होली आयी रे…!

0
345
  •  सौ. मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर
    (म्हापसा)

सामाजिक जबाबदारी उचललेल्या समाजसेवकांनी वाड्यावाड्यावर होणार्‍या हीन, गलिच्छ, गलथान कृतींवर बंधने लादून, होळीच्या सणाला बिबत्सपणाचा रंग चढू न देता, समाजस्वास्थ्य निकोप राहील याकडे लक्ष पुरवावे. होळी या सणाला प्रतिष्ठा प्राप्त होईल, त्याची शान वाढेल अशाच पद्धतीने हा सण साजरा केला गेला पाहिजे.

होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी कुटुंब, मित्रमंडळी, शेजारी-पाजारी यांच्यावर रंगांची उधळण केली जाते. रंग लावणे हे प्रेमप्रकटनाचे प्रतीक आहे. वैर्‍यालाही रंग लावला की त्यांच्यामधले वैर संपले असा निष्कर्ष निघतो.

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. सर्वाधिक सण साजरे केले जाणारा जगामधला भारत हा एकमेव देश असावा. याला कारणही हेच आहे की हा भिन्नधर्मियांचा देश आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या धर्मपरंपरेनुसार चालत आलेल्या प्रथांचं पालन केलं जातं. पुराणकाळात त्या त्या वेळी घडलेल्या प्रसंगांचे स्मरण उत्सवरुपाने आजही केले जावे. थोड्याफार फरकाने परंपरागत चालत आलेल्या या आनंदोत्सवालाच आपण ‘सण’ हे उपनाव दिलेले आहे. खरं तर समाजामधील भिन्नधर्मियांनी परस्परांबद्दलचा जातीय वैरभाव विसरावा, विविधतेतून एकता साधावी, उच्च नीतिमूल्यांचा अवलंब करावा की जेणेकरून समाजस्वास्थ्य निरोगी राहील आणि देशबांधवांमध्ये एकजूट होण्यास मदत होईल. हे साध्य गाठण्याकरिता सण हेच उत्तम माध्यम ठरते.

आता होळीचं आगमन होत आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी हा सण येतो. तो मुख्यत्वेकरून उत्तर भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. पण संपूर्ण भारतभर हा मोठ्या उत्साहात मनवला जातो. कोणताही सण साजरा करण्यामागे एक पारंपरिक कथा घडलेली असते. होळीचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांची कथा सर्वश्रुतच आहे. राजा हिरण्यकश्यपूला आपल्या शक्तीचा अतोनात अहंकार होता. त्याला देवांबद्दल घृणा वाटे. त्यांचे नावदेखील कानावर पडले तरी त्याच्या अंगाची लाही लाही होई. त्याचा पुत्र प्रल्हाद नेमका त्याच्या उलट. अत्यंत देवभक्त. विष्णूचे नाव अहर्निश त्याच्या मुखात. त्याच्या त्या नामस्मरणाने हिरण्यकश्यपू चवताळून उठे. प्रल्हादाला विष्णूचं नाव न घेण्याबद्दल अनेकवेळा सांगून आणि दटावणी देऊनही प्रल्हादच्या अष्टौप्रहर नामस्मरणात काही खंड पडेना. तेव्हा हिरण्यकश्यपूने शेवटचा उपाय म्हणून आपली बहीण होलिका हिचा या कामी उपयोग करून घेतला. होलिकेला अग्नीवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मिळालेले होते. म्हणजेच कोणतीही आग तिला जाळू शकणार नव्हती. तेव्हा प्रल्हादला घेऊन होलिकेला अग्नीच्या चितेवर बसवण्यात आले. प्रल्हाद न घाबरता बसला. त्यावेळीही तो विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला होता. थोड्याच वेळात होलिका जळू लागली आणि आकाशवाणी झाली. त्याक्षणीच तिला चटकन् एका गोष्टीचं स्मरण झालं की, ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती जळून खाक होईल. विष्णूने आपल्या परमभक्ताचे रक्षण केले आणि होलिका भस्मसात झाली. त्या दिवसापासून तो दिवस होलिका-दहन म्हणून ओळखला जातो. त्याचे स्मरण म्हणून ‘होळी’ साजरी केली जाते. म्हणजेच होली-दहन हे दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचे प्रतीक आहे.

होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी कुटुंब, मित्रमंडळी, शेजारी-पाजारी यांच्यावर रंगांची उधळण केली जाते. रंग लावणे हे प्रेमप्रकटनाचे प्रतीक आहे. वैर्‍यालाही रंग लावला की त्यांच्यामधले वैर संपले असा निष्कर्ष निघतो.
होळीचं उगमस्थान उत्तरभारत आणि नेपाळ ही आहेत. त्यामुळे होळीचा सोहळा मूळ राज्यात जाऊन ‘याचि देहि याचि डोळा’ बघणे ही रसिकांसाठी एक पर्वणीच ठरते. तेव्हा इतर भागातले लोक या सणाचा खरा आनंद लुटण्यासाठी व्रज, वृंदावन, गोकुळ याठिकाणी जातात. तिथे बरेच दिवसपर्यंत हा उत्सव चालतो. त्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. ही एक पारंपरिक प्रथा तिथे प्रचलीत आहे. नृत्य-गायनासोबत सारेजण मौज करतात. मध्य प्रदेशातील इंदूरमधील होळी थोडी वेगळ्याप्रकारे मनवली जाते. तिथे या सणाची शान काही औरच असते. सगळे लोक ‘राजवाडा’ या ठिकाणी एकत्र जमून निघतात. तिथे रंगीत पाण्याच्या टाक्या भरून, त्या पाण्याने होळी खेळली जाते. यासाठी पंधरा दिवस आधीच त्यांना पूर्वतयारी करावी लागते. काही ठिकाणी भांग पिऊन होळी खेळतात. हे चित्र आपण हिंदी चित्रपटातील ‘जय जय शिवशंकर, कॉंटा लागे ना कंकर’ किंवा ‘रंग बरसे भिगी चुनरीया री रंग बरसे’ अशा गीतातून अनुभवलेले आहे. भांगेच्या नशेत परस्परांची चूकभूल माफ करून नाचत-गाजत होळी खेळली जाते.

भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पक्वान्न बनवली जातात. आपल्या गोवा-महाराष्ट्रात ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’च सर्वप्रिय आहे. या दिवशीसाठी उत्तर प्रदेशमध्ये खास पदार्थ बनवला जातो तो ‘फुणके’ नावाचा. चण्याची आणि मुगाची डाळ पाच तास पाण्यात भिजवून ती सुकीच वाटून घेऊन त्यामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरची-हळद-मीठ-कांदा-ओली कोथिंबीर चिरून घालतात. या मिश्रणाचे गुंठले बनवून ते वाफवून घेऊन तव्यावर शॅलो फ्राय करतात. हे फुणगे चिंच-गुळाच्या पाण्याबरोबर खाल्ल्यास पचण्यास हलके असतात.

गोवा-महाराष्ट्रातही रंगपंचमी खेळली जाते. आज सोसायटीमधले रहिवासी एकत्र जमून एकमेकांना रंग लावतात, रंगाच्या पिचकार्‍या उडवून लोकांना चिंब करतात आणि मजा लुटतात. मोठमोठे उद्योजक आणि अभिनेत्यांच्या घरी त्यांच्या क्षेत्रातील मित्रपरिवाराला निमंत्रित करून धूमधडाक्यात धुलीवंदन साजरे केले जाते.

आपल्या गोव्यामध्ये होळीचा उत्साह निम्नस्तरीय लोकांमध्ये अधिक संचारलेला दिसतो. होळी पेटवण्याच्या निमित्ताने युवक अपरात्री घरोघरी जाऊन नारळ, लाकडे, गाड्या-स्कूटरमधील पेट्रोल यांची बिनदिक्कतपणे चोरी करतात. दारू ढोसून अचकट-विचकट शिव्या देत, ढोलकी बडवत रस्त्यावरून त्यांचा तांडा निघतो. या जमावामध्ये वयस्करांसोबत तरुण आणि किशोरही सहभागी झालेली असतात. त्यामुळे होळी अशाच पद्धतीने साजरी करतात- हाच संस्कार शतकानुशतके कित्येक पिढ्यांकडून पुढे सरकत आहे.

रंगपंचमीच्या दिवशी तर सणाच्या नावाखाली चक्क लुबाडणूक केली जाते. रस्त्यावरील पादचारी, सायकलस्वार, मोटारवाहक यांना अडवून, रंग लावून घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते. ज्यांना यापासून सुटका हवी असते त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. ऑफिसची वेळ टळू नये, कपडे खराब होऊ नयेत, वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी नाईलाजाने या लोकांना मुकाटपणे हा अनाठायी होणारा भुर्दंड सोसून पुढची वाट धरावी लागते. समाजातील नीच कृती- वृत्ती- प्रवृत्ती भस्मसात करण्याचं प्रतीक असलेल्या होली दहनाचा मूळ उद्देशच संपुष्टात आलेला आहे. आणि गुंडगिरी, भामटेगिरी यांनाच रंग चढत आहे. अनिष्ट प्रकारांना वैचारिक चितेमध्ये दहन केले गेले पाहिजे.

त्याचप्रमाणे अंगावर उडवल्या जाणार्‍या रंगामुळे डोळ्यांवर, त्वचेवर, फुफ्फुसावर किती घातक परिणाम होऊ शकतात याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी दिली जात असूनही प्रत्येक वार्षिक सणाला रंगामुळे घडलेल्या शारीरिक व्यंगांच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आलेल्या दिसतात. तेव्हा रंगाच्या दुष्परिणामांकडे डोळेझाक करून रंगपंचमी मनवणे अत्यंत धोक्याचे आहे हे सर्वांनी ध्यानी ठेवावे.

सामाजिक जबाबदारी उचललेल्या समाजसेवकांनी वाड्यावाड्यावर होणार्‍या हीन, गलिच्छ, गलथान कृतींवर बंधने लादून, होळीच्या सणाला बिबत्सपणाचा रंग चढू न देता, समाजस्वास्थ्य निकोप राहील याकडे लक्ष पुरवावे. होळी या सणाला प्रतिष्ठा प्राप्त होईल, त्याची शान वाढेल अशाच पद्धतीने हा सण साजरा केला गेला पाहिजे.
सर्वांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा!