी वाटली नाहीच. म्हणूनच तर –

पार्वतेन येकवात धरीले

लायील्यो माळ्याक निसणी

काडीले पाच गे नारळ

फोडीले पाच हे नारळ

नारळ कातुनी आंगाक काडीले

आंगाचे मळीचो बाळ सो केलो

बाळाक येयीलो हुंबर्‍यावरी

पार्वती बळे उमळूक गेली

पार्वती या बाजूला कपडे धुण्यासाठी जाते व गणेशाला दरवाजावर उभी करते. पुढे मग शंकर संशय घेतो, कमरेची सुरी काढून त्याच्या उरी मारतो. पार्वतीचे रडणे त्यामुळेच हत्तीची शिकार करून त्याचे शीरकमलच मग मुंडके नसलेल्या बाळाच्या धडाला लावून त्याला जिवंत करण्यात येते. एकूणच गणेशाच्या जन्माची कथा चमत्कृतीपूर्ण. पण आधुनिकतेने, डोळसपणाने विचार केला तर माती आणि नातीच दृष्टीस पडतात. गौरी गजाननाची माता पण दोघांनाही एकत्रितपणे पुजण्याची प्रथा गणेशचतुर्थीच्या दिवशी आहे. गणपती जेवढे दिवस निवासाला असेल तेवढे दिवस गौरी त्याच्या शेजारी विसावलेली. विसर्जनादिवशी गणपतीच्या अगोदर तिचेच विसर्जन विहिरीत नेऊन करण्याची परंपरा. ही गौरी म्हणजे काही एखादी मूर्ती नसते तर हरयाळी, हळदीचा थाम. हरयाळी इतर वेगवेगळी पत्री एकत्रित बांधून त्यावर गौरीचा मुखवटा चढवला जातो. तिच्यासाठी स्वतंत्र नारळ, तांदूळ, पाच पानांचा विडा ठेवलेला असतो. या गौरीची पूजा सर्वसामान्यपणे गणेशपूजा करणार्‍या सर्वच घरात असते. चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेचे व्रत हे गौरीचेच व्रत. त्याबरोबरीनेच गणेशचतुर्थीच्या पाचव्या, सातव्या दिवशी किंवा तिथीप्रमाणे काही गावांत गौरीचे व्रत केले जाते. त्यावेळी सवाष्णी स्त्रिया ‘होवशे’ भरून देवळात व वाड्यावर वाटतात. नव्या नवरीला ‘होवसावण्याचा’ विधी यावेळी केला जातो. काही ठिकाणी नागपंचमीला होवशाची परंपरा आहे. पण काहींच्या घरी हा सण साजरा होत नाही तेव्हा मग गौरीपूजनावेळी ‘होवशा’ केला जातो. स्त्रिया आणि गौरीपूजा याचे अनन्यसाधारण नाते आहे. चतुर्थीच्या दिवशी श्रीफळाच्या रूपात महादेवाची पूजा केली की गौरीपूजा केली जाते. त्यासाठी तांदूळ, नारळ, म्हादेव, काजळ, कुंकुम, मुहूर्तमणी, हळदीचा पाच पानांचा थाम वगैरेची गरज असते. पहिल्यांदा महादेवाला पुजून त्याला जानवे घातले जाते. त्यानंतर गौरीपूजा करताना सवाष्णीची सारी लेणी तिच्यावर चढवतात. तिची ओटी भरून झाल्यावर गणेशाला वंदन केले जाते. गणपतीसाठी पाच पाने तयार ठेवून त्यावर नैवेद्यरूपी जेवण वाढले जाते. गौरीचे पान वेगळे करून त्यावर फक्त तीन चिमटे ‘राख’ वाढली जाते. एकदा म्हणे गौरी आपल्या माहेरी गेली. पण तिथे तिला जेवायला वाढण्यात आले नाही की काही कारणामुळे जेवणच तयार झाले नव्हते. माहेरहून सासरी असच कसं यायचं? म्हणून मग तिने चुलीतली तीन चिमटे राख घेतली, जिभेवर ठेवून खाल्ली व परत सासरी परतली. गौरीला पोहोचविताना संध्याकाळी तिचा नैवेद्य म्हणून भाजी-भाकरी देण्याची परंपरा आहे. म्हणून मग भाकर्‍या भाजताना अगोदर पिढ मळताना त्यात तीन चिमटे राख मिसळण्याची परंपरा आहे. एरव्हीसुद्धा वेगवेगळ्या फुगडीगीतांतून, लोकगीतांतून गौरीला तिच्या माहेरी वेळोवेळी अपमानच सहन करावा लागला.

श्री गणेशा म्हादेवा

गवर जाता मायेरा काय

जाता जाल्या जाऊ दे

तिला कपालकुंकू लावू दे

असे म्हणून तिला माहेरी जाण्यापासून कोणी अडवले नाही. उलट अहेवपणाची सर्वच मागणी तिची पूर्ण केली. भोळ्या जटाधारी, ओबडधोबड दिसणार्‍या झोळीवाल्या शंकराला तिने वरमाला घातली म्हणून तर तिच्या वाट्याला हे सारे अपमान आले. ती कणखर डगमगली नाही. –

कांगलनीच्या झाडा तळा

का गौराय उभी शी

हयसर माजा शेणला येडान काय

सोदता भावोजी

सांडल्यार सांडो गो, तुज्या बाप्पाचे

आमी घडयन गप्पाशी गे

असे म्हणत म्हणत आई, भाऊ, बहीण या नात्याची वीण उलगडते. गौरी पुजताना विहिरीवरून किंवा नदीवरून पाणी आणावे लागते. परतीच्या वाटेवर तोंडात पाण्याचा घोट मुख्य बाईला घ्यावा लागतो व मुक्यानेच वाटचाल करावी लागते. अशावेळी आजूबाजूच्या स्त्रिया मग –

पावला घेता झिरीझिरी

तारू चालले रत्नागिरी

रत्नागिरीच्या किल्यावरी

जायो फुलल्यो असतमपुरी

जायो काढीन मी पाटुल्यात

जायो गुतान मी उब्या दोरार

धाडेन धाडेन मी गौराईच्या भेटेक

आता गौरी येवच्यो गे

फुलांनी वाट दमदमल्या गे

एरव्ही तिथीप्रमाणे पुजण्यात येणार्‍या गौरी ह्या त्या दिवशीच्या दिवशी पोहोचत्या करण्यात येतात त्यावेळी भाजी-भाकरीचा नैवेद्य अमृताहूनी मधुर असतो. पाच पानांची मिळून भाकरी त्यात शेगलाची पाने, कुड्डूक हुड्डूक, तायखिळा, उडदाची पाना, नागूल वगैरे पाने घालून भाजी केली जाते व नाचण्याची नाहीतर तांदळाची भाकरी करून त्या भाकरीची बारीक बारीक कुटा करून भाजी व भाकरी नैवेद्य म्हणून वाटला जातो. सुका बांगडासुद्धा नैवेद्यासाठी वापरला जातो. तो फक्त गौरीलाच दाखवला जातो. होवशासाठी काही ठिकाणी हळदीची पाने तर काही ठिकाणी कुड्याची पाने ठेवून त्यावर उकडलेले कुळीथ नाहीतर भिजविलेली मुगाची डाळ, पेरू, सुपारी, पाना, ल्हावयो, तवशे, करांदे, केळी व छोटे छोटे तांदळाचे वडे काढून प्रत्येक पानावर ठेवले जातात व हेच होवशे देवीला पाच ठेवून बाकीचे सर्व नव्यानेच त्या दिवशी आणलेल्या सुपातून मानाप्रमाणे वाटण्याची प्रथा आहे.

देवी गौरीच्या रूपातील आणताना नदीकिनारचे सात छोटे दगड, सात शिंपले, हळदीचा पाच पानांचा थाम, हळदीची तुकडा, दोन सुपार्‍या, पाच पाने, विहिरीत फेकण्यासाठी नारळ, काजळ, कुंकुम आणतात. विहिरीवर गेल्यानंतर पाणी काढून धुऊन सारे घ्यायचे. पाच ओंजळींनी देवीचा तांब्या भरायचा. विडा, हळद, फूल, काजळ, कुंकू विहिरीत टाकायचे. तोंडात घोट घेऊन देवीला पाटावर आणून बसविली की तोंडातला घोट दरवाजाच्या उजव्या बाजूला फेकायचा ही पद्धत. विसर्जितसुद्धा अशीच केली जाते. या गौरीपूजनाच्या दिवसात जर कोणी सवाष्णी पाया पडण्यासाठी आल्या तर त्याच्यावर पाळत ठेवली जायची. कारण देवीच्या पाण्याने भरलेल्या कलशात आपला पदर बुडवून देवीला आपल्या गाठीला बांधून नेईल ही भीती. अशा तर्‍हेने गाठीला बांधून देवीला नेली की त्या घराला देवी पुजण्याचा मान मिळत नसे असा संकेत रूढ होता. गौरीची पूजा ही मातृदेवतेची, शक्तीची, सृजनत्वाची पूजा. लोकसंस्कृतीत लोकमान्य आहे ती गणोबा गवर. भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात अष्टमीस अनुराधा नक्षत्रावर होणार्‍या गौरीच्या आगमनास ज्येष्ठा नक्षत्रावर म्हणून ज्येष्ठ गौरी असेसुद्धा संबोधले जाते. कृषी संस्कृतीत या सुजलाम सुफलाम भूमीचे समृद्धी संस्कृतीचे प्रतीक म्हणजे गौरीपूजा. मुळात काळी सावळी, सर्वसामान्य हिणवली गेल्यामुळे देवाला प्रसन्न करून गोरा रंग प्राप्त केला म्हणून गौरी – चैत्र गवर, श्रावणातील मंगळागौर, हरितालिका, गणोबा गवर, ज्येष्ठा गवर अशा गौरी पूजा होतात. घरची गरीबी असली तरी गौराईला दागिन्यांनी नटण्या-मुरडण्याची हौस भारी –

हिरव्या रानाचं पिवूळ ठसं

गौराई म्हन माझं माह्यार दिस

माह्यार दिसं जाल्या येवन जागे लेकी

पायातला जोडव्या लेवन जागे लेकी…

अशी ही गौराई सासुरवाशीण असली तरी माहेरची असीम ओढ; म्हणूनच तर स्त्रीमनाला तिची आंतरिक ओढ.