>> लखनौतील पार्टीमुळे अनेकांना धाकधूक
गायिका कनिका कपूरने लखनौमध्ये उपस्थिती लावलेल्या एका पार्टीने प्रत्येकाची धाकधूक वाढवली आहे. कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही या पार्टीला उपस्थित होत्या. त्यांचे चिरंजीव खासदार दुष्यंत सिंहदेखील पार्टीला होते. कनिका कपूर कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे.
कनिका कपूर ही १५ मार्च रोजी एका पार्टीत सहभागी झाली होती. बसपा नेते अकबर डंपी यांनी ही पार्टी आयोजित केली होती. तिला अनेक नेत्यांची उपस्थिती होती. त्यामुळे कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची धाकधूक वाढली आहे. कनिका कपूरनंतर तिच्या कुटुंबीयांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.