अविस्मरणीय ‘गणतंत्र दिन’ सोहळा

0
253
  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई

भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशाखाली दिल्लीत देशभरातून २ ते ३ हजार संरक्षण दले तसेच एनसीसी, एनएसएस, तसेच अर्धसैनिक दलाच्या तुकड्या संचलनाच्या तालमींसाठी सज्ज असतात. हे संचलन लाल किल्ल्यापासून सुरू होऊन इंडिया गेटपर्यंत चालते, त्यावेळी या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आपण पाहतो.

२६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अमलात आणण्यात आली पण भारत निवडणूक आयोग २५ जानेवारी १९५० साली अस्तित्वात आला. गेली सात दशके आम्ही एक संविधान प्रणाली लागू केली आहे. भारताच्या संविधानामधली प्रस्तावना हा संविधानाचा आत्मा म्हणून ओळखला जातो. गेली कित्येक वर्षे आम्ही संविधानात वेगवेगळे बदल घडवून आणलेले आहेत. भारताचं संविधान हे जगात सर्वांत लांबलचक संविधान म्हणून ओळखलं जातं. संविधानामध्ये मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत. मुलभूत कर्तव्ये तिसर्‍या भागात कलम १२ ते ३५ तर विशेष अशी निर्देशात्मक तत्त्वे चौथ्या भागात कलम ३६ ते ५१ मध्ये नमूद केली आहेत. आजच्या या झपाट्याने बदलत चाललेल्या युगात भारतीय नागरिकांनी मुलभूत कर्तव्ये पार पाडणे ही काळाची गरज आहे.

मुलभूत कर्तव्ये ११ असून त्यात वेगवेगळी बंधने घालून दिली आहेत.
१. संविधानाप्रमाणे वर्तन करणे, संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शांचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे..
२. स्वातंत्र्य मूल्याला प्रेरक असलेल्या आदर्शांचे संवर्धन करणे आणि ती अनुसरणे.
३. देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकसंधता यांचा परिपोष व रक्षण करणे.
४. देशाचे संरक्षण करणे व वेळ आल्यास राष्ट्रसेवेत समाविष्ट होणे.
५. देशाच्या विविध धर्मीय, भाषिक तसेच वांशिक लोकांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ करणे, तसेच रुढीच्या प्रतिष्ठेस बाधा आणणार्‍या चालीरीतींचा त्याग करणे.
६. जंगले, उद्याने, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक संपत्तींचे रक्षण करणे व ती वाढीस लावणे आणि सर्व प्राणिमात्रांबद्दल दयाभाव बाळगणे.
७. शास्त्रीय दृष्टिकोन, मानवतावादी भूमिका व चौकस तसेच सुधारणावदी दृष्टिकोन यांचा परिपोष करणे.
८. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचार निषिद्ध मानणे.
९. वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती साधून देशाच्या प्रगतीस हातभार लावणे.
१०. सर्वांत महत्त्वाचे मुलभूत कर्तव्य म्हणजे सर्व मुलांना गुणात्मक शिक्षण प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी सरकारने सोयी-सवलती पुरवणी करणे असा आहे.
११. ६ ते १४ वर्षांच्या मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे शिक्षण प्राप्त करून देणे.
गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात आम्ही साक्षरतेचे दर सातत्याने वाढवलेले आपल्याला दिसतात.

आज आपण एका महत्त्वाच्या पायरीवर असताना देशाच्या गणतंत्र दिवसाची माहिती असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. २६ जानेवारी या दिवशी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या शानदार पद्धतीने राजधानी दिल्ली येथे साजरा करण्यात येतो. एका विदेशी अतिथीस या समारंभास दरवर्षी आमंत्रित करून हा समारंभ पार पाडला जातो. तीन तास चालणार्‍या या सोहळ्यात भारतीय फौजांचे दल सहभागी होतात ज्यामध्ये नौसेना, वायुसेना, स्थलसेना, तसेच कोस्ट गार्ड, एन.सी.सी., एन्.एस्.एस्. आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील विविध राज्यांनी आपापल्या राज्यांचे चित्ररथ पाठवलेले असतात. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार एक महिना आधी सुरू करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही देण्यात येते.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशाखाली दिल्लीत देशभरातून २ ते ३ हजार संरक्षण दल तसेच एनसीसी, एनएसएस, तसेच अर्धसैनिक दलाच्या तुकड्या संचलनाच्या तालमींसाठी सज्ज असतात. हे संचलन लाल किल्ल्यापासून सुरू होऊन इंडिया गेटपर्यंत चालते, त्यावेळी हा साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आपण पाहतो. सोहळ्याच्या तीन दिवस अगोदर रंगीत तालीम असते. सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष सुरक्षा पथके याठिकाणी तैनात केली जातात. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, ‘अमर जवान ज्योती’ येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. त्याचवेळी प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून पराराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. यावर्षी या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो उपस्थित होते. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती भारतीय फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे. त्यापाठोपाठ असलेल्या राज्यांच्या चित्ररथांमुळे माहोल बदलून जाते. संचलन संपल्यानंतर सर्वजण परत लाल किल्ल्यावर आपल्या तंबूत परततात. परंतु प्रजासत्ताक दिवसाचे कार्यक्रम मात्र एवढ्यानेच संपत नाही. भारताच्या संरक्षण मंत्र्यांहस्ते संचलनाचे बक्षीस वितरण असते. संचलनात सहभागी झालेल्या वेगवेगळ्या चमूंना मानपत्र देण्यात येतात.

त्यानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम हा दरवर्षी २९ जानेवारी रोजी असतो. याला इंग्रजीमध्ये ‘बिटींग रिट्रीट’ असे म्हटले जाते. हा सोहळा राष्ट्रपती भवनाच्या समोर खुल्या आवारात साजरा होतो. ‘विजय चौक’ असे त्याचे नाव आहे. राष्ट्रपती या संगीतमय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतात. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालतो. यात भारतीय संरक्षण खात्यातल्या तिन्ही (आर्मी, नेव्ही आणि वायुसेना) गटांच्या बँड्‌सची संगीत चमू वेगवेगळ्या गीतांचे संगीत वाजवून वातावरण मंत्रमुग्ध करतात. बिटींग रिट्रीट हा कार्यक्रम संपल्यानंतर सैन्याच्या तुकड्या आपापल्या छावणीत परततात आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपतो. या सोहळ्याला ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. ब्रिटीश शासन असताना हा सोहळा एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत असे. स्वराज्यात आपण हा सोहळा गणतंत्र दिनाचा समारोप म्हणून करतो. सात दशकांनंतर आजही ‘विजय चौक’यास त्याच इतमामात भारत सरकार मानाचा मुजरा करत आहे.

संपूर्ण देशातून राजधानी नवी दिल्लीत आगमन झालेली तरुणाई तसेच सैन्याचे विविध गट आपापल्या निवासास परततात आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न होतो. याच दिवसाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारच्या वतीने संरक्षण तसेच पुलीसांना सम्मान बहाल केले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळे नागरि सम्मान जसे भारत रत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारांची घोषणा केली जाते. हा सोहळा म्हणजे आपल्या देशातील एक अविस्मरणीय सोहळा असतो, असेच म्हणावे लागेल.