– प्रमोद आचार्य
आतंकवाद आणि गोवा हे आता नेहमीचेच समीकरण झालेले आहे. गोव्यात बॉम्बस्फोट झालेले नाहीत, गोळीबार झालेला नाही किंवा मूलतत्त्ववादी संघटनांनी इथे पायाही रचलेला नाही. मात्र पकडला गेलेला प्रत्येक आतंकवादी गोव्याचं नाव घेतोच. एकतर तो गोव्यात फिरण्यासाठी आलेला असतो वा हल्ल्याचा कट रचण्यासाठी. काही दिवसांआधी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागानं देशभर छापे मारून १७ संशयीत आतंकवाद्यांना ताब्यात घेतले. त्यातल्या ११ जणांना कर्नाटकमध्ये अटक झाली. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक तशीच गंभीर आहे.
सादिक लश्करी आणि हुसेन बह्याती नावाच्या या दोन संशयीत आतंकवाद्यांनी ते वारंवार गोव्यात कसे यायचे, इथे कसे राहायचे, इथे त्यांचे नातेवाईक कसे आहेत आणि इथल्या तरुणांशी दोस्ती वाढवून आपला नेटवर्क स्थापन करण्याचे त्यांनी कसे प्रयत्न केले याची सविस्तर माहिती पोलिसांना दिलेली आहे.
विशेष चिंतेची बाब म्हणजे इंडियन मुजाहिदीन या भयंकर आतंकवादी संघटनेचे सह-संस्थापक रिजाय आणि यासिन भटकळही त्यांच्याबरोबर कशा गोव्याच्या वार्या करायचे याची इत्थंभूत जबानी त्यांनी दिलेली आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रिजाझच्या बहिणीचं लग्न गोव्यात झालंय. सादिकची बहीणही गोव्यात राहते. त्या निमित्ताने ते सगळे गोव्यात ये-जा करायचे. यासिन आणि रिजाझ हे दोघेही भाऊ गेल्या वर्षी मुंबईत ओपेरा हाउसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटसाठी वॉन्टेड आहेत.
दुसरी गोष्ट गोवा पोलिसांनी अटक केलेल्या अफझल खान या संशयित आतंकवाद्याची. त्याच्याकडे पोलिसांना पाच सिम कार्डे सापडली. पुण्याचे काही कॉन्टॅक्टस मिळाले आणि हल्ला करण्यासाठी तो गोव्यातील पर्यटन, गर्दीच्या आणि धार्मिक ठिकाणांचा अभ्यास करत होता हे सांगणारा साक्षीदार मिळाला.
तपासानंतर असं लक्षात आलं की त्याच्याकडे जी सिम कार्डस सापडली त्यातलं एकही सिम कार्ड त्याच्या नावावर नाहीय. ज्यांची नावे आणि पत्ते दिलेत ते अस्तित्वातच नाहीयेत. त्यातला एक पत्ता पर्वरीचा आहे तर दुसरा फक्त उत्तर गोव्याचा.
पोलिसांना जबानी देतानासुध्दा त्याने आपली माहिती पुन्हा-पुन्हा बदलली. आज एक तर उद्या भलतंच, आज असं तर उद्या तसं अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या जबानीतून त्याचा ऑगस्टमध्ये झालेल्या पुणे बॉम्बस्फोटांशी संबंध असू शकतो हा संशय बळावला.
पण गोवाच का?
पोलिस खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकार्यांच्या मते याची दोन कारणे आहेत.
पहिलं कारण – बहुतेक आतंकवादी गोव्यात विश्रांतीसाठी येतात. त्यांनाही गोवा आवडतो.
हे वाचून अनेकांच्या चेहर्यावर स्मितरेषा उमटून जाईल. पण खरं आहे. देशभर आतंकवादी कारवाया करायच्या आणि वास्तव्यासाठी गोव्यात यायचं. काही महिने थांबायचं आणि नंतर पुन्हा आपला कार्यभाग साधण्यासाठी देशभर फिरायचं ही त्यांची पध्दत आहे.
दुसरं कारण- दुसरं कारण सरळ-सरळ आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. इथे देश-विदेशांतून पर्यटक येतात. गोव्यात जर विदेशी पर्यटकांवर हल्ले झाले तर संपूर्ण जगाचं लक्ष तिथं वेधलं जाईल. आतंक तयार करण्याचा त्यांचा उद्देश सफल होईल. (उदा- बाली बॉम्बहल्ले)
मग आजपर्यंत गोव्यात हल्ले करण्याचे त्यांचे मनसुबे का धुळीला मिळाले?
गोवा हा लहान प्रदेश असल्याने बहुतेक लोकं एकमेकांना ओळखतात. कुणी संशयास्पदरीत्या वावरत असताना दिसला तर लगेच पोलिसांना सांगतात. काही अल्पसंख्यांक गटांमध्ये प्रक्षोभक भाषणं करणारेही अनेकजण येऊन गेले. मात्र त्यांना त्याच धर्मातील लोकांनी विरोध करून हाकलून लावले.
हे चित्र दिलासादायक दिसलं तरी ते नेहमीच असंच राहणार याची मात्र शाश्वती नाही.
आतंकवादी जर पर्यटकांच्याच रूपात येऊ लागले तर आपण काय करणार? आपली लोकं त्यांना ओळखणार नाहीत आणि अशा प्रवृत्तींना विरोध करणेही आपल्याला जमणार नाही. मग करायचं काय? चुकून कुणीतरी आपलाच त्यांना फितूर झाला तर? म्हणूनच यावर कायम स्वरूपी तोडगा हवा. याला परत दोन उपाय आहेत.
पहिला उपाय- कुठल्याही आतंकवादी संघटनेला जर गोव्यात पाय रोवायचे असतील वा हल्ले घडवून आणायचे असतील तर स्थानिकांच्या सहभागाशिवाय आणि मदतीशिवाय ते शक्यच नाही. म्हणूनच कुठलीही आतंकवादी संघटना कुठल्याही ठिकाणी हल्ले करण्याआधी त्या प्रदेशातल्या लोकांशी मैत्री करून शक्य तेवढी माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. शक्य असेल तर स्थानिक तरुणांनाच हल्लेखोर बनवते. स्थानिकांची रसद नसेल तर त्यांची मोहीम फत्ते होऊच शकत नाही. म्हणूनच एक नागरिक या नात्याने आपण सजग असलं पाहिजे.
वास्कोतील एका नागरिकाच्या समंजसपणामुळेच अफझल खान या आतंकवाद्याला पकडणे गोवा पोलिसांना शक्य झाले. महत्त्वाचे म्हणजे अल्पसंख्याकांविरुद्ध या देशात कसे अमानुष अत्याचार होतात याचे खोटे चित्र तयार करून अफजल खान त्या स्थानिक मुस्लिम बांधवाला चिथावण्याचा प्रयत्न करत होता. त्यांची दुसर्यांदा भेट झाली तेव्हा त्याने गोव्यातील गर्दीच्या व धार्मिक ठिकाणांबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याक्षणी त्या मुस्लीम बांधवाने पोलिसांना याविषयी माहिती द्यायचं ठरवलं आणि मोठा अनर्थ टळला. म्हणजे अशा कारवाया रोखणे सगळ्यात आधी आपल्या हातात आहे.
हे फक्त मुस्लिम बांधवांच्याच बाबतीत होतं असं नाही. गोव्यात काही हिंदू उग्रवादी संघटनाही मूळ धरू लागल्या आहेत. दुसर्या धर्माच्या आतंकवादाचा आणि हिंसाचाराचा बागुलबुवा करून आपल्या धर्माच्या माणसांना भडकावण्याचा धंदा ते करतात. गोवेकर फार समंजस आणि शांतताप्रिय असल्यामुळे सध्यातरी त्यांना हे शक्य झालेलं नसलं तरी आपण निश्चिंत राहूच शकत नाही.
दुसरा उपाय- सध्याचे पोलिस महासंचालाक किशन कुमार यांना एक कार्यक्षम आणि कल्पक अधिकारी म्हणून ओळखलं जातं. गेल्यावेळी जेव्हा ते गोव्याचे पोलीस महानिरीक्षक होते, तेव्हा त्यांनी एक अभिनव योजना अमलात आणली होती. पोलीस खाते त्याला बिट सिस्टम म्हणायचे. ही बिट सिस्टम नेहमीच्या बिट सिस्टमपेक्षा वेगळी होती.
दर पोलीस शिपायाला एकेक प्रदेश वाटून दिला होता. त्या कॉन्स्टेबलचं एक साधं काम होतं. त्या भागातील लोकांशी त्यांने संपर्क वाढवायचा. त्यांचा विश्वास संपादन करायचा. तरुणांशी मैत्री करायची आणि आपलं स्वतंत्र नेटवर्क तयार करायचं. यानं होणार काय तर दरेका कॉन्स्टेबलचा एकेका भागात स्वतःचा नेटवर्क तयार होणार. त्या भागात जर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिरकाव केला तर त्याची त्याला लगेच माहिती मिळणार. काही संशयास्पद व्यक्ती फिरत असल्या तरी त्याला त्याची बित्तंबातमी माहीत असणार. लोक स्वतःहून त्याला माहिती पुरवणार.
फक्त आतंकवादी कारवायांसाठीच नाही तर अशा नेटवर्कचा साधे भुरटे चोर आणि दरोडेखोर पकडण्यासाठीसुध्दा उपयोग होऊ शकतो. लोकांच्या दृष्टीने विचार केला तर दरेकाकडे आपापल्या इलाक्यातील कॉन्स्टेबलचा नंबर असेल. उद्या काही विपरीत घडलं तर तो माणूस सगळ्यात आधी त्या कॉन्स्टेबलला फोन करेल. तो कॉन्स्टेबल त्याच्यासाठी पोलीस स्टेशनपेक्षा जवळचा कॉन्टॅक्ट बनेल. मित्र बनेल.
पण त्यावेळी किशन कुमारांची बदली झाली आणि ही बीट सिस्टमही कोलमडली.
आता पुन्हा अशी व्यवस्था नव्याने बांधून काढण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला ते इंटिग्रेटेड पुलिसिंग म्हणतात. म्हणजे पोलिसांचे सगळे विभाग समन्वयाने काम करतील. एकाच गोष्टीवर दोन वेगवेगळे विभाग शक्ती खर्चणार नाहीत. नेटवर्किंग, पेट्रोलिंग, इन्वेस्टिगेशन, इंटलिजन्स आणि सर्वेलन्स या पाचही गोष्टी सहज होतील. संख्याबळ कमी असलं तरी ताण वाटून जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्था स्थिर राहील.
याचाच अर्थ जर आतंकवादाचा मुकाबला करायचा असेल तर फक्त तपास यंत्रणांवर अवलंबून चालणार नाही. आपण स्वतः सतर्क रहावं लागेल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्या देशातील वा पाकिस्तानातीलच नव्हे तर अल-कायदासारख्या बलाढ्य आतंकवादी संघटनेची गोव्यावर नजर आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने मला एकदा सांगितलं होतं- आतंकवादाचे कट रचणार्यांकडे तपास यंत्रणांना शह देण्यासाठी अनेक क्लृप्त्या असतात. आमच्याकडे मात्र एकच असते- त्यांना शोधून काढण्याची.
टीव्हीवरच्या सिरियलमध्ये किंवा सिनेमात आतंकवादी एकतर हिरोपेक्षा अडाणी असतात वा काही ना काही सुराग सोडून जातात. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही आणि आपली मान काढून अलगद पोलिसांच्या हातात देण्याएवढा कुठलाही आतंकवादी खुळचट असेल हे मानणेही भाबडेपणाचे ठरेल. म्हणूनच जेवढे कट उद्ध्वस्त करता येतात, जेवढ्या आतंकवाद्यांना पकडता येतं तेवढ्या सगळ्यांना पकडणे आणि त्यासाठी शक्य ते सगळे मार्ग वापरणे हा एक भाग सोडला तर आपल्या हातात काहीच राहत नाही.
जेव्हा बॉम्बस्फोट होतो तेव्हा आपण सगळ्यात आधी इंटलिजन्सवर बोट ठेवतो. पण जेव्हा एखादा आतंकवादी पकडला जातो तेव्हा इंटलिजन्सने किती चांगली कामगिरी केली यावर कुणी बोलत अथवा लिहीत नाही. इंटलिजन्स खरंच कोलमडलं असतं तर या देशात चारऐवजी वर्षाला ४० हल्ले झाले असते.
मात्र अमेरिका-ब्रिटनप्रमाणे सुरक्षेचे सर्व निकष कोटेकोरपणे पाळणे आपल्याला सध्यातरी शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर अमेरिका एका विशिष्ट धर्माच्या रहिवाशांना सतावते असा आरोप संपूर्ण जगाने केला. पण अमेरिकेने काय केलं? त्यांनी अशा कुठल्याही आरोपाची काहीच तमा बाळगली नाही. आपल्याला हे परवडणार का? नक्कीच नाही. म्हणूनच ९-११ नंतर तिथे एकही हल्ला झाला नाही आणि आपले वर्षाला तीन-चार तरी हमखास होतात. जेव्हा सुरक्षेच्या सर्व यंत्रणा व निकष परवडणारे नसतात तेव्हा चार हल्ल्यांचं ओझं घेऊन मुकाटपणे जगणं आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं. आणि म्हणूनच आपली स्वतःची सजगता कुठल्याही सुरक्षा यंत्रणेपेक्षा दहा पटीने जास्त आतंकवादी हल्ले रोखू शकते.