गावकर्‍यांच्या मदतीने गावचा घडवला कायापालट

0
193
????????????????????????????????????

>> कोसंबी महोत्सवाच्या समारोप व्याख्यानात डॉ. राजावत

गावाच्या विकासासाठी आपल्या शिक्षणाचा वापर करून गावकर्‍यांच्या मदतीने गावाचा कायापालट घडवून आणला, असे प्रतिपादन राजस्थानमधील टोक जिल्ह्यातील मालपुरा तहसिलमधील सोडा गावाच्या पहिल्या महिला सरपंच डॉ. छावी राजावत यांनी येथे काल केले.

कला व संस्कृती संचालनालयाने आयोजित १३ व्या डी.डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. राजावत यांनी चतुर्थ पुष्प गुंफले. आपल्या शिक्षणाचा समाजाच्या विकासासाठी वापर केला पाहिजे. शिक्षण सर्वांना मिळत नाही. देशात अनेक मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्याच प्रमाणे जीवनात पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. पैसा किती कमविला याला किंमत नाही. तर, आपण समाजासाठी काय केले याला जास्त महत्त्व आहे. आजच्या तरुण पिढीने सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविला पाहिजे, असे डॉ. राजावत यांनी सांगितले.

पंचायतीवर बहुमताने निवड
वर्ष २००९ – २०१० मध्ये गाव अनेक समस्यांनी ग्रस्त होते. गावात दुष्काळाची परिस्थिती होती. गावातील पाणी दूषित झाले होते. शेतीसाठी पाणी उपलब्ध नव्हते. आरोग्य समस्या भेडसावत होती. याच पार्श्‍वभूमीवर गाव पंचायतीच्या निवडणुकीची तयार सुरू होती. आपल्या शिक्षणाचा गावाचा विकासासाठी वापर करण्याच्या उद्देशाने पंचायत निवडणूक लढविण्याबाबत विचार विनिमय चालविला होता. वडिलांकडून निवडणूक लढविण्यासाठी मान्यता मिळाली.

सरपंचपदी निवड झाल्याने गावाच्या विकासाचे मोठे आव्हान ठाकले. पहिल्या टप्प्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. सुमारे २० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. सरकारी पातळीवरून निधी जमा करण्यासाठी प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे थोडीशी हताश झाली. पण, वडिलांच्या मदतीने त्यांच्या एका मित्राकडून थोडीफार मदत मिळाली.

राजकारण्यांच्या हातातील
बाहुले बनले नाही

गावातील स्थानिक राजकारण्याचे हातातील बाहुले बनले नाही. अल्पावधीत केलेल्या कामाचा दखल राज्य व केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांना घ्यावी लागली. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता खासगी कंपन्या व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गावात विकास प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. गावातील नैसर्गिक झरे, स्वच्छतागृहे, शिक्षण, आधुनिक शेती, आरोग्य, स्वयंसेवा गटांची निर्मिती तसेच आधुनिक साधन सुविधांवर भर दिला, असेही डॉ राजावत यांनी सांगितले