राज्यात लोककलाकारांमध्ये सरकारी शिगमोत्सवाबाबत संभ्रमाचे वातावरण

0
121

>> ऐन वेळी रद्द झाल्यास आर्थिक नुकसानीची भीती; तरीही कलाकारांच्या तालमी सुरू

कोरोना विषाणूंच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात सरकारी शिगमोत्सव होईल की नाही याविषयी अनिश्‍चितता निर्माण झाल्याने पणजी, मडगाव, वास्को, फोंडा व अन्य शहरांतील सरकारी शिगमोत्सवात भाग घेणार्‍या लोककलाकारांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. या लोककलाकारांनी चित्ररथ, रोमटांमेळ व अन्य लोकनृत्यांच्या कार्यक्रमांसाठी सध्या अथकपणे तालमी सुरू केलेल्या असून लागणारे साहित्यही विकत घेतलेले आहे. त्यामुळे ऐनवेळी सरकारने सरकारी शिगमोत्सव रद्द केला तर काय याबाबत साशंकता त्यांच्यात आहे.

गेल्या वर्षी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने पणजीतील शिगमोत्सव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पणजीतील शिगमोत्सवात सहभागी होण्याची तयारी केलेल्या लोककलाकारांचे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले होते असे एका लोककलाकाराने सांगितले.

यंदा कोरोना विषाणूमुळे सरकार शिगमा रद्द तर करणार नाही ना अशी भीती सध्या राज्यातील लोककलाकारांना वाटू लागली आहे. कोरोनाचा होणारा फैलाव लक्षात घेऊन गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन करू नका, असा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी नुकतेच जाहीर केले होते. त्या दिवसापासून तर राज्यातील सरकारी शिगमोत्सवात सहभागी होणार्‍या लोककलाकारांची झोपच उडाली आहे. कला सादर करता येणार नाही, स्पर्धेत भाग घेता येणार नाही, स्पर्धेसाठी घाम गाळून केलेली तयारी वाया जाईल, पैसे खर्चून आणलेले साहित्य वाया जाईल या चिंतेने सध्या या लोककलाकारांना ग्रासले आहे.

सरकारने तातडीने
निर्णय घ्यावा : कामत
कोरानो विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सरकारी शिगमोत्सवाचे आयोजन करावे की काय याचा गोवा सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागणार असल्याचे काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी स्पष्ट केले.

यासंबंधी त्यांना विचारले असता ते म्हणाले की कोरोना विषाणूंच्या प्रश्‍नावरून यंदा आपण आपला वाढदिनही साजरा केला नाही. कारण वाढदिन साजरा केला असता तर लोकांची मोठी गर्दी झाली असती. आणि कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर तेच तर टाळायची गरज आहे.

गोवा सरकारने सरकारी शिगमोत्सव रद्द करावा असे तुम्हाला वाटते आहे काय, असे कामत यांना विचारले असता ते म्हणाले की मला जे काही वाटते आहे ते मी प्रत्यक्ष कृती करून दाखवून दिले आहे. सरकारने काय करायचे हे सरकारला ठरवावे लागणार असल्याचे ते म्हणाले.