बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमधील कोरोना विभागात संशयित एका रुग्णाला काल दाखल करण्यात आले. या विभागात ४ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये १ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.
गोमेकॉच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या १११ नमुन्यांपैकी ५६ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून सर्व ५६ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ५ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या प्रवाशांच्या यादीनुसार १४ प्रवाशांना २८ दिवसांसाठी होम क्वारंटाईनखाली आणण्यात आले आहे. होम क्वारंटाईनखाली आणलेल्याची संख्या १७८७ एवढी झाली आहे.
राज्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची माहिती केंद्र सरकारकडे पाठविली जाते. केंद्राकडून राज्यातील कोविड १९ परिस्थितीचा आढावा घेऊन झोन निश्चित केला जातो, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.