>> आजगांवकरांची माहिती
कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिगमोत्सव रद्द करावा की काय याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. अद्याप त्याबाबत गोवा सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आरोग्य विषयक उच्चस्तरीय समितीकडून शिगमोत्सव रद्द केला जावा, अशी जर मुख्यमंत्र्यांना शिफारस करण्यात आली तर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील. आपण पर्यटन मंत्री असून आपण त्याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
मोठमोठ्या क्रीडा सामन्यांचे आयोजन सध्या देशभरात चालू आहे. त्यावर बंदी अजून तरी घालण्यात आलेली नाही या गोष्टीकडेही आजगांवकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना लक्ष वेधले. आम्हाला काय सूचना केल्या जातात यावर सगळे काही अवलंबून असल्याचे ते म्हणाले. मंत्री निलेश काब्राल यानीही यासंबंधी बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी शिगमोत्सव रद्द करावा की काय याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.