आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२३-२०३१ या वर्षांचे नियोजन सुरू केले असून दहा संघांचा समावेश असलेला ‘टी-ट्वेंटी चॅम्पियन्स कप’चा प्रस्ताव नियोजित वेळापत्रकात ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी झालेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ४८ सामने या विश्वचषकात असणार आहेत. आयसीसीच्या प्रस्तावानुसार २०२४ व २०२८ या साली चॅम्पियन्स कप टी-ट्वेंटी, २०२५ व २०२९ साली वनडे चॅम्पियन्स कप, २०२६ व २०३० साली टी-ट्वेंटी विश्वचषक तर २०२७ व २०३१ साली ५० षटकांचा विश्वचषक होणार आहे. ५० षटकांच्या चॅम्पियन्स स्पर्धेत केवळ आघाडीचे ६ संघ सहभागी होणार असून केवळ १६ सामने या स्पर्धेत होतील परंतु, टी-ट्वेंटी चॅम्पियन्स कप स्पर्धेचा पसारा मात्र जवळपास विश्वचषकाएवढाच असेल. मागील टी-ट्वेंटी विश्वचषकात ५५ सामने झाले होते तर टी-ट्वेंटी चॅम्पियन्स कपमध्ये ४८ सामने असतील. शेवटच्या वनडे वर्ल्डकपमध्येदेखील सामन्यांची संख्या समान होती. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा विस्तार करताना सहभागी संघांची संख्या १६ वरून २० करण्याचा प्रस्तावही आयसीसीच्या विचाराधीन आहे. याव्यतिरिक्त महिला चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२३), महिला टी-ट्वेंटी चॅम्पियन्स कप (२०२४), महिला वनडे विश्वचषक (२०२५), महिला टी-ट्वेंटी विश्वचषक (२०२६), महिला वनडे चॅम्पियन्स कप (२०२७), महिला टी-ट्वेंटी चॅम्पियन्स कप (२०२८), महिला वनडे विश्वचषक (२०२९), महिला टी-ट्वेंटी विश्वचषक (२०३०) या स्पर्धांबद्दलही निर्णय अपेक्षित आहेत. मार्च महिन्यात आयसीसीची त्रैमासिक बैठक होणार असून यामध्ये नवीन प्रस्तावांवर चर्चा अपेक्षित आहे. बीसीसीआयला अजून काही मंडळांचा पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे.
बीसीसीआयचा कडाडून विरोध
आयसीसीने यापूर्वी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही संकल्पना मांडली होती तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याला कडाडून विरोध केला होता. या भरगच्च वेळापत्रकामुळे आयपीएल, बिग बॅश, सीपीएल, पीएसएल, बीपीएल या स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. खेळाडूंवरील ताण लक्षात घेता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळानेदेखील बीसीसीआयची बाजू घेतली आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या स्पर्धा झाल्यास या स्पर्धांचे महत्त्वच कमी होणार असल्याचे दोन्ही मंडळांचे म्हणणे आहे.