– पौर्णिमा केरकर
छंद, आवडीनिवडी, राहून गेलेले खूप काही करता येते नव्याने… डोळसपणे, सकारात्मक भावनेने जगता येते. आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आपत्तीशी लढताही येते. हा पॉज त्याचसाठी आहे… तो आहे तोपर्यंत पानांची सळसळ, नदीची खळखळ मनमुराद हृदयी साठवूया.
तिन्हीसांजेला माडाची झावळी वरून उतरून अंगणात काहीशी स्थिरावली. तुळशीवृंदावनाच्या सभोवताली रेंगाळत असतानाच माझं तिच्यावर लक्ष गेलं. खरंतर तिला ऐन बहरात आलेल्या चिकूच्या झाडाशी सलगी करूनच गॅलरीतून घरात प्रवेश करायचा होता असे एकूणच तिच्या त्या रेंगाळण्यातून माझ्या लक्षात येत होते. चिकूचे झाड सर्वांगाने मोहरून उठले आहे. परवाच एक छोटासा बोटभर लांबीचा, पांढुरक्या पोटाचा, गोरब्या अंगाचा पक्षी घरट्यातून पडून जखमी झालेला. विठ्ठल त्याला घेऊन घरी आला. अगदीच नवजात बाळ. जगण्याची आशा नव्हतीच, तरीही तो त्याला जपत होता. गॅलरीतील चिकूच्या झाडाखाली एका खोक्यात त्याने त्याला ठेवले होते. समृद्धी, छोटी अवनी, कार्तिक सगळीच आळीपाळीने त्याला जपायची. त्याचवेळी तिन्हीसांजेला पिल्लाची आई तिथे घिरट्या घालू लागली. तिची ती घालमेल मला स्पष्ट दिसत होती.
तिच्या येण्याने त्या दिवशीची तिन्हीसांज मला जवळून अनुभवता आली. घराच्या मागच्या बाजूचा कदंब तर तिची सगळीच किरणे आपल्या फांद्यांवर ओढून घेत निवांत झाला होता. त्याच्या त्या पानांच्या जाळीतून पलीकडील वाघेरी डोंगर काळोखाशी समरस होत होता. भारद्वाज तर माझी चाहूल लागताच पंख फडफडवीत गेला. असे म्हणतात की भारद्वाज नजरेसमोर दिसला तर मनात योजलेली कामे पूर्णत्वास जातात. त्या क्षणी तर माझं मन रिकामीच होतं. एव्हाना काळोख घरभर पसरला. चिमणीचा चिवचिवाटही थांबला. वार्याची हलकी झुळूक चिकूच्या पानापानांतून सळसळत गेली. यावेळी चिकू सर्वांगाने मोहरून उभा होता. गेली दोनतीन वर्षे तर त्याचा बहरच फक्त अनुभवला; बाकी सगळेच वानर, माकडाच्या भक्ष्यस्थानी पडत असत. हल्ली रस्ता सुन्न झाल्यापासून माकडांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळविला असावा. अवनी चिकूच्या आशेने झाडाकडे पाहात बसते, त्याच्याशी बोलत असते. मध्येच तिचा लक्ष त्या जखमी पिल्लाकडे गेला. गॅलरीत काम करीत असलेल्या विठ्ठलाकडे पाहून डावा हात कमरेवर तर उजव्या हाताचे बोट ओठावर ठेवून ‘‘भैय्या, चूप पक्ष्याक डिस्टर्ब करू नाका हां. निदलो तो. हांव वयता आता हां. चिकूचे झाड फाल्या माका चिकू दितले, तुका दिता हा चिकू, आता निद तू हां, बाय.. बाय पक्ष्या…’’ असे म्हणून ती तिथून निघून गेली. चिकू आत्ताच तर कोठे फुली फुलून आलेला… अजून त्याला फळं धरायची आहेत. शिवाय माकडांची भीती आहे. पण या सार्या बाबतीत अवनी मात्र अनभिज्ञच आहे. तिचा आनंद तिच्या निरागस विचारात आहे… ती निरागसता माझ्या मनाची तर केव्हाचीच मागे राहून गेली. आता नितळ स्वप्नातही रंगता येत नाही. समोर वास्तव उभे ठाकते… आणि सुखाच्या घासालाही अस्वस्थतेची किनार देऊन जाते.
मी मागच्या गॅलरीत कठड्यावर बसून काळोखाशी सलगी करू पाहणार्या कदंबाला न्याहाळत राहते. चांदण्यारात्रीचे त्याचे दिसणे, स्मशानभूमीत वाकलेल्या त्याच्या फांद्या मला जगण्याचे वास्तव शिकवितात… वाघेरीची धीरगंभीरता माझे मनोबल वाढवते… कदंबच्या पानांनी भरलेल्या फांद्यांची नक्षी गॅलरीच्या भिंतीवर चितारली जाते. तिकडे समृद्धीने माझे लक्ष वेधते. तिला ती सावल्यांची जाळीदार नक्षी कॅमेर्यात बंदिस्त करायची होती. ती तसा प्रयत्नही करत होती. पण त्या नक्षीचा फोटो मात्र घेता येत नव्हता. तिला फक्त डोळे भरून पाहायचे.
नजरेच्या कॅमेर्यात बंदिस्त करूनच ती शांतपणे एकटक भिंतीवरच्या चित्रांशी समरस होते. मध्येच तिची तंद्री भंग पावते… म्हणते ‘आई आई, नदीचा आवाज ऐक. मी मघापासून या आवाजाचा विचार करीत होते पण लक्षातच आलं नाही. आता कळले, ती नदीच आहे. दिवसाच्या कोलाहलात तिचं संगीत ऐकायचं राहूनच जातं.’ पण ती पुढे म्हणते पण मी तर याही पूर्वी बर्याच वेळा मध्यरात्र उलटून गेली तरीही इथं शांतपणे बसून असते, तेव्हा कसा कधी ऐकू गेला नाही आवाज? …आज ती काहीतरी बोलू पाहात होती, सांगू पाहत होती. गोंगाट नाही गोंधळ नाही, नाही कसली असोशी… रोज रोज ती कंटाळली असावी ऐकून ऐकून घरोघरच्या कहाण्या… कधी वेदनेच्या तर कधी चहाड्या… बारा गावच्या बारा भानगडी… दुःख पोटात रिचवून रिचवून ती मूक झालेली असावी. आता जरा कोठे मोकळा श्वास घेत विचार करीत तंद्रीत ती खळाळत असावी. तीही आश्चर्यचकीत झाली आहे. अलीकडे कोणच कसे फिरकत नाहीत? तिलाही मोकळेपणा लाभला ऐसपैस पसरण्यासाठी. दगड-धोंडे, वृक्ष-वेली, पशुपक्षी सगळ्या आपल्या सवंगड्यांबरोबरीने ती ही निवांत शांत वेळ घालवीत असावी. तिचा तो हास्याचा खळाळ आता ऐकू आला… रात्र वाढत होती, तिची नादमयता अधिकच जाणवू लागते, आणि अचानकच गच्च भरून आलेले आभाळ समोर दिसते. तरीही मनातळात नितळ एकांताचा सर्जक प्रवास झुळझुळत राहतो. इतक्यात हॉर्नबीलच्या पंखांची फडफड ऐकू येते. कदंब पानांची सळसळ, एक उत्स्फूर्त लहर तरल होत शरीरभर फिरत राहते. कोणीतरी सांगत होते, जंगलातील सगळेच प्राणी अगदी बिनधास्त फिरतात. मौजमस्तीत गुंग असतात. नदीच्या काठी, डेरेदार झाडाखाली, उंच डोंगरावर घोळक्याघोळक्यांनी जमा होत आहेत. त्यांच्या चर्चेचा विषय एकच की माणसांना कशी अद्दल घडली, घडवली हाच असावा. पैसे आहेत, दागिने भरलेत, जमीनजुमला बक्कळ आहे… पण त्या राक्षसाने त्यांचे जीवनच हैराण करून टाकले आहे. मिडास राजाची अति लोभाची गोष्ट माहिती आहेच… तसाच हा स्पर्श… अति तेथे माती करणारा. जन्माला येणारा जीव उघडाच येतो, उघडाच जातो, याची प्रचिती तर या राक्षसाने याचि देही याचि डोळां दिलेली आहे. कळले की पक्षी, प्राणी, झाडे, एकूणच सारी सृष्टी मोकळा श्वास घेत आहे. मी विचार करते, घर तेच, जागाही तीच, झाडे, नदी आपापल्या जागेवरच आहेत… पण आता मला जे दिसतेय, जाणवतेय ते याच्यापूर्वी का बरे जाणवले नाही. नदीचा खळाळता प्रवाह, चिमण्यांचा चिवचिवाट, झाडांची सळसळ, भिंतीवरची नक्षी…
रेंगाळत अलवार पावलांनी गॅलरीतून येणारी संध्याकाळ. धाव धाव नुसतीच धावाधाव… प्रचंड वेग. एकमेकांना मागे टाकून धावण्याची स्पर्धावेळच अपुरी. आज निवांत घरात जगाने पॉज घेतला आहे. उसंत हवी आहे या वसुंधरेला. नाही सहन होत तिला भार.. तीही थकली.. यतीला फक्त ओरबाडून ओरबाडून दुखवलंय म्हणून ती थांबली. थोडा दीर्घ श्वास घेत आहे. हा पॉज स्वत्वाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. खूप खूप मागे अगदी आपल्या जन्मापर्यंत मागे जाता येते.
प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास आठवता येतो. छंद, आवडीनिवडी, राहून गेलेले खूप काही करता येते नव्याने… डोळसपणे, सकारात्मक भावनेने जगता येते. आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आपत्तीशी लढताही येते. हा पॉज त्याचसाठी आहे… तो आहे तोपर्यंत पानांची सळसळ, नदीची खळखळ मनमुराद हृदयी साठवूया.