खासगी इस्पितळे, दवाखाने सुरू करावेत

0
238

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन; संशयित आढळल्यास गोमेकॉत पाठवावे

 

राज्यातील खासगी हॉस्पिटल, दवाखाने, डॉक्टरांनी  आवश्यक खबरदारीची  उपाय योजना करून ओपीडी विभाग सुरू रुग्णसेवेला सुरुवात करावी. एखादा कोविड-१९ चा संशयास्पद रुग्ण आढळून आल्यास त्याला गोमेकॉत पाठवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केले.

आरोग्य खात्याने घरात क्वारांटाईन केलेल्या व्यक्तीच्या घरावर कोरोना होम क्वारंटाईन असे स्टिकर लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. होम क्वारांटाईन केलेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी सावध राहावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मडगावात सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या तक्रारी, सूचना जाणून घेतल्या. कोविड हॉस्पिटलमधील सर्वांना  आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

५५ संशयितांचे नमुने पुण्याला

५५ कोरोना संशयित रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

विदेशात बोटीवर काम करणार्‍या सात ते आठ हजार खलाशांना परत आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला  जाणार आहे. राज्यातील जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी घाऊक किराणा व्यापार्‍यांशी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. सुमारे ८८ मालवाहू ट्रक विविध प्रकारचे सामान घेऊन राज्यात दाखल झाले आहे. राज्यातील औषधांच्या टंचाईवर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. राज्यात  पशुखाद्याचा पुरवठा सुरळीत करण्याची सूचना पशुवैद्यकीय खात्याला करण्यात आली आहे. कामगार वर्गाला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यात येत आहेत. असेही त्यांनी सांगितले.

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील शक्य असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

गोमेकॉत आणखी

१६ संशयित रुग्ण

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या खास वॉर्डात १६ संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून संशयितांची संख्या ३२ झाली आहे. आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी ९ जणांनी नोंदणी केली आहे.

गोमेकॉत २० चाचण्या

दरम्यान, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी माहिती देताना गोमेकॉतील कोरोना संशयित २० रुग्णांच्या चाचण्या केल्या असून त्यातील ४ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. २ अहवाल प्रतिक्षेत असून उर्वरित १४ जणांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

६२ कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कालच्या ६ नमुन्यांपैकी ४ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. तर, २ नमुन्यांचा अहवालाची प्राप्त झालेला नाही, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांना मडगाव रेसिडेन्सीमध्ये क्लारांटाईऩ करून ठेवण्यात आले आहेत. ओल्ड गोवा रेसिडेन्सीमध्ये १४, फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये ६, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये ३ जणांना क्लारांटाईऩ करून  ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.