रिओ दि जानेरो ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात भारताची पी. व्ही. सिंधू कॅरोलिना मरीनकडून पराभूत झाली, परंतु रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तरी तिने आपल्या खेळाने अवघ्या देशाचे लक्ष खिळवून ठेवले… पी. व्ही. सिंधूच्या त्या रोमहर्षक खेळीविषयीचे हे वेधक प्रकरण तिच्या ‘शटलिंग टू द टॉप’ या नव्या आगामी इंग्रजी चरित्रामधून.
‘का य खेळाडू आहेस!! पी. व्ही. सिंधू, मी माझ्या समूहात तुझी प्रतीक्षा करीत आहे. इथे किती एकाकी आहे तू कल्पनाही करू शकणार नाहीस!!’ भारताचा एकमेव ऑलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने रिओ दि जानेरोमधील सिंधूच्या कॅरोलिना मरीनसमवेतच्या अंतिम सामन्याच्या आधल्या दिवशी ट्वीट केले होते..
२००८ चा सुवर्णपदकविजेता असलेल्या बिंद्राने काही दिवसांपूर्वीच नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर आल्यानंतर नुकतीच स्पर्धात्मक क्रीडास्पर्धांमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. तो आधीच भारतात परतला होता. त्याच्या भावना आणि शुभेच्छा जणू सिंधूच्या विजयासाठी श्वास रोखून धरलेल्या संपूर्ण देशाच्या भावनाच प्रतिबिंबित करीत होत्या.
हैदराबाद ते रिओ दि जानेरो हे अंतर जवळजवळ १४ हजार किलोमीटरचे आहे, पण मोत्यांच्या शहरातील प्रत्येकाच्या मनात पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनमधले सुवर्णपदक जिंकली तर शहरात जगातील सर्वांत मोठा आनंदोत्सव साजरा करण्याचा विचार होता. शेवटी शहराची लेक स्पॅनिश फ्लामेन्सो नर्तिका असलेल्या कॅरोलिना मरीनशी बॅडमिंटनमधील महिला एकेरीत सुवर्णपदकासाठी झुंजणार होती.
हैदराबादसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी तो क्रीडाक्षेत्रातला एक सर्वांत महत्त्वाचा दिवस होता. पी. व्ही. रमण, ज्यांनी आपल्या आयुष्यभर ह्या दिवसाची प्रतीक्षा केली होती, ते फोन कॉल घेऊन घेऊन हैराण झाले होते. सतत फोन येत होते. रमण यांना आपली मुलगी सोडली तर इतरांशी फोनवर बोलणे तसे आवडत नसे. तरीही ते संभाषण आवरते घ्यायचे. पण ह्यावेळी त्यांना एक महत्त्वाचे कर्तव्य बजावायचे होते.
ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात सिंधूला खेळताना कुठे जमून पाहायचे याचे बेत संपूर्ण देश आखत असताना, रमण पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पेडावेगी तालुक्यातल्या रत्नलकुंता या दुर्गम गावी धावले. गावच्या देवळातली त्यांची कुलदेवता, रत्नलम्माकडे त्यांना आपल्या कन्येच्या विजयासाठी प्रार्थना करायची होती. ‘देवीच्या आणि कोट्यवधी लोकांच्या आशिर्वादाने सिंधू घरी विजयी होऊनच परतेल’ असा विश्वास रमण यांनी देवळाबाहेर जमलेल्या पत्रकारांपाशी व्यक्त केला. प्रार्थना केल्यावर ते हैदराबादच्या घरी परतले. त्यांना सिंधूला देशासाठी खेळताना कुटुंबासमवेत पाहायचे होते.
सिंधू स्वतः आपल्या भावनांवर काबू ठेवू शकत नव्हती. कसे जमले असते तिला ते? ती अजूनही एक तरुणीच होती आणि महानतेच्या एवढ्या जवळ येऊन पोहोचली होती. बिंद्राच्या ट्वीटवर ती म्हणाली, ‘तुमची ही इच्छा पूर्ण होवो. त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि माझ्यापरीने उत्तम खेळेन.’ ‘दबावासारखे दुसरे काही नसते. मला माझे १०० टक्के योगदान द्यायचेय. उद्याच्या सामन्यासाठी मी खरोखर सज्ज आहे. ते सोपे नाहीय. ती खरेच एक बलिष्ठ प्रतिस्पर्धी आहे. तो ऑलिंपिकचा अंतिम सामना आहे आणि ती खरोखर चांगले खेळतेय.’
त्या दिवसापावेतो सिंधू कधी चॅम्पियनसारखी दिसली नव्हती. पण आज ती आक्रमक आणि सकारात्मक होती. उंच उड्या मारत स्वतःतले सर्वोत्तम बाहेर यावे या प्रतीक्षेत होती. सामन्याच्या प्रत्येक पैलूचा विचार करत होती. शारीरिक आणि मानसिक तयारी करीत होती. तिला काहीही करून जिंकायचे होते.
खूप पूर्वी २०१२ मध्ये अनेकांना सिंधू हे बॅडमिंटनचे भविष्य दिसत होते. गोपीचंदनी तेव्हा आम्हाला सांगितले होते की सिंधू जेव्हा आपली पूर्ण उंची गाठेल आणि तिच्या व्यायामावर तिचा ताबा येईल, तेव्हा ती एक परिपूर्ण खेळाडू बनेल. २०१६ मध्ये ती उंच बनली होती, चार वर्षांचा अनुभव तिच्या गाठीशी होता आणि पूर्ण तंदुरुस्त होती.
गोपीचंदनी असेही म्हटले होते की तिला सातत्याची गरज आहे. प्रतिस्पर्ध्याला संपवण्याची क्षमता हवी आहे. सिंधूने खरेच हे सर्व कमावले होते का? बॅडमिंटनची राणी बनण्याची, जगातील सर्वोत्तम खेळाडू बनण्याची तिची वेळ आली होती का? कॅरोलिना मरीनशी असलेला अंतिम सामना हे ठरवणार होता.
दोघांतील सरळ लढतींत कॅरोलिना ४-३ ने आघाडीवर होती. सिंधूचा तिच्यावरचा सर्वांत अलीकडचा विजय हा ऑक्टोबर २०१५ मधल्या डेन्मार्क सुपर प्रिमियरमधला होता, तर मरीनने तिला हॉंगकॉंगमध्ये त्यानंतर महिन्याभराने पराभूत केले होते. त्याच्या आधी मरीनने तीनवेळा सिंधूला हरवले होते. ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजमध्ये २०१४ मध्ये मरीनने सिंधूला उपउपांत्य फेरीत हरवले होते, परंतु ती सायना नेहवालकडून पराभतू झाली होती, तर २०१४ मधल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मरीनने उपांत्यफेरीत सिंधूला पराभूत केले होते आणि तिने ती स्पर्धाही जिंकली होती. २०१५ मध्ये सईद मोदी इंटरनॅशनलमध्येही मरीनने सिंधूला उपांत्यफेरीत पराभूत केले होते, पण अंतिम सामन्यात सायनाकडून हरली होती.
अंतिम सामना तासभर उशिरा सुरू झाला. पण एकदा सुरू झाल्यावर मरीन तो संपवण्याच्या घाईत दिसू लागली. अत्यंत आक्रमक खेळत मरीनने ११-६ आघाडी मिळवली. मैदानातील तिचा वावर आणि वेग सिंधूला झुंजवत होता. मरीन आघाडीवर राहिली आणि १८-१६ गुणसंख्या राहितो सिंधूने लागोपाठ पाच सरळ गुण मिळवून २१-१८ असा विजय संपादन केला. पहिली फेरी तर सिंधूने खिशात टाकली होती.
मरीनने दुसरी फेरी पुन्हा ४-० च्या आघाडीने वेगात सुरू केली. रिओसेंटर पॅव्हिलियनमधील सगळे भारतीय सिंधूसाठी ती ५-११ पोहोचताच चित्कारत उठले, परंतु ती फेरी सिंधू १२-२१ अशी हरली.
तिसर्या फेरीत मरीनने पुन्हा ६-१ अशी आघाडी घेतली. बाजूने गोपीचंद मोजक्या खुणा करीत होते, परंतु सिंधूचे पुन्हा लक्ष केंद्रित झाले. तिने तूट भरून काढली आणि सामना दहा दहा गुणांवर आणला. पण मरीन १६-१२ वर पोहोचली. सिंधूने ते अंतर पुन्हा २ गुणांवर आणले. मरीनने पुन्हा १७-१४ आघाडी घेतली आणि शेवटी १९-२१, २१-१२, २१-१५ असा सामना जिंकला.
या सामन्याने भले बॅडमिंटनची सर्वोत्तम गुणवत्ता दाखवली नसेल, परंतु ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यातील ताणतणाव आणि नाट्य त्याने दाखवून दिले. शटल बदलू न देणारे खेळाडू, विलंब लावण्याच्या खेळी, मनाचे खेळही दिसून आले. प्रशिक्षक फर्नांडि रिवास आणि गोपीचंद या सर्व ताणतणावाच्या गदारोळात श्वास रोखून सूचना देताना दिसून आले.
मरीन केवळ तीच ओरडू शकेल अशी जोरजोरात ओरडायची. सिंधूही तिने नव्यानेच आत्मसात केलेली आक्रमकता दर्शवीत होती, पण ती मरीनएवढी नव्हती. सामन्यात दीर्घकाळ शटल हवेत राहिले. पहिल्यांदा ५२ स्ट्रोकपर्यंत आणि निर्णायक फेरीत तीसहून अधिक वेळा.
टेनिसप्रमाणेच बॅडमिंटनमध्ये देखील खेळाडू नेहमी फटका लगावताना किंवा गुण संपादित करताना ओरडत राहतात, परंतु ते स्वतःला प्रोत्साहित करण्याबरोबरच अनेकदा प्रतिस्पर्ध्याला विचलीत करण्यासाठीही असते. गोपीचंदनी सिंधूला त्याची कल्पना दिली होती. परंतु हसतमुख सिंधूला तसे करणे जमत नव्हते. ते तिच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगतच नव्हते. मरीनने तर स्वतःचे वेगळेपण सदैव दाखवले होते. सिंधू सायनानंतर ऑलिंपिक पदक पटकावणारी दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. सर्व क्रीडाप्रकारांत पदक पटकावणारी ती पाचवी भारतीय महिला होती. कर्णम मल्लेश्वरी (सिडनी, २००० मध्ये ६९ किलो गटात वजन उचलण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक), सायना नेहवाल (लंडन, २०१२ मधील महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक), मेरी कोम (लंडन, २०१२ मध्ये महिला फ्लायवेट मुष्टियुद्धात कांस्यपदक) आणि साक्षी मलीक (रिओ २०१६ मधील महिलांच्या ५८ किलो गटातील फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्यपदक) यांनी जिंकलेल्या पदकांपेक्षाही वरचे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पराभव होऊनही सिंधूची इतिहासात नोंद