शिस्त हवी, पण..

0
128

गेले अनेक महिने ज्याची होणार, होणार म्हणून घोषणा चालली होती, ते ‘पे पार्किंग’ अखेरीस पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात लागू झाले आहे आणि लवकरच ते संपूर्ण शहरभर लागू होणार आहे. गेल्या वेळी अशाच प्रकारे महापालिकेकडून पे पार्किंग हट्टाने लागू करण्यात आले होते, परंतु अल्पावधीत संबंधित कंत्राटदाराने महापालिकेची देणी बुडवून हात वर केले आणि महापालिका मात्र हात चोळत राहिली. यावेळी मागच्या वेळच्या प्रकारापासून धडा घेऊन संबंधित कंत्राटदाराकडून आगाऊ धनादेश घेतले आहेत वगैरे घोषणा नूतन महापौरांनी केली आहे, त्यामुळे यावेळी गेल्या वेळची पुनरावृत्ती होणार नाही आणि महापालिकेला अपेक्षित महसूल मिळेल अशी आशा आहे. गेल्या वेळचे कंत्राट एका राजकारण्याने भागिदारीत मिळवले होते अशी चर्चा होती. यावेळचा कंत्राटदारही एका राजकारण्याशी संबंधित आहे या योगायोग विशेषच म्हणायला हवा. पे पार्किंग केल्याने शहरातील वाहतुकीला शिस्त येईल अशी अपेक्षा जरी असली तरी सध्या लागू करण्यात आलेले पार्किंगचे दर महागडे आहेत. विशेषतः पणजीमध्ये चार चाकी वाहनाने येणार्‍या आणि नोकरी – व्यवसायानिमित्त आठ – दहा तास राहावे लागणार्‍या नागरिकांना बसणारा आर्थिक भुर्दंड मोठा आहे. मासिक व वार्षिक पास योजना कंत्राटदाराने जाहीर केलेली असली, तरीदेखील चारचाकींसाठी वर्षाला अठरा हजार रुपये हा भुर्दंड मोठाच आहे. यातून महापालिकेच्या गंगाजळीत भर पडणार असती तर नागरिकांची काही हरकत नसती, परंतु अशा प्रकारचे पे पार्किंग केले जाते, तेव्हा त्यात प्रत्यक्षात त्यातून कंत्राटदारांचा आणि त्यांच्याशी मिलीभगत असलेल्या लोकप्रतिनिधींचाच फायदा होत असतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. पे पार्किंग आणि इतर बाबतींत तर पणजी महापालिकेची कीर्ती फार वाईट आहे. क्रूझ सफरीसाठी पर्यटक जेटीवर येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांकडून महापालिकेच्या नावे पावत्या छापून परस्पर पार्किंग शुल्क गोळा करणारे एक नगरसेवक मध्यंतरी आढळले होते. पणजी बाजारातील पालिकेच्या इमारतीतील गाळे एका नगरसेवकाने परस्पर भाड्याने दिल्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आढळून आलेले होते. महापालिकेच्या बाजारातील दुकानांचा घोटाळा तर फार मोठा आहे. महापालिकेने जेथे यापूर्वी पे पार्किंग लागू केलेले आहे, तेथील कर्मचारी रीतसर पावत्या किती फाडतात आणि महापालिकेच्या गंगाजळीत प्रत्यक्षात किती भर पडते याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. मध्यंतरी काही भागांमध्ये पर्यटकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा दाखवून परप्रांतीयांची काही मुले ‘पे पार्किंग’चा आभास निर्माण करून पैसे उकळत असल्याचे देखील निदर्शनास आलेले होते. या सार्‍या सावळ्यागोंधळाच्या परिस्थितीत हा पे पार्किंगचा जो घाट महापालिकेने घातला आहे, त्याविषयी जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. अजून शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व्हायचे आहे. त्यामुळे वाहने पार्किंगसाठीच्या जागांवर नीट खुणाही केलेल्या नाहीत. वाहने उभी करायची जागाही ओबडधोबड आहे. परंतु महापालिकेला कमाईची घाई झालेली दिसते. पणजीतील बेशिस्त पार्किंगवर उपाय म्हणून मागील सरकारने मोठा गाजावाजा करून बहुमजली वाहनतळ उभारला, परंतु तो शहराबाहेर उभारला गेला. तेथे वाहने उभी केली तर तेथून शहरात येण्याची कोणतीही सोय नाही. खरे तर कॅसिनोंवर येणार्‍या ग्राहकांची आणि पर्यटकांची वाहने तेथे उभी करण्याची सक्ती होणे आवश्यक होते, परंतु वाहतूक खात्याने तसे प्रयत्न कधीही केल्याचे दिसले नाही. शेवटी त्या वाहनतळावर पार्ट्या आयोजित करण्याची पाळी ओढवली. शहराच्या मध्यवस्तीमध्ये मोठे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याच्या घोषणा झालेल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. शहराच्या मध्यवस्तीतील बरीच मोठी मोक्याची जागा लष्कराने अडवलेली आहे. त्यांच्या तळांचे बांबोळीत स्थलांतर करून मोठी जागा नागरी पार्किंगसाठी उपलब्ध करता येऊ शकते, परंतु ते माजी संरक्षणमंत्र्यांनाच जमले नाही तेथे इतरांची काय कथा. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरातील शाळा कुजिरा संकुलात हलवण्यात आल्या, परंतु त्या मोकळ्या इमारतींमध्ये आता नवी आस्थापने सुरू झालेली असल्याने पुन्हा कोंडी जैसे थे आहे. पणजीचे काही रस्ते वाहनांना बंद करून विदेशातल्याप्रमाणे केवळ पादचार्‍यांसाठी करण्याचे स्वप्न दाखवले गेले होते, परंतु प्रत्यक्षात आले नाही. शहरात फिरण्यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या, त्या योजनेचा बोजवारा उडाला. शहर आणि शेजारील उपनगरांना जोडणार्‍या रिंग रोड शटल सेवेची घोषणा वदंताच राहिली आहे. पणजीचे प्रश्न तसेच आहेत. ते सोडवण्याचे, पणजीला स्मार्ट बनवण्याचे वायदे अनेक झाले. प्रत्यक्षात मात्र पणजीच्या समस्या जुनात दुर्धर रोगासारख्या बनल्या आहे. एकेकाळी याच पणजी शहराचे वर्णन स्वामी विवेकानंदांनी एक शांत, सुंदर, स्वच्छ शहर असे केलेले होते. आज मात्र त्याची रया गेली आहे.