- दत्ता भि. नाईक
ट्रम्प यांनी लक्षात राहील अशा पद्धतीने व स्वतःच्या अशा खुबीने एका-एका मुद्याला आपल्या भाषणात स्पर्श केला. भारत ही विश्वातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे व भारताबद्दल आमच्या मनात विशेष प्रेम आहे म्हणूनच एवढा लांबचा प्रवास करून आम्ही येथे आलो आहोत. अमेरिकेतील नागरिक भारतीयांचे सच्चे मित्र आहेत व म्हणूनच अमेरिका भारताशी एकनिष्ठ राहील असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फेब्रुवारी २४-२५ अशी ठरलेली छत्तीस तासांची भेट ठरल्याप्रमाणे व अपेक्षेप्रमाणे परस्पर संबंध चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत करणारी ठरली. ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, कन्या इव्हान्का व जामात जेराड कुशनेर हेही होते. कन्या व जामात सोबत असले तरीही त्यांचा कौटुंबिक प्रवास नव्हता. ते दोघेही त्यांच्या सरकारमध्ये त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले गेलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर २२ किलोमीटरचा रोड शो, वाटेत देशातील निरनिराळ्या राज्यांच्या वतीने सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, गांधीजींनी ज्या आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहाची तयारी केली त्या साबरमती आश्रमास भेट, त्यानंतर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर जाहीरसभा असा कार्यक्रम आखलेला होता. आगर्याला ताजमहालाचे सूर्यास्ताच्या वेळेस दर्शन घेणे हाही एक या प्रवासातील सुखदायक कार्यक्रम होता.
नमस्ते ट्रम्प
अमेरिकेहून निघतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘हम भारत आने के लिए तत्पर हैं| हम रास्ते में हैं| कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे|’ असा संदेश देत हिंदीतून ट्वीट करून कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उत्तम वातावरणनिर्मिती केली. याला उत्तर म्हणून पंतप्रधान मोदी यांनी ‘अतिथी देवो भव’ हा संस्कृत संदेश पाठवला. २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात हैदराबाद येथे भरलेल्या वैश्विक औद्योगिक परिषदेस उपस्थित राहण्याकरिता आल्या असता इव्हान्का यांनी या भेटीचे बीज रोवले असल्याची शक्यता आहे. त्यानंतर अमेरिकेतील ‘हावडी मोदी’ या नावाने गाजलेल्या ट्रम्प-मोदी भेटीचीही यामागे पार्श्वभूमी आहे.
ट्रम्प यांचे विमानतळावर आगमन होण्यापूर्वीच एक तास अगोदर पंतप्रधान मोदी स्वागतकक्षात उपस्थित होते. विमानतळावर उतरताच ट्रम्पसाहेबांनी मोदींची जुन्या मित्रासारखी गळाभेट घेतली. अमेरिकन सरकारची सुरक्षायोजना, त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांचा खास बंदोबस्त, ‘दी बिस्ट’ ही अतिसुरक्षित गाडी हेसुद्धा संपूर्ण रोडशोमधील आकर्षणाचे केंद्र होते. साबरमती येथे गांधीजींच्या आश्रमात थांबले असता त्यांना मोदींनी ज्या साध्या शस्त्राद्वारे इंग्रजांशी गांधीजींनी लढा दिला तो चरखा दाखवला. कुतूूहलाने ट्रम्प दांपत्याने चरखा चालवूनही बघितला. त्यांना चरख्याची एक प्रतिकृती व गांधीजींच्या तीन माकडांची मूर्तीही भेट दिली. या ठिकाणी खमण, मका-सामोसा, याशिवाय विशेष गुजराती पदार्थांचे खाद्यपदार्थ ठेवले होते. यांपैकी कोणताही खाद्यपदार्थ ट्रम्प दांपत्याने घेतला नाही, त्यामुळे हे सर्व बनवणारे स्वयंपाकी काहीसे हिरमुसले झाले.
अहमदाबाद येथील मोतेरा स्टेडियमवर आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत व अमेरिका हे दोन देश एकमेकांचे नैसर्गिक भागीदार असून आता हे नाते भागीदारीच्या पुढे गेलेले आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ या नावाने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना मोदी म्हणाले की, अमेरिका हा आपल्या देशाचा सर्वात मोठा व्यापारी उलाढालीतील भागीदार असून भारतीय लष्कराने अमेरिकी लष्करासमवेत मोठ्या प्रमाणात सरावामध्ये भाग घेतलेला आहे. या भेटीतून जे करारमदार होतील ते औपचारिकतेची सीमा ओलांडून दोन्ही देशांतील संबंधांना विकासाचे नवे क्षेत्र उपलब्ध करून देतील, असेही ते म्हणाले.
गोव्याचा उल्लेख
ट्रम्प यांनीही लक्षात राहील अशा पद्धतीने व स्वतःच्या अशा खुबीने एका-एका मुद्याला आपल्या भाषणात स्पर्श केला. भारत ही विश्वातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे व भारताबद्दल आमच्या मनात विशेष प्रेम आहे म्हणूनच एवढा लांबचा प्रवास करून आम्ही येथे आलो आहोत. अमेरिकेतील नागरिक भारतीयांचे सच्चे मित्र आहेत व म्हणूनच अमेरिका भारताशी एकनिष्ठ राहील असेही ते म्हणाले. आतापर्यंत कोणत्याही परकीय देशाच्या राष्ट्रप्रमुखाने भारताच्या पंतप्रधानांचे जेवढे कौतुक केले नसेल तेवढे नरेंद्र मोदी यांचे कौतुक ट्रम्प यांनी केले. वडिलांबरोबर चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले असून जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे व त्याचबरोबर ते एक कणखर नेते आहेत. ते केवळ गुजरातचे नसून त्यांनी भारतीय प्रजासत्ताकाचे यशस्वीपणे नेतृत्व केलेले आहे व म्हणूनच त्यांना कुणालाही हेवा वाटेल असा कौल जनतेने दिलेला आहे. त्यांचा हा प्रवास अविश्वसनीय असाच आहे, असे ते आपल्या भाषणात म्हणाले.
गेल्या सत्तर वर्षांत भारत ही मोठी आर्थिक शक्ती बनल्याचे प्रशस्तिपत्रक देताना ट्रम्प म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सहापटीने वाढलेली असून सत्तावीस कोटी लोकांना दारिद्य्ररेषेतून बाहेर काढणे, बत्तीस कोटींना इंटरनेटशी जोडणे, महामार्गांचा विस्तार, सात कोटी परिवारांना गॅस जोडणी, स्वच्छतागृहे यांसारखी विकासकामे संपूर्ण देशात घडली. अमेरिकेचा कोणताही राष्ट्राध्यक्ष दिलेल्या माहितीवरून बोलत नसतो. माहितीची शहानिशा करण्यासाठी आवश्यक असलेले उत्तम हेर खातेही अमेरिकेजवळ आहे हे सर्वांस माहीत आहे.
भारत देशाच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करताना या देशात जशी हिमालयाची शिखरे आहेत तसेच गोव्यासारखे समुद्रकिनारे आहेत असे म्हणत ट्रम्पसाहेबांनी त्यांच्या सौंदर्यदृष्टीत रसिकतेलाही वाव असल्याचे दाखवून दिले. गोव्याचा शब्दाने का उल्लेख होईना तेवढ्याने सारे गोवेकर सुखावले. आपले देश इस्लामिक दहशतवादाचे शिकार बनले असून अमेरिकी सेनादलांनी बगदादीचा खात्मा करून इस्लामिक स्टेटचा पश्चिम आशियामधून खात्मा केल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानलाही दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावी लागेल असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला सौम्य भाषेत का होईना ताकीद दिली. भारतात शंभरहून अधिक भाषा बोलल्या जातात. या देशात हिंदू, जैन, मुस्लीम, शिख असे अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात या वैशिष्ट्यांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. जगातील आश्चर्य असलेल्या ताजमहालला भेट हाही एक मोठा कार्यक्रम या भेटीत करण्यात आला. ट्रम्प यांनी सहकुटुंब ताजमहालला भेट दिली.
मोदी- टेरिफिक लिडर
मोतेरा स्टेडियमवरील भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे तीन अब्ज डॉलर्सचा भारत-अमेरिका संरक्षण करार या मुक्कामात पूर्ण करण्यात आला. या कराराच्या अंतर्गत भारत अमेरिकेकडून २४ एमएच-६० रोमियो हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार असून त्याचबरोबर ६ ए.एच. ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर्सही विकत घेणार आहे. अपाचे हेलिकॉप्टरची क्षमता इतकी आहे की, शत्रू कितीही बलाढ्य असला तरी उरात धडकी भरेल. या कराराबद्दल भारत सरकारने चांगले मत व्यक्त करावे यात विशेष असे काहीही नाही. परंतु ट्रम्प यांनी म्हटले की, या करारामुळे दोन्ही देशांची संयुक्त संरक्षण क्षमता वाढेल, तसेच दोन्ही देशांच्या सेनादलांना एकत्र प्रशिक्षण देऊन एकमेकाला साह्य करण्यासाठीचे क्षेत्र उघडले जाईल. बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते यांनीही अपाचे हेलिकॉप्टर्सच्या प्रहारक्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केलेला आहे. भारत-अमेरिका यांमधील संरक्षणविषयक सहकार्य अलीकडे बरेच वाढलेले आहे. २०१६ च्या जून महिन्यात अमेरिकेने भारत हा संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचे म्हटले होते. २०१९ मध्ये भारताकडून अठरा अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीची खरेदी केली गेली होती. हा करार म्हणजे या घटनाक्रमाचा कळस आहे.
दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-ट्रम्प यांची चर्चाही खेळीमेळीच्या वातावरणात झाली. मोदी हे स्वतः धार्मिक तसेच शांत स्वभावाचे असून त्याचबरोबर त्यांचे कणखर व्यक्तिमत्त्व लक्षात भरण्यासारखे आहे असे ट्रम्प म्हणाले. त्यांचे वर्णन करताना त्यांनी ‘टेरिफिक लिडर’ आणि ‘नाईस मॅन डुईंग अ फन्टास्टिक जॉब’ यांसारख्या विशेषणांनी केले.
काश्मीर समस्या ही एक मोठी समस्या असून तो एक रूतलेला काटा आहे असे म्हणताना ट्रम्प यांनी या प्रश्नात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही सांगितले. दि. २९ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी शांतता करार होणार आहे. यावेळेस पाकिस्तान मध्यस्थ राष्ट्र म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या शांतताप्रक्रियेत सुरुवातीपासून उत्सुक असलेला भारत वगळला जाणार आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्याशी माझे विशेष संबंध आहेत असेही ट्रम्प यांनी या चर्चेच्या वेळेस नमूद केले. राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभातील ट्रम्प यांचा सन्मान त्यांच्या पदाला शोभेसाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला.
ट्रम्प यांचा निवडणुकीवर डोळा?
ट्रम्प यांचा मुक्काम असलेल्या आय.टी.सी. मौर्य हॉटेलवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
भारतातील अंतर्गत चालू असलेल्या विषयावर व धर्मस्वातंत्र्य इत्यादी विषयांवर त्यांनी मत व्यक्त केल्याचे वृत्त त्यांचे आगमन होण्यापूर्वी काही वृत्तसंस्थांनी पसरवले होते. परंतु त्यांनी या मंडळीना निराश केले. नागरिकता सुधारणा कायद्यासंबंधात प्रश्न विचारताच त्यांनी हा प्रश्न भारतीयांचा आहे, मी त्यात पडणार नाही, असे स्पष्ट सांगितले. विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत व अमेरिका यांमध्ये सुरक्षा, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान व नागरिकांचा परस्पर संबंध यासंबंधाने करार झालेले असून संरक्षण क्षेत्राला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे.
भारत-अमेरिका संबंध या भेटीमुळे कधी नव्हते इतक्या उंचीवर गेलेले आहेत. एकेकाळी अमेरिकेचे पाकिस्तानच्या बाजूने झुकते माप होते. पाकिस्तानला अमेरिकेकडून विनामूल्य संरक्षण सामग्री मिळत असे व पाकिस्तान ती दिवाळीच्या रोषणाईसारखी भारताच्या विरोधात वापरत असे. ती आता बंद झालेली असली तरीही अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानचे अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्व कमी होत नाही. चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पाकिस्तानचा उपयोग होणार नाही, याउलट ‘बन बेल्ट बन रोड’ या योजनेत पाकिस्तान भागीदार बनलेला आहे याची अमेरिकन प्रशासनाला जाणीव आहे. जोपर्यंत कम्युनिस्ट चीन आपली विस्तारवादी भूमिका सोडत नाही तोपर्यंत भारत-चीन तणाव चालूच राहणार याची अमेरिकेला पूर्ण कल्पना आहे. यावर उपाय म्हणजे भारताच्या वाढत्या शक्तीचा चीनविरोधात वापर करणे हाच अमेरिकेसमोर एकमेव पर्याय आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अमेरिका व रशिया ही दोन राष्ट्रे एकमेकांची स्पर्धक नसून वैरी आहेत. भारत-रशिया मैत्री मुरलेल्या लोणच्यासारखी आहे. भारत-अमेरिका करारामुळे यात कोणती बाधा येईल असे वाटत नाही. भारत अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणार तर भारत-रशिया हे दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने संरक्षण सामग्रीचे उत्पादन करतात इतका या देशांमधील संबंधाचा अन्वयार्थ आहे. ट्रम्पसाहेबांनी भारतीयांचे तसेच नरेंद्र मोदी यांचे जे कौतुक केलेले आहे त्यामागे नजीकच्या काळात अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील भारतीयांची मते मिळवणे हाही एक छुपा हेतू असू शकतो. अमेरिकेने देशाच्या राजदूताचे कार्यालय तेल अव्हीववरून जेरुसलेमला हलवून देशातील ज्यू मतदारांची मते ट्रम्प यांनी खिशात टाकलेलीच आहेत. काहीही झाले तरी अमेरिकेच्या राजकारणात भारतीय व ज्यू अशा आशियाई वंशाच्या मतदारांना महत्त्व प्राप्त झालेले आहे हेही काही नसे थोडके!