आग्वाद येथील तुरुंगातील संग्रहालयात फक्त गोवा मुक्ती लढ्याच्या इतिहासासंबंधी माहितीचा समावेश असला पाहिजे. गोवा मुक्ती लढ्याबाहेर माहितीचा समावेश करण्यास विरोध आहे, असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली यांनी एका पत्रकार परिषदेत काल दिला.
गोवा दमण दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेने आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पेडणेकर व इतरांची उपस्थिती होती.
आग्वाद किल्ल्याचा बाजार
मांडला जाऊ नये
राज्य सरकारकडून आग्वाद किल्ल्याचे नूतनीकरण केले जात आहे. आग्वाद येथील तुरुंगात गोवा मुक्तीलढ्याच्या इतिहासाबरोबर अन्य माहिती उपलब्ध करण्याची योजना असल्याचे वक्तव्य मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे. आग्वाद तुरुंगामधील संग्रहालयात केवळ १९६१ पर्यंतच्या इतिहासाची माहिती असली पाहिजे. आग्वाद किल्ल्याचा बाजार मांडला जाऊ नये. आग्वाद येथील तुरुंगातील एका खोलीत राम मनोहर लोहिया यांना ठेवण्यात आले होते. सदर खोली लोहिया यांच्या नावाने विकसित करावी. रेईश मागूश येथील किल्ल्यावर मारियो मिरांडा यांची व्यंगचित्रे लावण्यास आक्षेप घेतला होता, असेही करमली यांनी सांगितले.
स्वा. सैनिकांच्या मुलांच्या
नोकर्यांचा प्रश्न सोडवा
स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरीच्या प्रश्नावर येत्या १८ जून २०२० पूर्वी तोडगा काढावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तीदिन सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरीच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, मागील दोन महिन्यात नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात आलेले नाही, अशी खंत करमली यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य सैनिकांनी मुलांना नोकरी देण्याची मागणी केली नव्हती. तर, राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकर्या देण्याचे जाहीर केले होते. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यकाळात काही जणांना नोकर्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकर्यांबाबत गंभीरपणे लक्ष देण्यात आलेले नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांनी नोकरीची मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.