- पौर्णिमा केरकर
प्रसन्न, समाधानी जीवन हेच तर सुखी, ताणविरहित जगण्याचे सार. स्वतःची शक्ती ओळखा आणि समाज परिवर्तनाचा डोळस दृष्टिकोन बाळगून नवी सर्जक, सुशील पिढी घडविण्यास कटिबद्ध व्हा! महिलादिनाच्या निमित्ताने आपण सार्यांनी सर्जक भरारी घेऊया!
वॉशरूमच्या दरवाजावरच ती फरशी पुसण्याच्या तयारीत उभी होती. साधीसुधी सुती साडी नेसलेली. गरीब चेहरा करून. अशा साफसफाई करणार्या महिलांना पाहून बरेचजण नाक मुरडतात. स्वच्छतेचे काम आणि ते करणारी माणसे पाहून भौतिक सुख म्हणजे प्रतिष्ठा असे मानणार्या माणसांच्या वर्तुळात तर अशी साफसफाई करणारा वर्ग खिजगणतीतही नसतो. ती तशीच गरीब चेहर्याने काम निमूटपणे करीत होती.
मी तिच्याजवळ जाऊन उभी राहिले ते तिच्या काहीक्षण लक्षातच आले नाही. जेव्हा तिला चाहूल लागली तेव्हा ती मागे सरली. मला आत जाण्यासाठी वाट करून देताना आवर्जून म्हणाली, ‘मी ओळखलं तुम्हाला. तुमचे वर्तमानपत्रात येणारे लेख वाचते मी’ असे म्हणून तिनं मला ‘तुम्ही त्या दिवशी जाणत्या, म्हातार्या झालेल्या महिलांची वेदना व्यक्त करणारा लेख लिहिला तो वाचला. खरं सांगते, मी खूप रडले. जाणती मनशा आता कोणाक नाका’ असे म्हणत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि परत कामाला लागली. मी हळूच बघितले तर ती पदराने डोळे पुसत होती.
जास्त शिक्षण न झालेली ती एक सर्वसामान्य स्त्री. एक महिला, आईबाबांची मुलगी, नवर्याची बायको आणि मुलाची आई अशा तिच्या विविध टप्प्यांवरील प्रवासात ती वैविध्यपूर्ण भूमिका निभावत पुढे जाते. वय वाढते. परंपरेच्या चौकटीतील तिचा प्रवास सतत चालूच. तिला वेळच नसतो स्वतःचा विचार करण्यासाठी. जेव्हा हातपाय थकतात, मन अगतिक, असहायता बनते तेव्हा जाणिवा जाग्या होतात. छळतात. यातना होतात. मनाचे क्लेश जगण्याचे स्वास्थ्य हरावून नेतात. मुलांचे स्वतंत्र विश्व, त्यात ‘ती’ नसते.
तिच्या सरून गेलेल्या तरुण दिवसांच्या आठवणींचे गाठोडे तिच्यासोबत असते. ते ऐकण्यासाठीसुद्धा आयुष्यात कोणी सहजपणे आपला वेळ देत नसतो. मुलं मोठी होतात. त्यांची लग्ने, त्यांची मुले या व्यापात सगळ्याच हौसामौजा बाजूला राहतात. आणि मग आयुष्यात बरंच काही कळत जातं तेव्हा मात्र एकटेपणा खायला उठतो. मुलांसाठी आम्ही काय काय केले, कसे रात्रीचे दिवस करून त्यांना वाढवले; पण ती मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करतात, ही असहायता मनाला हादरवून टाकते. परिणामी वयाने वाढलेले पालक आणि मध्यमवयीन मुले यांच्यात दरी निर्माण होते. ती मग वाढतच जाते. ही या साध्यासुध्या गृहिणीची फक्त एकटीची कहाणी नसून आज घराघरांत तीच परिस्थिती दिसते.
अशीच एक शिक्षिका असलेली माता मुलाला अजिबात वाचताच येत नाही अशी तक्रार घेऊन आली. मी तिला विचारले, ‘‘तुम्ही घरी किती वर्तमानपत्रे विकत घेऊन वाचता?’’ त्या म्हणाल्या ‘आम्ही एकही वर्तमानपत्र विकत घेत नाहीत, एवढेच काय मी तर गेल्या बारा वर्षांत वर्तमानपत्र हातात घेऊन वाचलेही नाही. मुलांना शाळेत ज्ञानदान करणारी व्यक्तीच जेव्हा असे सांगते तेव्हा मग याला काय म्हणायचे? मुलं अनुकरणातून, अनुभवातून शिकत असतात. या अशा सभोवतालातून त्यांना काय गवसणार? ही दोन्ही समाजचित्रे आपल्याला काय शिकवतात? समाजमनाची सक्षमता ही विचारावर आणि तेही प्रगल्भ विचारसरणीवर अवलंबून असते. शाळा-महाविद्यालयात जाऊन आपण शिकतो म्हणजे डिग्री घेतो. जी नोकरीसाठी गरजेची असते. मात्र प्रत्यक्षात जीवन कसे जगावे याचे ज्ञान अनुभवातूनच प्राप्त होते. पण असे विचित्र अनुभव घेत जर पिढी वाढू लागली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतीलच. या दोन्हीही स्त्रियाच! एक कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारी. साध्या सहज जगण्यातील चढ-उतार, मुलांकडून होणारी उपेक्षा सहन करीत आयुष्याला स्वाभिमानाने पुढे नेणारी, तर दुसरी स्पर्धा परीक्षांच्या जगात पुस्तकी शिक्षणाची प्रतिष्ठा मानणारी. त्यासाठी मुलाला जीवन खंबीरपणे जगण्यासाठी लागणारे सकारात्मक संस्कारी शिक्षण नाही मिळाले तरी चालेल, मात्र भरपूर गुण घेऊन सर्वप्रथम येणे हेच स्वप्न उराशी बाळगून कार्यरत आहे. या दोन्हीही स्त्रियाच. मुलांना जन्म देणे, त्यांना वाढवणे आणि वाढवताना त्यांना समाजभान देणे ही जबाबदारी मात्यपित्यांची. मूल नाही म्हटले तरी जास्तीत जास्त सहवासात असते ते आपल्या आईच्या. मुलाचं-मुलीचं लग्न झालं की त्यांनी मुलग्यालाच जन्म द्यावा ही तीव्र इच्छा मातेच्या रूपातील महिलाच व्यक्त करते. मुलगी असेल तर तिने स्वावलंबी असायला हवे, सातच्या आत घरात.. तिनं न सांगता कोठेही जाता कामा नये, अशा अटी. मुलांना याच अटी सहजपणे घातल्या जात नाहीत. उलट अलीकडे तर त्यांना रात्र-रात्रभर बाहेर राहण्याची जणूकाही मुभाच दिलेली आहे. आई याची पाठराखण करते. समाज, प्रदेश, देश घडविण्याची प्रक्रिया ही कुटुंब, शाळा अशा पवित्र जागांमधून होत असते. आणि त्यात महिलांचा कृतिशील सहभाग असणे ही महत्त्वाची बाब आहे. इतिहास याची साक्ष देतो. शिवाजी महाराजांच्या शौर्य-पराक्रमाचे जेव्हा गोडवे गायिले जातात तेव्हा मुलाला घडविण्यासाठी जिजाईने केलेल्या त्यागाला विसरून चालणार नाही. त्यांनी धर्मरक्षक, प्रजारक्षक राजा तयार केला. कुटुंबापुरताच मर्यादित, फक्त स्वतःचा घरसंसार सांभाळून इतरेजणांना तुच्छ लेखणे, मालमत्ता, संपत्ती याच्यासाठीच आजन्म घालविणे, स्वतःच्या तिजोरीत पैसा, धनदौलत कशी जमा होईल याचाच विचार करायला लावणारी शिकवण जर जिजाऊनी शिवबाला दिली असती तर? याचा विचार महिलांनी, मातांनी जरूर करायलाच हवा. एक उच्चपदावर असलेली माता, तसेच शिक्षकी पेशात असलेली मातासुद्धा मुलाना संस्कार देताना शिक्षण हे कसे प्रतिष्ठेचे आणि पैसे कामविण्याचे साधन आहे, भरपूर गुण घेऊन अव्वल येणे, मुलांनी आवडीचा पेशा न स्वीकारता प्रतिष्ठेला साजेलसा पेशा स्वीकारून फक्त भौतिक सुखाचे मानकरी ठरावेत, अशीच धारणा बाळगून जेव्हा पुढे जाणे होते तेव्हा मात्र वय वाढले की मुलांची तीच धारणा बनते.
समाज सुदृढ, सशक्त बनविणे ही भावना अंगिकारताना शिक्षण, नोकरी, लग्न, पैसा, संसार असाच विचार न करता त्याहीपलीकडे जाऊन त्यांना विकसित करणे ही काळाची गरज आहे. महिला ही सर्जक. ती निर्मितीची शक्ती. तिच्याकडे सोशिकता आहेच, त्याही पलीकडे जाणारी दुष्टांचे निर्दालन करणारी संहारशक्ती आहे. तिने आपले हे रूप समाजमनाला दाखविण्यासाठी तत्पर व्हायला हवे.
आज गावागावांत व्यसनी मुलांचे
घोळके मोटरसायकल, मोबाईल घेऊन धूम स्टाईलने जणू काही वार्याच्या वेगाशी स्पर्धा करू पाहात आहेत. ते कोणालाच जुमानत नाहीत. त्यांना आवर घालताना गावात वाड्यावाड्यांवर जी बार-संस्कृती उदयास आलेली आहे, तिला वेळीच ठेचायला हवी.
सत्तरीतील सुर्लासारख्या दुर्गम गावात कमी शिक्षण घेतलेल्या परंतु कणखर मनाच्या बायांनी गावातली बार-संस्कृतीच सामूहिक शक्तीचा आविष्कार दाखवून बंद करून टाकली. निव्वळ पैसे मिळविण्यासाठी स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणार्यांनी घराघरांत बार उघडले. त्याचा परिणाम शालेय मुलांवर, कुटुंब, समाजावर कशाप्रकारे होईल याचा विचारही केला गेला नव्हता. सहनशीलता संपली आणि बायकांनीच आपल्या घर-संसार, मुलाबाळांसाठी क्रांती केली. आज या गावाला शांतता लाभली. महिलांनी मनात आणले तर गावागावांत क्रांती होऊ शकते. समाज जेव्हा जेव्हा चुकलेला आहे, तेव्हा तेव्हा मातांनी त्याला सावरून धरण्यासाठी स्वतःचे योगदान दिले आहे. महिलांचे कार्यक्षेत्र आज विस्तारले आहे. त्या ज्या जागांवर पावलं ठेवतील तिथं नवीन वाटा तयार होत आहेत. गरज आहे ती सुनियोजित, विचारपूर्वक चालण्याची आणि प्रगल्भ विचार करून आधुनिक काळाशी सुसंगत वागण्याची. महिलांनी आरोग्य, आहार, आत्मविश्वास, आत्मसन्मान याचे भान बाळगावे. डोळस भान त्यांना असावे. काळाच्याही पलीकडे त्यांनी पाहावे. क्लेश, कलह, द्वेष, मत्सर, कोर्ट-कचेरी, मालमत्ता यांच्यात आयुष्यभर बुडूनच राहिलो तर मग येऊ घातलेले सर्व क्षणच नासून जातील. निकोप समाज घडविण्यासाठी वाचन, भ्रमंती, अभिव्यक्ती हे महत्त्वपूर्ण आहेत. प्रापंचिक गुंतवळ्यात आपले वाचन मागे पडते. एकमेकींची ओळख होत नाही. आपणच आपल्या सखीची उणी-दुणी काढतो. सातत्याने वाचन, मनन, चिंतन केले की जगण्याची उंची वाढते. अशीच उंची वाढवा तुमची सखीनो, मग कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक अंगाला प्रसन्नतेने सामोरे जाल. प्रसन्न, समाधानी जीवन हेच तर सुखी, ताणविरहित जगण्याचे सार. स्वतःची शक्ती ओळखा आणि समाज परिवर्तनाचा डोळस दृष्टिकोन बाळगून नवी सर्जक, सुशील पिढी घडविण्यास कटिबद्ध व्हा! मुलं असूनही उतारवयात फरशी पुसण्याचे काम करून जगणारी स्त्री असो अथवा मुलाच्या सर्वच लढाया स्वतः लढणारी, कसलेच वाचन न करणारी एखादी स्त्री असो, त्या प्रतिनिधित्व करतात अशा स्त्रीमनांचं!
म्हणूनच या महिलादिनाच्या निमित्ताने सर्जक भरारी घेऊया!