‘अर्जुन’साठी अंकिता, दिविजची शिफारस

0
222

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती अंकिता रैना व दिविज शरण यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी सुचविण्याची किंवा शिफारस करण्याची तयारी अखिल भारतीय टेनिस महासंघाने केली आहे. २७ वर्षीय अंकिताने २०१८ साली आशियाड स्पर्धेत महिला एकेरीचे कांस्यपदक पटकावले होते. तसेच यंदाच्या फेड कप स्पर्धेतही तिने प्रभावी कामगिरी केली होती. तिच्या प्रदर्शनाच्या जोरामुळेच भारताला प्रथमच ‘वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ’ साठी पात्रता मिळवणे शक्य झाले होते. शरण याने जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत आपला सहकारी रोहन बोपण्णासह खेळताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

३४ वर्षीय शरण याने २०१९ मोसमात दोन एटीपी दुहेरी विजेतेपदे मिळवली आहेत. यात रोहन बोपण्णासह जिंकलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र व इगोर झिलेने याच्यासह जिंकलेल्या सेंट पीटर्सबर्ग ओपनचा समावेश आहे. अंकिता व दिविज ही दुकली पुरस्कारांसाठी पात्र व लायक असून या दोघांचे नाव सुचविले जाईल, असे एआयटीएचे सचिव हिरणमॉय चॅटर्जी यांनी सांगितले. रोहन बोपण्णा (२०१८) हा अर्जुन पुरस्कार मिळवणारा शेवटचा टेनिसपटू होता.
डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक नंदन बाल यांचे नाव द्रोणाचार्य किंवा ध्यानचंद पुरस्कारांसाठी पाठवण्याचा विचारही एआयटीए करत आहे. झिशान अली (२०१४), एसपी मिश्रा (२०१५) व नितिन कीर्तने (२०१९) या तिघांनाच ध्यानचंद पुरस्कार लाभला असून द्रोणाचार्य पुरस्कार अजूनपर्यंत एकाही टेनिस प्रशिक्षकाला मिळालेला नाही.