रविवारी देशात ‘जनता कर्फ्यू’

0
164

>> पंतप्रधानांचे कोरोनासंदर्भात देशवासीयांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरूवारी कोरोनासंदर्भात देशाला संबोधित करताना येत्या रविवारी दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत स्वेच्छा संचारबंदी अर्थात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात बोलताना, जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध होय. याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मी देशवासीयांकडे करत असल्याचे सांगितले.

शुक्रवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी यांनी, यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असे मोदींनी म्हटले आहे.

मी आज १३० कोटी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप कोरोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसेच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासीयांची चिंता वाढत आहे आणि ते स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेले हे संकट सामान्य नाही. प्रत्येकाने संयम ठेवत केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे.
पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा कोरोनामुळे होतो आहे असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागच्या दोन महिन्यांपासून आपण कोरोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचे मला कौतुक वाटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे वातावरण तयार झाले की, आपण संकटापासून सध्या वाचलो आहोत. सगळे काही ठीक आहे, मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी आवाहन केले आहे.

साठेबाजी करू नका
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी बाजार, दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती असून नागरीक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी साठेबाजी करु नका. दूध, औषधे आणि अन्न याची कमतरता निर्माण होणार नाही. त्यासाठी आवश्यक पावले आम्ही उचलली असल्याचे सांगितले.

अत्यावश्यक सेवा देणार्‍यांचे
२२ रोजी कौतुक करा
२२ मार्चला संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटे अत्यावश्यक सेवा देणार्‍या सगळ्यांचं कौतुक करा. आपल्या घराच्या दरवाजात, दर्शनी भागातील खिडकीत किंवा गॅलरीत तुम्ही या आणि अत्यावश्यक सेवा देणार्‍यांचे कौतुक करा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. उजतखऊ-१९ नावाच्या खास टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे असेही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे संकट संपले असं समजून चालणे चुकीचे आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी म्हणजेच ६० ते ६५ वर्षे वयावरील व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे. असेही आवाहन मोदींनी यावेळे केले.