- नीना नाईक
सर्वच स्टाफ घाबरला. चेहर्यावर शांत भाव ठेवत मी त्या दिशेने धावले. वस्तुस्थितीचा अंदाज घेतला. आता सी.आय.डी. अंगात शिरला. बाथरुममध्ये कुणीच दिसत नव्हते. वर्गात सर्वांना व्यवस्थित बसवून घेतले.
शाळा सुरु झाल्या. पहिला दिवस असल्याने विद्यार्थी कावरेबावरे होते. काहींना आईवडील सोडायला आले होते. आपण नववीत नापास झालो तरीही दहावीच्या परिक्षेला बसू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या चेहर्यांवर दिसत होता. नॅशनल ओपन स्कूल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वरदानच आहे. नववीत अथवा काही कारणाने पाचवीनंतर शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करायची इच्छा असलेले विद्यार्थी दहावी पूर्ण करू शकतात. अकरावीत नापास झालेला विद्यार्थी बारावीसाठी बसू शकतो. अशा प्रकारे हजारोंवर विद्यार्थी प्रत्येक वर्षी परिक्षेला बसून उत्तीर्ण होतात.
अशा या शाळेत मुलांची संख्या बरीच असली तरी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वभावाची मुलं पहायला मिळतात. बरेच काही शिकता येते. प्रसंगी रागे भरावे लागते. आज श्रीगणेशा असल्याने सर्वच उत्साहात होते. शिक्षिका नव्या जोमाने आल्या होत्या.
घंटा वाजायची होती. तेवढ्यातच आरडाओरडा ऐकायला आला. काय होते आहे हे कळायच्या अगोदरच बाथरुममधून एक मुलगी धावत माझ्याकडे आली. रगत.. रगत…कुठे विचारताच ‘वॉश रूमात’ सांगितले. सर्वच स्टाफ घाबरला. चेहर्यावर शांत भाव ठेवत मी त्या दिशेने धावले. वस्तुस्थितीचा अंदाज घेतला. आता सी.आय.डी. अंगात शिरला. बाथरुममध्ये कुणीच दिसत नव्हते. वर्गात सर्वांना व्यवस्थित बसवून घेतले. शिक्षकांना जबाबदारी दिली की त्यांनी आपापल्या वर्गात जाऊन कुणाच्या युनिफॉर्मला रक्त दिसते का हे पहावे. शिक्षकांनी आपापल्या क्लासमध्ये जाऊन पाहणी केली. एका वर्गात एका मुलीच्या ड्रेसला रक्त दिसले. तिला स्टाफरुममध्ये पाठवले गेले.
ती खूप घाबरलेली होती. तिला बसवून पाणी दिले. तिच्यासाठी चहा आणि खायला ताहीतरी मागवले. तिला धीर दिला. तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि काय झालं विचारले. ती जणुकाही त्या प्रश्नाची चातकासारखी वाट पाहत होती. तिने धडाधड बोलायला सुरुवात केली.
मॅडम, मी आठवीत शिकत होते. दिसायला साधारण होते. मी शिकायला चांगली होते. तरी आजूबाजूला वाढत्या वयात पाहात होते की सर्वांना मित्र आहेत. आमच्या घरात वातावरण कडक होते. मुलांशी बोलणे उचित समजले जात नव्हते. त्यामुळे माझी कुणाशी मैत्री नव्हती. आईवडील कामाला जात. कंटाळा अला की मामाच्या दुकानावर जात असे, त्यांना मदत करत असे. सध्या मामा बरा नव्हता. तेव्हा शाळेतून आल्यावर मी थेट तिथेच जात असे. त्यांना माझी मदत होई. कामात मी झटपटीत होते. असेच दिवस गेले. मामाच्या दुकानात अनेक गिर्हाईक येत आणि मी त्यांना सामान पटापट देत असे. मी माझ्यातच मश्गूल होते. त्याच दरम्यान एक मुलगा तिथे रोज यायचा. रोज काही ना काही वस्तू घ्यायचा. निमूटपणे जायचा. त्याचे नित्याचे येणे अंगवळणी पडले. त्याच्याशी बोलणे सुरु झाले. साध्या परिचयाचे प्रेमात रुपांतर कधी झाले ते कळले नाही. मलाही तो हवाहवासा वाटे. त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्याबद्दल मला फार माहिती नव्हती. त्याने त्याची ओळख शिक्षक म्हणून करून दिली होती.
रोजच्या भेटीनंतर त्याच्या स्वभावाचे कंगोरे कळायला लागले. मी कुणाशी बोलते, कुठे जाते यावर त्याचे बारीक लक्ष होते. गिर्हाईकांशी बोलणेही त्याला रुचत नसे. माझी शाळाही त्याला रुचत नव्हती. माझी शाळा सुटली. प्रेम असच होतं. मी त्याच्यात रमत गेले. तो मात्र मला संपवत गेला. माझं शिक्षण, माझं करियर यावर कुर्हाड पडते याचा अंदाज मला यायला लागला. घरातल्या मंडळींनी मला सर्व बाजूंनी विचार करायला सांगितला. पुढच्या आयुष्यात तू तुला शून्य करून ठेवतेस याची जाणीव करून दिली. त्याची माहिती काढली तेव्हा कळले की तो जिममध्ये शिकवतो. त्याचा तुटपुंजा पगार. त्याच्या जबरदस्तीतून मला मोकळे व्हायचे होते. मी प्रयत्न सुरू केला. शारीरिक नाचही खूप होत होता. मी दूर होते हे पाहून तो चवताळला. त्याने अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. कुटुंबही त्यात होरपळत होते. त्याचे खरे दात आता मी पाहात होते. आता मी ठाम होते की ह्यातून बाहेर पडणार. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मी माझी सुटका करून घेतली. एक वर्ष गावात जाऊन राहिले. वर्षभरात मी खूप धीट झाले होते. त्यानंतर मी इथे प्रवेश घेतला. आता माझा मार्ग मी निवडलेला होता. मला शिकायचे आहे. मला पूर्णविराम लावून नवीन जीवन जगायचे आहे. मी त्याला टाळतेय हे पाहून त्याने माझा पिच्छा केला. शाळेपर्यंत आला. बाथरुममध्ये घुसून त्याने त्याची शिर कापली. आपलं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तो दाखवायला त्याने सर्वकाही नाटक केले.
खूप रक्त वाहिले त्याचे. मी बाथरुमात पाणी घातले. झटापटीत माझ्या अंगावर रक्त पडले. मी ते धुवून घेतले.
तो धावत खाली गेला. मी त्याच्यात अजूनही गुंतले असावे ज्यामुळे मी वेड्यासारखी त्याला दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी मागे मागे गेले. तो बाईकवरून नाहीसा झाला. मी स्वतःला सावरून घेऊन वर्गात जाऊन बसले.
तिची कहाणी संपली. पिक्चरचा ट्रेलर दाखवतात तसे वाटले. मी तिला मनसोक्त रडू दिले. तिला भीति होती की आपल्याला पोलीस नेतील का? तो जिवंत असेल ना? तिची शंका ग्राह्य होती. मी तिच्याकडून त्याचा फोन नंबर घेतला. त्याला ‘शाळेत ताबडतोब ये’ असा आदेश दिला. त्याने नकार देताच ‘शाळा तुझ्यावर दावा ठोकणार’ची पोकळ धमकी दिली. तो धावत हजर झाला. आता त्याची बाजू समजावून घेणे महत्त्वाचे होते. त्याने तिने सांगितलेल्या कथेसारखीच कथा प्रस्तुत केली. आमच्याकडे एकच मुद्दा होता. त्याचे अत्याचार तिला मान्य नव्हते. तिचे छळ त्याने केले हे त्याने मान्य केले. त्याअंतर्गत त्याला कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते; ती अल्पवयीन आहे त्यामुळे तो कसा अडचणीत येऊ शकतो; थोडीशी कायद्याची भीति.. असे सर्वांचे मिश्रण करून त्याला तिची वाट मोकळी करायला सांगितले. ‘आपणहून जर तू तिच्या प्रेमाची तिलांजली दिलीस तर योग्य होईल’, असा सल्ला दिला.
कोवळ्या वयात शारीरिक आकर्षणामुळे होऊ घातलेल्या़ प्रेमाला अर्थच नसतो. ते टिकावू तर नसतंच, नुकसान मात्र भरपूर होते. आता ती मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करून चांगल्या हॉटेलात कामाला आहे. ती कधी-मधी शाळेत येते. धन्यवाद देते. आम्ही तिला दिलेल्या संरक्षणासाठी ती सदैव ऋणी आहे, असे वारंवार सांगते. आपला अनुभव शाळेत इतरांनाही सांगण्याचा अट्टहास तिचा असतो. त्या रानटी माणसापासूनची सुटका आणि आलेल्या अनुभवातून ती खूप काही शिकली.
त्याने विचारलेले काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ‘‘मॅडम, मी तिच्यावर प्रेम केले. मी काही गोष्टी करायची तिला मनाई केली. तिने ते आधी मान्य केले. मी माझ्याबद्दल काहीही लपवले नाही. मी जिथे काम करतो तेथे मी तिला नेले. मी तिचे सर्व खर्च उचलले. आईवडिलांच्या मनाविरुद्ध गेलो. ती आज शारीरिक अत्याचार म्हणते पण तिनेही पुढाकार घेऊन माझ्याबरोबर शारीरिक सुख घेतले. कदाचित तोचतोचपणा तिला बोचला असेल. तीदेखील मला काही टिप्स देत होती. मीही अनुकरण केले. त्यावेळी तो बलात्कार नव्हता का? कपडेलक्ते, मोबाईल घेताना तिला काहीच वाटलं नाही. व्यवहार केला तिने माझ्याबरोबर. तिच्या वाढत्या मागण्या मी पुरवू शकलो नाही. तेव्हा तिने माझ्यावर आरोप केला. स्त्रियांच्या कायद्याचे ज्ञान मला नव्हते. आता मी शहाणा झालो. तिचा मार्ग तिला मोकळा आहे. तिचे कान कुणी भरले हे मला माहीत नाही. ती मला भेटली त्यावेळी ती कशी होती आणि आता ती पहा कशी आहे. माझ्या खूपशा प्रश्नांची उत्तरे ती न देता लपून होती म्हणून हे कृत्य केले. मी माझ्या जिवावर उदार झालो नाही. मी फक्त उत्तरांची अपेक्षा करत होतो. माझे डोळे आता उघडले. विचार करायला लावणारी शंका होती, ज्याचे उत्तर तीच देऊ शकते’’.