राज्यात अमली पदार्थांची गंभीर समस्या : कामत

0
144

अमली पदार्थांचे सेवन केलेल्या एका किशोरवयीन मुलाचा वायरल झालेला व्हिडिओ पाहून राज्यात अमली पदार्थांची समस्या ही केवढी गंभीर बनली आहे ते परत एकदा स्पष्ट झाले आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल एका निवेदनातून म्हटले आहे.
अमली पदार्थांच्या या भस्मासुराविरुद्ध लढा देण्यासाठी आता राज्यातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, वेळ निघून जाण्यापूर्वी हे काम हाती घेण्याची गरज असल्याचे श्री. कामत यांनी पुढे म्हटले आहे.

आपले अपयश लपवण्यासाठी सरकार परत परत राज्यात अमली पदार्थांचा व्यापार होत नसल्याचे म्हणत आहे. मात्र, अमली पदार्थ आता राज्यातील ग्रामीण भागांपर्यंत पोचले आहेत ही वस्तुस्थिती असून त्याविरुद्ध लढा देऊन ते नाहीसे करणे ही दर एका गोमंतकीयाची जबाबदारी असल्याचे कामत यांनी नमूद केले आहे.
गोवा सरकार आपण अमली पदार्थांवर कारवाई करीत असल्याचे दाखवण्यासाठी अमली पदार्थांची विक्री करणार्‍या मूठभर लोकांना अटक करीत असून अमली पदार्थ व्यवहारातील माफियांना मात्र अभय देत असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.

अमली पदार्थ विक्री व्यवहारात असलेल्यांवर सरकारने बारीक लक्ष ठेवावे व हे पदार्थ शैक्षणिक संस्थांमध्ये पोचणार नाहीत याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. या कामी सरकारने शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आदींचीही मदत घ्यावी, असे सांगत कामत यांनी, पोलीस व सरकारी अधिकार्‍यांच्या मुलांनाही या व्यवहारातील लोक व्यसन लावू शकतात हे त्यांनी जाणून घ्यावे, असेही म्हटले आहे.