विशाल विजयाचे एफसी गोवासमोर आव्हान

0
144

>> चेन्नईन एफसीविरुद्ध आज घरच्या मैदानावर होणार सामना

इंडियन सुपर लीगच्या पहिल्या उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्याच्या लढतीत एफसी गोवा संघाला घरच्या मैदानावर शनिवारी चेन्नईन एफसीविरुद्ध अशक्यप्राय पुनरागमन करावे लागेल. चेन्नईतील १-४ अशा पराभवातून सावरण्यासाठी त्यांना नेहरू स्टेडियमवर सर्वस्व पणास लावावे लागेल.

एदू बेदीया परतल्यामुळे गोवा संघ बळकट झाला आहे. चेन्नईत तो वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नव्हता. ब्रँडन फर्नांडिस आणि ह्युगो बौमौस हे दोघे तंदुरुस्त झाले आहेत. ते खेळू शकतील आणि ही सुद्धा चांगली घडामोड आहे. खास करून ह्युगोने यंदा चमकदार खेळ केला आहे. १४ सामन्यांत दहा गोल आणि ११ ऍसिस्ट अशी त्याची कामगिरी आहे. ब्रँडन परतल्यामुळे गोव्याला दूरच्या अंतरावरून सरस पासेसची आशा बाळगता येईल. पहिल्या टप्यातील लढतीत ही उणीव राहिली होती.

फेरॅन कोरोमीनास नऊ नंबरच्या जागेवर खेळेल. मागील लढतीत तो मागील फॉरवर्ड म्हणून खेळला होता. स्पेनच्या या स्ट्रायकरने यंदा १४ गोल केले असून संघाला त्याच्याकडून आता गोलांची सर्वाधिक गरज असेल.

हंगामी प्रशिक्षक क्लिफोर्ड मिरांडा यांना संघाच्या स्वरुपाबद्दल निर्णय घ्यावा लागेल. बेदीया, ह्युगो आणि कोरोमीनास अशी सर्वस्वी आक्रमक फळी खेळवायची की मुर्तडा फॉल आणि कार्लोस पेना असे दोन परदेशी सेंटर-बॅक ठेवायचे हे त्यांना ठरवावे लागेल.
मिरांडा यांनी सांगितले की, आम्हाला जिंकण्यासाठी पिछाडी भरून काढावी लागेल, पण म्हणून पहिल्या मिनिटापासून आम्ही आक्रमणाचा धडाका लावू असे नाही. ९० मिनिटे आणि आणखी थोड्या वेळेचा खेळ असतो. मला जो काही फुटबॉल कळतो त्यानुसार पहिल्या १० ते १५ मिनिटांत निकाल ठरत नसतो. सामना संपल्याची शिट्टी वाजेपर्यंत संधी असेल आणि आम्ही एकावेळी एका मिनिटाचा विचार असा दृष्टिकोन ठेवून खेळू.

दुसरीकडे चेन्नईन आधी गोल करून गोव्यासमोरील आव्हान आणखी खडतर ठरविण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईनने आधी गोल केला तर गोव्याला किमान पाच गोलांनी जिंकावे लागेल.

चेन्नईनचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी सांगितले की, तीन गोलांची आघाडी असली तरी आपले खेळाडू दुसर्‍या टप्यात सुस्त राहणार नाहीत. नेरीयूस वॅल्सकीस, रॅफेल क्रिव्हेलारो आणि आंद्रे शेम्ब्री या आघाडीच्या त्रिकूटाकडून त्यांनी सरस खेळाची अपेक्षा ठेवली आहे. मागील लढतीत त्यांची कामगिरी दर्जाच्या तुलनेत कमी झाली होती. चेन्नईनच्या स्ट्रायकर्सकडे वेगवान प्रतिआक्रमण रचण्याची क्षमता आहे. त्यामुळे गोव्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कॉयल यांनी सांगितले की, तुमच्याकडे कोणतीही आघाडी असली तरी ती चांगली ठरले. असे असले तरी एका खडतर सामन्याला सामोरे जावे लागत असल्याची आम्हाला जाणीव आहे. साखळीतील १८ सामन्यांच्या टप्यात गोवा संघ सर्वोत्तम ठरला होता. त्यांच्या क्षमतेविषयी मला बराच आदर असून त्यात बदल होणार नाही. असे असले तरी आम्हाला जमेच्या बाजूंचा फायदा उठवून आगेकूच करावी लागेल. आघाडी आहे म्हणून आव्हाने कमी होतील असे नाही. दोन टप्यांमधील सरस संघाला अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. अशावेळी या उत्कंठावर्धक लढतीत सर्वोत्तम खेळ करावा म्हणून खेळाडूंना वेगळी प्रेरणा देण्याची गरज प्रशिक्षकांना नसेल.

..तर सलग सातवा विजय
एफसी गोवाचा संघ आज विजयी झाल्यास संघाचा ‘होम’ मैदानावरील हा सलग सातवा विजय असेल. जमशेदपूर एफसीविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाने एटीके, ओडिशा, नॉर्थईस्ट युनायटेड, केरला ब्लास्टर्स, हैदराबाद एफसी व मुंबई सिटी एफसी यांच्याविरुद्ध विजय मिळविले आहेत.