Home बातम्या पाशेकोंची याचिका अन्यत्र हस्तांतरित करण्याची मागणी

पाशेकोंची याचिका अन्यत्र हस्तांतरित करण्याची मागणी

0

कनिष्ठ अभियंता हल्ला प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी सादर केलेली आव्हान याचिका दुसर्‍या न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांच्याकडे करण्यात आली आहे.

मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विजया पोळ यांच्यासमोर सदर खटला सुनावणीस आहे. मिकी पाशेको यांचे वकिलपत्र घेतलेले वकील सुरेंद्र देसाई यांनी पोळ यांचेही वकिलपत्र घेतलेले आहे, याकडे ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्तींचे लक्ष वेधले आहे.

वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्या प्रकरणी दोन न्यायालयांनी मिकी पाशेको यांना दोषी ठरवून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. सदर निवाड्याविरुद्ध मिकी पाशेको यांनी खंडपीठासमोर आव्हान याचिका दाखल केलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर केलेल्या याचिकेत ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांच्या विजया पोळ या अशील असल्याने त्यांनी सदर वकिलपत्र घेणे योग्य नव्हते, याकडेही आयरिश यांनी मुख्य न्यायमूर्तींचे लक्ष वेधले आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन सदर खटल्याचे हस्तांतरण इतर न्यायालयात करण्यात यावे, अशी मागणी आयरिश यांनी केली आहे.