जमिया नगर येथे काल सीएएविरोधात निदर्शने सुरू असताना त्या निदर्शकांच्या दिशेने एका व्यक्तीने पिस्तुलाने गोळीबार केल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. या गोळीबारात जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा एक विद्यार्थी जखमी झाला. पिस्तुलधारी व्यक्तीने सदर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पिस्तुल लावून ‘ये लो आजादी’ असे उद्गार काढले असे वृत्त आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडली.
जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर ही निदर्शने सुरू होती. वरील गोळीबाराच्या घटनेनंतर सदर भागात निषेधाची तीव्रता मोेठ्या प्रमाणात वाढली. शेकडोंच्या संख्येने निदर्शकांनी तेथे उभारण्यात आलेले अडथळे मोडून टाकीत पोलिसांशी संघर्ष सुरू केला. स्वतःला ‘रामभक्त गोपाळ’ असे म्हणणार्या पिस्तुलधारी व्यक्तीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर पिस्तुलधारीने केलेल्या गोळीबारामुळे त्या भागात मोठी दहशत निर्माण झाली होती. पिस्तुलधारी माणूस त्यावेळी मोकळ्या जागी जाऊन ‘ही घ्या आजादी’ असे हिंदीतून ओरडला. त्यावेळी तो फेसबुकवर लाईव्ह दिसत होता, असेही वृत्त आहे. त्याच्या नावाविषयी पोलीस खातरजमा करीत आहेत. या कृतीआधी त्याने फेसबुकवरून ‘शाहीन बाग खेल खतम’ असा संदेशही टाकला होता. तसेच दुसर्या एका संदेशात त्याने ‘माझ्या अखेरच्या प्रवासात मला भगव्यात गुंडाळा व जय श्रीराम म्हणा’ असेही म्हटले आहे. सदर पिस्तुलधारी सीएए समर्थन करणार्या घोषणा देत होता. या सर्व प्रकाराचे चित्रण टिव्ही चॅनल्सच्या प्रतिनिधीनी केले.
याबाबत आमना आसिफ या विद्यार्थिनीने सांगितले की, अन्य एक विद्यार्थी शदाब फारूक सदर हल्लेखोराला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच पिस्तुलधारीने शदाबच्या हातावर गोळी झाडली. यावेळी विद्यार्थी गांधीजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाट येथे आदरांजली वाहण्यासाठी जात होते व गेट क्र. ७ वर पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना रोखले होते. पिस्तुलधारीचे नाव राम भगत गोपाल शर्मा (वय १९) असे असून तो ग्रेटर नॉयडा येथील आहे.
निदर्शक हिंसक होते हे सिद्ध ः मनोज तिवारी
दिल्लीचे भाजप नेते मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, जमियानगर येथील गोळीबाराच्या घटनेवरून तेथील निदर्शक हिंसक वृत्तीचे होते हे सिद्ध झाले आहे. हे निदर्शक गोळ्या व बॉम्ब यावर विश्वास ठेवणारे आहेत, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘अलीकडेच पंतप्रधानांना ठार मारण्याची भाषा बोलली जात होती आणि आता ही गोळीबाराची घटना घडली आहे.
अमित शहा यांच्याकडून
कारवाईचे निर्देश
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जमियानगर येथील गोळीबाराच्या घटनेसंदर्भात आपण दिल्ली पोलीस आयुक्तांकडे चौकशी केली असून कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे, असे ट्वीट केले आहे. केंद्र सरकार असा प्रकार खपवून घेणार नाही व गुन्हेगारावर योग्य कारवाई होईल, असे शहा यांनी म्हटले आहे.