सक्तीच्या सुट्टीचे नियोजन

0
425
  •  पौर्णिमा केरकर

सक्तीची सुट्टी कधी संपणार सांगता येत नाही, मात्र आपल्या मनात अभंग जिद्द असेल आणि जीवनाकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन असेल तर ‘हेही दिवस सहज जातील’ ही अशी सकारात्मकता आपल्याला या परिस्थितीतून तावून सुलाखून ताजेतवाने होत बाहेर पडण्याचे बळ निश्चितच देईल!

बघता बघता सक्तीच्या सुट्टीचे दोन महिने उलटून गेले. फक्त देशातच नव्हे तर जगात असे काहीतरी घडेल आणि अचानक एक मोठ्ठा ब्रेक लागल्यासारखे आपल्याला थांबावे लागेल, हा असा विचारसुद्धा स्वप्नातही कधी डोकावला नव्हता. परंतु या वास्तवाला आता स्वीकारावे लागले. मार्च- एप्रिल महिने हे तर परीक्षांचे महिने. संपूर्ण वर्षभरात जे काही शिक्षण झाले त्याचा सोक्षमोक्ष या महिन्यात लागायचा. पालकांना- विद्यार्थ्यांना तर अति ताणाचे हे दिवस.

एकदाच्या का या परीक्षा संपल्या की मग ताण हलका करण्यासाठी बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत पक्के ठरलेले होते. मे महिना तर साहित्यिक, सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक सोहळ्याचा! गजबजाट- धावपळ- खरेदी- फिरणे- पार्ट्या… अगदी वेळ अपुरा पडावा अशी स्थिती. कोरोनारुपी महामारीने अवघ्या जगाला थोपवून धरले. सुरुवातीला वाटले होते की एकच दिवस तर घरात राहायचे, त्यात काय मोठेसे? मग मात्र एकाचे एकवीस. भलं मोठं प्रश्‍नचिन्ह, इतके दिवस घरात बसायचे? मग करायचे तरी काय? कसेबसे ढकलले पुढे पुढे दिवस. मग दुसरा.. पुढे तिसरा.. लॉकडाऊन .. सहनशक्तीचा अंत व्हायला आला. बर्‍याच जणांना निराशेने घेरले. मानसिक ताणतणाव वाढले. काही चांगले आणि बरेचसे वाईटही घडले. एरव्ही घर.. ऑफिस.. परत घर.. या प्रवासात मुलाबाळांसमवेत चार निवांत क्षण वेचणे बरेच अवघड होऊन बसले होते आणि आता अचानकच दोन महिन्यांचा बंदिवास!.. दिवस संपता संपेना.. रात्री वाढता वाढता वाढत आहेत. एका अनिश्चित काळासाठीची ही सुट्टी.. पूर्वनियोजित असे काहीच नाही. करायचे काय? मुलं तर एकदमच कंटाळून गेलीत. परिस्थिती खरंच खूपच बिकट. विचार कर-करूनसुद्धा काहीही सुचत नाही. घराघरांतून मानसिक, कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत. जमिनीच्या वादातून आपल्याच रक्ताच्या नात्यांचे खून पाडले जात आहेत. दारूसाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक नदी-नाल्यांकडे धाव घेतात खरे पण तिथेही पार्ट्यांच्या नावावर अस्वच्छता, प्लॅस्टिक, बिअर-दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. हे असे सगळे चित्र स्पष्ट होताना खूप कमी लोक विचारपूर्वक, कृतिशील जीवन जगताना दिसतात. अशी कृतिशील पावलेच तर या अशा खडतर परिस्थितीत आगळीवेगळी प्रेरणा बनतात. यावेळी आपण जर पाण्याच्या प्रवाहाचा विचार केला तर लक्षात येईल, की प्रवाही असलेल्या पाण्याला बांध घालून अडवून बघा, ते थांबणार नाही, आपली वेगळी वाट शोधून आणखीन गतीने धावणार.. आपण तर माणसे आहोत. आम्हीच समस्या निर्माण करायच्या, आम्हीच त्यात गुंतायचे आणि वरून ताणही स्वतःच्या डोक्यावर घेऊन जगायचे.. हे असेच कशाला चालू ठेवायचे. जरा कृतिशील, सतर्क, सजग होऊन जगून बघुया ना… थोड्या दिवसांसाठी ही परिस्थिती आहे असाच सकारात्मक विचार करूया. जीवनशैली बदलुया. या सुट्टीत खूप काहीबाही करता येते अशी काही उदाहरणे समोर आहेत माझ्या की ज्यांनी अतिशय सुयोग्य वापर केला या सक्तीच्या सुट्टीचा.

एक म्हणजे नीता आणि तिचा नवरा समीर. नीता शिक्षिका, तर समीर सरकारी नोकरीत स्थिरावलेला. सुट्टी आरामात घालवता आली असती, तरीदेखील त्या दोघांनीही मिळून भाजीपाल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. निगुतीने व मेहनतीने शेतीचा अनुभव नसतानाही परिश्रमपूर्वक लळा लावून मळा पिकविला आणि अतिशय माफक दरात घराघरांत भाजी उपलब्ध करून दिली. या उभयतांकडून मग अनेकांनी प्रेरणा घेतली.

रुपेशाचे घर तर पंधरा-वीस जणांचे मोठे कुटुंब. कामधंद्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागात स्थिरावलेले. सर्व सदस्यांनी लॉकडॉऊन काळात योग्य निर्णय घेऊन सर्वानुमते ठरविले की गावात राहायचे. सणासुदीला हे कुटुंब गावी एकत्र गुण्यागोविंदाने सण साजरे करायचेच. आताही त्यांनी तोच निर्णय घेतला. कामाची विभागणी केली. मुलांसाठी खास वेळेचे नियोजन करून त्यांना छोटी छोटी कामे कशी करायची हे शिकविले. त्यात बागकाम होते. झाडांना पाणी घालण्यापासून ते त्यांची देखभाल कशी करायची याचेही प्रात्यक्षिक होते. घराच्या मागच्या बाजूने जी मोकळी जागा होती त्यात भाजीच्या लागवडीसाठी छोटे छोटे वाफे करून बियाणी रुजत घातली. बिया कोणत्या भाजीच्या आहेत, ते कसे ओळखायचे, त्या रुजत कशा घालायच्या हे शिक्षण दिले. बिया मुलांमध्ये वाटून देत त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. कोणाची भाजी बहरेल त्याला बक्षीसही जाहीर केले. स्वयंपाकघरातील बर्‍याचशा पदार्थांची, वस्तूंची ओळख मुलांना झाली. लसूण, कांदे सोलणे, घासून ठेवलेली भांडी पुसून ती जागच्याजागी ठेवणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, जेवलेले ताट घासणे, कपडे व्यवस्थित घडी करून कपाटात ठेवणे… एक ना दोन… कितीतरी कामात मुलांना गुंतवून ठेवले. त्यात त्यांच्या वाचन- लेखनाचा सरावही चालूच होता. घरातील महिला वर्गानेही ऑनलाइन राहत विविध खाद्यपदार्थ करणे, तसेच नृत्य, नाट्य, व्यायाम आदी उपक्रमात विशेष रुची दाखविली. दर दिवशी ताटात एखादातरी वेगळा पदार्थ ही खासियत ठरली. या कुटुंबाने सहज म्हणून स्वतःला, मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी वेळेचा कलात्मक वापर केला. त्यामुळे प्रत्येक दिवस वेगळी ओळख घेऊन उगवतो. मुलांवर कृतिशील संस्कार करता आले. त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळाला. समूहाची सवय जडली. शिक्षण -संस्कार एकमेकांना परस्पर पूरक ठरले.

अनपेक्षित मिळालेला हा दीर्घ विसावा आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा असेल तर असे अनेक उपक्रम घरच्याघरी राबविता येतात. किचन किंवा टेरेस गार्डन, घराच्या सभोवताली मोकळी जागा असेल तर तिथे भाजीपाला लावणे. नाही म्हटले तरी हॉटेल्समध्ये जाऊन बसून खाणे, पार्टी करणे आता निषिद्ध आहे. बाहेरच्या चमचमीत पदार्थांना चटावलेली जीभ आता घरीच बनविलेल्या पदार्थांना आपले मानायला लागलेली दिसते. केक, पिझ्झा करण्यासाठी तर खूप मुले, महिला तरबेज झाल्या, मात्र आपले पारंपरिक खाद्यपदार्थ करण्यामध्ये अनास्थाच दिसत आहे. या सुट्टीत भूकलाडू- तहानलाडू, जुने पदार्थ करणे शिकता येतात. जीवनाला शिस्त हवी त्यासाठी न चुकता घरातील सर्वच सदस्यांनी व्यायामाची सवय लावून त्यानुसार दिनक्रम ठरवता येतो.

मुलांना लेखन, वाचन, चित्र काढणे यात व इतर कलांमध्ये गुंतवून ठेवता येते. जुन्या कपड्यांपासून नवीन कलात्मक वस्तूंची निर्मिती करणे- जसे की गोधडी, रजई, पायपुसणी, आकर्षक बटवे, पिशव्या, इ वस्तू शिकून करता येण्यासारख्या आहेत. क्राफ्ट, ओरिगामी शिकता येते. जुन्या नाटकांच्या, चित्रपटांच्या सीडी असतील तर त्या बघून ज्ञानात भर घालता येते. घराची अंतर्गत सजावट बदलवणे, तंत्रज्ञान वापरून वेगळे काहीतरी शिकणे हे सरावाने जमविता येते. वेदांत खूप हुशार, पण त्याची हुशारी दंगामस्तीत वाया जायची. शुभदाने त्याला सुट्टीत युट्युब चॅनलसाठी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात गुंतवून ठेवले. ऍस्ट्रॉनॉमीची आवड त्याने जतन केली. कार्तिकला अभ्यासापेक्षा मातीची ओढ जास्त, त्याला झाडांची निगा राखण्याचे काम सोपविले. छोटी अवनी नृत्यात समरस होते. असे एक ना अनेक उपक्रम करून सुट्टी खूप सुंदर सजविता येते. सक्तीची सुट्टी कधी संपणार सांगता येत नाही, मात्र आपल्या मनात अभंग जिद्द असेल आणि जीवनाकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन असेल तर ‘हेही दिवस सहज जातील’ ही अशी सकारात्मकता आपल्याला या परिस्थितीतून तावून सुलाखून ताजेतवाने होत बाहेर पडण्याचे बळ निश्चितच देईल!