- नीला भोजराज
लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या अभिनयातून साकार झालेले ‘गीतरामायण’ हे अनोखे महानाट्य दिग्दर्शित करण्यासाठी ज्या दिग्दर्शकाने आपल्या जिवाचे रान केले ते श्री. जयेंद्रनाथ हळदणकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ३५०च्या संख्येत आणि तेही विविध प्रकारची विकलांगता असलेल्या मुलामुलींना घेऊन महानाट्य सादर करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही मोठे धाडस म्हणावे लागेल. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या यशाचे गुपित
प्रामाणिक कष्ट, जिद्द, महत्वाकांक्षा, कलेची आवड, धाडस आणि संयम या गुणांचा समुच्चय ज्या व्यक्तीमध्ये असेल ती व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, काय चमत्कार घडवून आणू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोव्यातील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर होय. आधुनिक युगातील महर्षी ग.दि.माडगुळकरांनी लिहिलेले आणि स्वरमहर्षी सुधीर फडके यांच्या भारदस्त आवाजात स्वरबद्ध झालेले ‘गीतरामायण’ हा मुळातच पृथ्वीवरील एक चमत्कार आहे. त्या गीतरामायणाचा महानाट्याविष्कार, तोही लोकविश्वास प्रतिष्ठानच्या अनेक दिव्यांग मुलामुलींच्या अभिनयाद्वारे प्रभावी स्वरूपात लोकांसमोर सादर करण्याचे धाडस जयेंद्रनाथ हळदणकर यांनी करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. पण यासाठी निश्चितच त्यांच्या आयुष्यभराची विशिष्ट अशा अनुभवांची शिदोरी त्यांना लाभली असेल यात शंकाच नाही.
जयेंद्रच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अनेक भावंडं त्यामुळे लहानपणापासूनच अनेक छोटी-मोठी कामं, मग ती बार आणि रेस्टॉरेटमध्ये असो अथवा गार्डनमध्ये करून, नाईट कॉलेजमध्ये जाऊन, स्वतःच्या कमाईतूनच जयेंद्र यांनी स्वतःचे शिक्षण १२वीपर्यंत पूर्ण केले. १२वीची परीक्षा होती त्याच दिवशी नोकरी पत्करली, अर्थातच रात्रपाळीची! तरीही १२वीत उत्तम यश संपादन केले. त्यानंतर खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्यास प्रवेश घेतला. सेकंड इयर अर्धवट करून कला अकादमीचा थिएटर आर्टस्चा तीन वर्षांचा कोर्स केला. सर्वप्रथम गोमंतक मराठी दैनिकच्या कार्यालयात रात्रपाळीत काम केले. त्यानंतर गोवादूतमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना गोवा कला व संस्कृती संचालनालयमध्ये थिएटर आर्टस् टीचर म्हणून काम मिळाले व इथून त्यांचा खरा नाट्य- दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला.
त्या काळात त्यांना तीन शाळांमध्ये- दयानंद हायस्कूल- चोडण, डॉ. के.ब. हेडगेवार हायस्कूल-पणजी आणि आजमाने हायस्कूल-डोंगरी या शाळांमध्ये ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांना रंगमंच कलेचे शिक्षण देण्याचे काम दिलेले होते. त्या विद्यार्थ्यांना घेऊन आजपर्यंत अनेक महानाट्यांचे त्यांनी केलेले सादरीकरण गोव्यातील प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. यामध्ये १८५७ची स्वातंत्र्य चळवळ, वंदेमातरम्, महाभारत, रामायण, छत्रपती शंभूराजे इत्यादी अनेक महानाट्यांचा समावेश आहे.
याशिवाय कला अकादमीच्या अनेक ‘अ’गट, ‘ब’गट नाट्यस्पर्धांमध्ये नाटकं सादर करून त्यात त्यांनी नंबर पटकावले. स्व. विष्णु वाघांचे ‘बाई मी दगूड फोडते’ या नाटकाला भारतात आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या अनेक संगीत नाटकांना प्रथम क्रमांक मिळाला. मराठी अकादमीचेही पारितोषिक मिळाले. सहा वेळा मुंबई आणि दिल्लीमध्येसुद्धा त्यांच्या नाटकांना प्रथम क्रमांक मिळाला. त्याशिवाय तियात्र, रणमाले, दशावतार या प्रकारची नाटकं त्यांनी गोव्याबाहेरही सादर केलीत. थिएटर ऑलिम्पिक वर्ल्डमध्ये त्यांच्या तियात्र नाट्याची निवड झाली. दमण आणि दिवला ते नाटकं बसवायला जात असतात. इतकेच नव्हे तर गुजरात, राजस्थान, दिल्ली, पुणे अशा अनेक ठिकाणी आजपर्यंत त्यांचा नाटकांच्या निमित्ताने प्रवास झालेला आहे. यावर्षी इफ्फी- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या चित्रपटाचा प्रिमियर शो दाखवण्यात आला होता. अशा प्रकारे २० वर्षांपासून त्यांचा महानाट्य दिग्दर्शनाचा प्रवास अखंड, अविरतपणे सुरू आहे.
आता साहजिकच लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांना घेऊन, तेही थोडे-थोडके नव्हे तर तब्बल ३५० दिव्यांगांना घेऊन महानाट्य बसविण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला असावा, हे जाणून घेणे आवश्यक वाटते.
तर फोंड्यातील लोकविश्वास प्रतिष्ठान या दिव्यांगाच्या शाळेच्या प्रमुख शिक्षिका सविता मनोहर देसाई यांच्या मनातील ही खरी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले. त्या शिक्षिकेला या संस्थेमध्ये २२ वर्षे झालीत. ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे ‘गीतरामायण’ दिव्यांग मुलांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल याचा विचार त्यांच्या मनात आला. शिवाय लवकरच त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे संस्थेतून निवृत्त होण्यापूर्वी काहीतरी वेगळे करायचे त्यांच्या मनात होतेच. यापूर्वी गोव्याबाहेर काही ठिकाणी आणि केरळमध्ये त्यांनी अशा प्रकारचा एक कार्यक्रम बघितला होता. म्हणून ही संकल्पना त्यांनी शाळेतील इतर शिक्षकांजवळ बोलून दाखवली असता, तेथील एक शिक्षिका श्वेता उदय च्यारी यांनी जयेंद्रनाथ हळदणकरांचे नाव त्यांना सुचवले. आणि अर्थातच जयेंद्रांनाही ही संकल्पना आवडली आणि मग तयारी सुरू करण्यात आली.
जयेंद्रनाथ हळदणकर अनेक वर्षांपासून लोकविश्वास प्रतिष्ठान- फोंडा या संस्थेच्या गोव्यातील अनेक शाखांमध्ये जसे काणकोण, केपे, मोर्ले, माशेल, होंडा येथे असलेल्या शाळांमध्ये नियमित भेट देतच होते. त्यातील छोट्या समूहाला घेऊन त्यांनी अनेक नाटकेही सादर केली होती. त्यामुळे दिव्यांगांबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांना अगोदरपासूनच होता. फक्त इतक्या मोठ्या संख्येतील दिव्यांग मुलांना घेऊन महानाट्य करायचे हे निश्चितपणे मोठे आव्हान होते पण ते त्यांनी पेलायचे ठरवले.
यापूर्वी ‘गीतरामायण’ हेच महानाट्य त्यांनी हेडगेवार हायस्कूलच्या ६५०, दयानंद हायस्कूलच्या ४३० विद्यार्थ्यांना घेऊन अनेक वेळा सादर केले होते. त्यामुळे नाटकाची स्क्रिप्ट त्यांची तयार होतीच. पण दिव्यांगांच्या क्षमतेनुसार त्यामध्ये काही बदल करून व अंध-कर्णबधीर-मतिमंद अशा विविध प्रकारच्या मुलांचे मिश्र गट तयार करून गटागटात त्यांनी हे नाटक बसवले. मुळात दिव्यांग मुले खूप हुशार असतात. फक्त त्यांच्यातील कमतरता जाणून घेऊन त्यांच्या हुशारीचा योग्य वापर कसा करायचा याचे कसब त्यांना जुळवताना फार संयमाने कार्य करावे लागले. थोडक्यात काय तर जसे सामान्य विद्यार्थ्यांचे नाटक हे दिग्दर्शकाच्या वेळेनुसार व तालानुसार चालते, तशी परिस्थिती इथे नव्हती. इथे नाटक हे कलाकारांच्या वेळेनुसार व तालानुसार दिग्दर्शकाला चालावे लागत होते. शेवटी सहा ते सात वेळा रंगीत तालीम झाली. पण सर्वच मुलांनी त्यांना उत्कृष्ट साथ दिली त्यामुळे हे महानाट्य रंगले, असे त्यांनी सांगितले.
या महानाट्यात सगळ्याच दिव्यांग मुलांना सहभागी करून घेण्यात आले होते. काहींना चित्रे काढण्याचा छंद होता, त्यांनाही यात सहभागी करून घेतले. तसेच रामायणातील पदांचे गीत गायन करण्यासाठी दोन अंध मुलांची निवड करण्यात आली. एकूण २३ गाण्यांवर नाट्यसादरीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण महानाट्य हे न थांबता दोन तास वीस मिनिटांचे झाले आहे.
अशा या अनोख्या महानाट्याच्या सादरीकरणाच्या यशाचे श्रेय ते लोकविश्वास प्रतिष्ठान संस्थेतील शिक्षक-शिक्षिका व इतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी व त्यांचे पालक यांना देतातच. त्याशिवाय संगीत, नेपथ्य, ध्वनीमुद्रण, पार्श्वसंगीत, गायन व वेगवेगळ्या आवाजासाठी साथसंगत करणारे जयेंद्र यांचे सहकलाकार दिलीप वझे, राजमोहन शेट्ये, विशाल गावस, उदय च्यारी, बिंदिया वस्त, नम्रता वायंगणकर, वेदा मणेरीकर, माधुरी शेटकर यांची उत्तम साथ त्यांना लाभली व त्यामुळेच हे जिवंत महानाट्य त्यांना सादर करता आले. शिवाय योग्य वातावरण निर्मितीसाठी त्यांनी एक विशेष रथ तयार करून सरकता रंगमंच उभारून घेतला होता, ज्यामुळे त्यांना वेगवेगळी दृश्ये सादर करणे सोपे झाले. त्यात राक्षस, वानर सेना, डोंगर, झाडे, फुले, पाखरे यांची दृश्ये करून वेगवेगळ्या छटांची निर्मिती केली. युद्धाचे प्रसंग हुबेहूब उभे केल्याने नाटकात जिवंतपणा आला.
शेवटी हेच म्हणावे लागते की मेहनतीशिवाय फळ नाही. म्हणूनच जयेंद्र यांना हे महानाट्य सादर करण्याची संधी लोकविश्वास प्रतिष्ठानने दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले आहे व राज्यात या महानाट्याचे प्रयोग अनेक ठिकाणी व्हावेत अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. तसेच लोकविश्वास प्रतिष्ठानच्या आणि इतरही मुलांच्या चेहर्यावर पुन्हा पुन्हा हास्य तरळावे, असे त्यांना मनापासून वाटते. अर्थातच सरकार दरबारी प्रयत्न व्हावेत, सामाजिक दाते पुढे यावेत असेही त्यांना वाटते.
म्हणूनच आजच्या काळात नाट्य क्षेत्रात करिअर करणार्या नव्या पिढीने जयेंद्रनाथ हळदणकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मेहनतीची कास धरल्यास त्यांच्या यशाची गती कोणीही थांबवू शकणार नाही याची खात्री वाळगावी.