मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी (८१) यांचे रविवार दि. १७ मे रोजी रात्री निधन झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात तपासणीसाठी ते दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती सकारात्मक आली. त्यामुळे तेथून त्यांना उपचारांसाठी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले.
१९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ‘नाटक’ शिकवले. त्यांनी ‘बालनाटय्’ आणि ‘सूत्रधार’ या संस्था स्थापन करून त्याद्वारे निर्मिती व दिग्दर्शनही केले.
२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’ आणि इतर अनेक नाटके नाट्यरसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’, ‘बकासूर’ या मुलांच्या, तसेच ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटके, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबर्या, बारा लेखसंग्रह, आत्मचरित्रात्मक ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
रत्नाकर मतकरी यांना
मिळलेले पुरस्कार
१९७८ ः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
१९८६ ः उत्कृष्ट पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार), नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
१९८५ ः अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
१९८५ ः राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
१९९९ ः नाट्यव्रती पुरस्कार
२००३ ः संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
२०१६ ः ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
२०१६ ः शांता शेळके पुरस्कार
२०१८ ः साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार