कौतुकाची थाप महत्त्वाची!

0
318
  • हीरा नारायण गांवकर,
    (नगरगांव वाळपई)

ज्या आम्हाला आज अडचणी वाटताहेत त्यावर आपण तोडगा काढायला हवा ना. आपल्याला जे त्रास झाले, ते उद्या आपल्या सुनेला किंवा मुलीला होऊ नयेत तर त्यापरिने आज आपण समाज घडवायला हवा.

जागतिक महिला दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच वुमन्स डेच्या शुभेच्छा देणार्‍या संदेशांनी व्हॉटसऍप अगदी भरून गेलं. त्यानंतरही दिवसभर फोन किणकिणत होता. तसं मला काही ह्या दिवसाचं फारसं असं अप्रूप नाही. आपण ठरवले तर प्रत्येक दिवस हा महिला दिनच आहे… अशा मताचे मी. म्हणून त्या फॉरवर्ड मॅसेजेस वाचण्यात वेळ वाया न घालवता मी माझ्या दैनंदिन कामाला लागले. रविवार असल्यामुळे तसे घरी निवांतच होते. चहा झाला, नंतर झाडांना पाणी दिले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे टीव्हीवर एक छानसा चित्रपट पाहण्यास बसले. जरा वेळाने मोबाईल हातात घेतला. तर आता प्रत्येकाने स्टेटसही टाकलेले. कुठल्या ऑफीसमधल्या लोकांनी तो दिवस कसा साजरा केला, केक कसला कापला, कुठल्या हॉटेलात कोण जेवले हे सगळं दाखवणारे फोटो त्यांचे स्टेटस सजवत होते.

त्याच्यातच माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा स्टेटस दिसला. तिची नुकतीच पोलीस खात्यात एका उच्च पदावर नेमणूक झाली आहे. तर तिला तिच्या गावातील शाळेत मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. अशा कार्यक्रमामधून बोलण्याची तिची पहिलीच वेळ होती व ह्या गोष्टीचा तिला खूप अभिमान वाटतोय… हेच सांगणारा एक मेसेज तिने स्टेटस म्हणून टाकला होता. मला तो वाचून खूपच आनंद झाला. बरोबर शिकलेली मैत्रीण तिच्या क्षेत्रात प्रगती करते व तिला होत असलेला आनंद पाहून.. ‘तिची अशीच प्रगती पुढे होऊ दे’ अशी मनोमन प्रार्थना केली, अन् तिला शुभेच्छा दिल्या. तेव्हाच आणखीन दोन जणींचे स्टेटस पाहिले, त्यांनीही त्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या होत्या, तिचे मनापासून कौतुक केले होते. तेव्हा कुठेतरी अलगद वाटून गेले की कुणा एकीच्या प्रगतीने, आनंदाने आम्हा सार्‍यांना जो निरागस आनंद झाला तेव्हाच तर झाला आमचा, हॅप्पी वुमन्स डे. महिलांनी, महिलांचा, महिलांसाठी साजरा केलेला दिवस.

ह्यावर आणखीन विचार केला तर असेच वाटले की अरे, माझं तर पूर्ण वर्षच हॅप्पी वुमन्स इअर म्हणावं असंच गेलंय की. जेव्हा कुठे माझा काही कार्यक्रम झाला, तेव्हा तेव्हा माझी जिवाभावाची मैत्रीण माझ्यासाठी जातीने हजर होती. माझी प्लस वन बनून. मी जेव्हा कधी व्यासपीठावर होते तेव्हा माझ्यासाठी टाळ्या देणारी, माझी पाठराखीण तिथेच तर उभी होती. मी काही लिहिले, की ते वाचणे, आवडल्यास कौतुकाची थाप देणे हे सगळे तीच तर करते. माझा असलेला प्रत्येक दिवस ती साजरा करते. आम्ही सगळ्याच जणी आमच्यामध्ये कुणाचाही महत्त्वाचा दिवस असला की तो तिच्यासाठी साजरा करतो. दुसर्‍यासाठी वेळप्रसंगी हजर असणे, ती कौतुकाची थाप, आपण आहोत तुझ्या मागे हा दिलासा ह्यालाच तर त्यांचा दिवस साजरा करणे म्हणतात.

मागे एका कार्यक्रमात माझ्या आईला सर्वांसमोर कविता म्हणण्याचा आग्रह आमच्या सरांनी केला. ती शाळेत होती तेव्हा कुठे स्टेजवर गेली होती व आता इतक्या वर्षांनी आपल्याने होईल का? असे वाटून तिला खूपच अवघडल्यासारखे झाले. पण आम्ही दोघींनी तिला प्रोत्साहन दिले की तू करू शकतेस आणि तिने जाऊन कविता म्हटली. अगदी सुंदर. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनीदेखील तिचे कौतुक केले आणि ‘अशीच पुढे येत रहा असा..’ तिला आशीर्वाद दिला. घरी येऊन मला ती असे म्हणाली की आज ‘तुम्ही दोघी माझ्या पाठीशी राहिलात म्हणून मी ते करू शकले’. आपण काहीतरी नवीन केले ह्याचे समाधान, उत्साह आणि नव्याने गवसलेला आत्मविश्वास हे तिच्या डोळ्यात तरळत होते. ते फोटो आज पुन्हा बघितले तेव्हा वाटले की हाच तर वुमन्स डे. तो दिवस तिचा होता, तो क्षण तिचा होता, आम्ही तिच्यासाठी साजरा केला.

एक बाब हल्ली मनाला जरा जास्तच खुपत असते. खूप जणी बायका सासूच्या जाचाबद्दल, संसारात आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर बोलतात, लिहितात. आपली कित्येक वर्षांपूर्वी रचली गेलेली लोकगीतेही तेच सांगतात. ह्यावरून असेच दिसून येते की पूर्वीची न शिकलेली महिला काय आणि आताची शिकलेली, कमावती आधुनिक स्त्री काय, त्यांचे प्रश्न हे तर तसेच आहेत. फक्त त्या अडचणी सांगण्याचे, व्यक्त होण्याचे माध्यम फक्त बदलले आहे. त्या माध्यमांद्वारे ते जास्त लोकांपर्यंत पोचत आहेत, पण प्रश्न हे तसेच आहेत. त्यांवर उत्तर सापडलेले नाहीये, त्यांच्यात ऐच्छिक असा बदल दिसत नाहीये. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की आपण महिलांना महिलांपासून होणारे त्रास, अडचणी ह्यावर तरी एकमेकांना समजून घेऊन निश्चित तोडगा काढूच शकतो. आजची सून ही उद्याची सासू आहे व आपल्यावर झालेले अन्याय, जाच यांचा सूड आपल्या सुनेवर काढायचा नाही म्हणजे झालं. जशी त्यांची इच्छा असते की सासूने आपल्याला समजून घ्यावे तर तेच मन आपण सासू झाल्यावरही ठेवून आपल्या सुनेला समजून घेतले तर परिस्थिती सुधारेल ना. तसेच सूनांनीही आपल्या आईप्रमानेच आपल्या सासूला जवळ केले तर आज बहुतेक घरात होत असलेले क्लेश थांबतील.
आणखीन एक गोष्ट हमखास कानावर पडते, जवळपास सर्वच विवाहित महिलांकडून, ती मग तरुण असो किंवा वृध्द की आपल्या नवर्‍याला साधा चहा सुद्धा येत नाही, त्याच्या आईने त्याला काहीच शिकवले नाही, जेवणाचे साग्रसंगीत ताट पुढ्यात हजर पाहिजे. हा प्रश्न प्रत्येक बाईला असतो. पण मग उलट त्याच बायका आपल्या मुलांना स्वयंपाकघरात फिरकुसुद्धा देत नाहीत. ज्या आम्हाला आज अडचणी वाटताहेत त्यावर आपण तोडगा काढायला हवा ना.

आपल्याला जे त्रास झाले, ते उद्या आपल्या सुनेला किंवा मुलीला होऊ नयेत तर त्यापरिने आज आपण समाज घडवायला हवा.
प्रत्येक स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला एका मैत्रिणीसारखे समजून घेतले, निदान तशी इच्छा ठेऊन प्रयत्न तरी केला, आपल्याला जमेल तशी निःस्वार्थ मनाने वेळप्रसंगी मदत केली तर प्रत्येक दिवस हा हॅप्पी वुमन्स डे बनून जाईल. आपण सार्‍या एकमेकींच्याच आहोत, एकमेकांसाठीच तर आहोत, भासतो थोड्या वेगळ्या जरी, आज ना उद्या सार्‍या एकच तर आहोत.