Home बातम्या आसाम वाचवा, देश वाचवा!

आसाम वाचवा, देश वाचवा!

0

दत्ता भि. नाईक

आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनार्‍यावर बोडो जनजातीचा रहिवास आहे. हे स्वतःला भीमपुत्र घटोत्कचाचे वंशज समजतात. आजही ते घटोत्कचासारखे केस कापतात. निर्भय व अपमान सहन न करणारे असे हे बोडो. आसाममधील कोक्राझार, चिरांग, बस्का व उदालगुडी या चार जिल्ह्यांत त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. आसामच्या इतर जिल्ह्यांतही तुरळकपणे व अरुणाचल प्रदेश व नेपाळमध्येही बोडो जनजातीचे लोक आढळतात. ते निसर्गपूजक असून हिंदूधर्मीय आहेत. त्यांची बोडो भाषा देवनागरी लिपीतून लिहिली जाते व तिला घटनेच्या आठव्या परिशिष्टातही स्थान प्राप्त झालेले आहे.

कोक्राझार जिल्हा हा नेहमीच प्रसिद्धी मिळवणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात बोडोलँड नावाचे नवीन राज्य निर्माण करण्याची मागणी केली गेली होती. याच जिल्ह्यात फकिराग्राम नावाचे एक मोठे रेल्वेस्टेशन आहे. हावडा व दिल्लीवरून गुवाहाटीकडे जाणार्‍या सर्व गाड्या येथून जातात. आसामचे यापुढे विभाजन करायचे नाही ही सर्वच राजकीय पक्षांची भूमिका असल्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या काळात या भागात बोडो प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली व तेव्हापासून या भागात शांतता नांदत होती.

पूर्वनियोजित कट

२० जुलै २०१२ रोजी येथे वेगळ्याच कारणामुळे हिंसाचार उसळला. बांगलादेशमधून गेल्या साठ वर्षांच्या काळात जी घुसखोरी झालेली आहे त्याचा हा परिपाक होता. प्रामुख्याने ही दंगल कोक्राझारमध्ये झालेली असली तरी ती नंतर सर्व बोडो प्रदेशात पसरली. मागच्या वर्षी याच प्रदेशात उदालगुडी येथील मूळ निवासी असलेल्या बोडोंवर जबरदस्त हल्ला करण्यात आला होता. याकडेही नेहमीचीच बाब म्हणून दुर्लक्ष करण्यात आले होते. यंदा २० जुलै ते २५ जुलैपर्यंत असेच वातावरण तापत गेले. सुरुवातीला मार खाणार्‍या बोडोंनी नंतर प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा कुठे सर्वांचे या घटनेकडे लक्ष गेले. स्वतःच्या देशातील नागरिकांपेक्षा परदेशी लोकांची चिंता करणार्‍या केंद्र सरकारमुळे, जेव्हा बांगलादेशी घुसखोरांवर हल्ले झाले व त्यांचे नुकसान झाले तेव्हाच सरकारी यंत्रणा जागी झाली.

या भागात सुरक्षित वनक्षेत्र व बफर वनक्षेत्र आहे. घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राला आगी लावून तेथे वस्ती वाढवलेली आहे. एकाहत्तर हजार हेक्टर शेतीयोग्य जमिनीवर घुसखोरांनी अतिक्रमण केलेले आहे. याला विरोध करणार्‍या काही बोडो युवकांना घुसखोरांनी ठार मारले. यानंतर महिलांची छेडछाड करणार्‍यांना जाब विचारायला जे युवक गेले, त्यांच्यावरही हल्ला झाला. बोडोही तितकेच चिवट असल्यामुळे घुसखोरांनाही चांगलाच मार खावा लागला आणि परिणामस्वरूप हा विषय वाढला.

हे सर्व पूर्वनियोजित होते. रात्रीच्या वेळी दहा हजार घुसखोर हातात शस्त्रे घेऊन बोडोवस्तीवर हल्ला करण्यासाठी आले होते. सरकारी यंत्रणेकडून हा तत्कालिक उद्रेक असे सांगण्यात येते, परंतु कुठल्याही गावात आयत्या वेळेला हाक देऊन दहा हजार लोक जमवणे शक्य नसते हे उघड सत्य आहे. या हल्लेखोरांजवळ उत्कृष्ट प्रतीची शस्त्रे होती. लोकांचे सामान लुटून गाड्यांमध्ये भरण्यात आले व घरांवर पेट्रोलचा फवारा मारून आगी लावण्यात आल्या. १४ ऑगस्ट १९४७ रोजी लाहोरमध्ये काय चालले होते याचे वर्णन माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे बंधू सतीश गुजराल यांनीच केलेले आहे. याच्याशी या घटना एकदम मिळत्याजुळत्या आहेत. परिणामी, या सर्व घटनांमुळे दोन लाखाहून अधिक बोडो जनजातीचे लोक आपल्याच प्रदेशात निर्वासित छावण्यात राहतात.

स्व. इंदिरा गांधींचा खोटारडेपणा

आसाममधील घुसखोरविरोधी आंदोलनाचा बराच मोठा इतिहास आहे. १९८० च्या दशकात या राज्यात बहिरागत खेदॉंऊया नावाचे बांगलादेशी घुसखोरांची परत पाठवणी करावी म्हणून एक आंदोलन उभे राहिले होते. ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन (आसू) व गणसंग्राम परिषद या दोन स्थानिक संघटना या विषयात अग्रेसर होत्या. या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २ ऑक्टोबर १९८३ रोजी गुवाहाटी येथील जजेस फिल्ड मैदानावर आंदोलन, मोर्चा व सभेचे आयोजन करून पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर या दोन्ही संघटनांनी मिळून आसाम गणपरिषद या नावाचा पक्षही काढला. सर्वप्रथम या घुसखोरांची नावे मतदारयादीतून काढून टाकावी अशी त्यांची मागणी होती. परिणामस्वरूप, १९८४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाम गणपरिषदेचे प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. हे सरकार पाच वर्षे टिकले, पण समस्या सुटलीच नाही. ज्यावेळी हे आंदोलन सुरू झाले तेव्हा कॉंग्रेस पक्षाने देशात कुठेही घुसखोर नाहीत असे जाहीर केले. तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींनी तर या आंदोलनाला देशभर बदनाम करण्याचा सपाटाच लावला. त्यांनी इतका खोटारडेपणा केला की हे आंदोलन आसाममध्ये स्थायिक झालेल्या देशभरातील लोकांच्या विरोधात असल्याचा प्रचार केला. तेथे असलेले केरळी, गुजराती, मारवाडी व बंगाली यांच्याविरुद्ध हे आंदोलन आहे असेच त्या सर्वत्र सभांमधून सांगत होत्या. हे सर्व घुसखोर हे मुसलमान आहेत, हेच त्यांच्या तरफदारीचे प्रमुख कारण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

हा बद्रुद्दिन अजमल कोण?

घुसखोरी हा केवळ बोडो क्षेत्रापुरतीच नाही. कोक्राझारच्या दक्षिणेला असलेल्या धुब्री जिल्ह्यात सध्या लोकसंख्येच्या साठ टक्के मुसलमान आहेत. या जिल्ह्यात हिंदूंना मुक्तपणे वावरणेही मुश्कील झालेले आहे. महिलांची स्थिती तर विचारायलाच नको. २० जुलैनंतर धुब्री जिल्ह्यातून सर्व हिंदू निघून जाणार अशाही बातम्या सर्वत्र पसरवल्या गेलेल्या आहेत. या जिल्ह्यातील बोडो विद्यार्थ्यांचे वसतिगृह पोलिसांच्या समोर जाळले गेले.

या सर्व घटनांमागे बद्रुद्दिन अजमल व त्याची ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आहे हे आता सिद्ध झाले आहे. या ए.आय.यू.डी.एफ.चे आसाम राज्य विधानसभेत कॉंग्रेसपाठोपाठ स्थान आहे. २०११ मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तरुण गोगोई यांनी मी घुसखोरांना अभय देण्यासाठी राजकारणात उतरलो नाही अशी घोषणा करून व बांगलादेशमधून आलेल्या हिंदूंना निर्वासितांचा दर्जा देऊन सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले अन् भारतीय जनता पार्टी व आसाम गण परिषदेच्या शिडातील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणुकीत कॉंग्रेसला १२६ पैकी ७२ जागा मिळाल्या. परंतु हे आश्‍वासन आश्‍वासनच राहिले. तरुण गोगोई यांना मात्र मुख्यमंत्रिपद मिळाले. हे सर्व करत असताना तरुण गोगोई यांनी स्वतःला बद्रुद्दिन अजमलपासून चार हात दूर ठेवले. बद्रुद्दिन अजमल याचा अत्तराचा व्यापार असून त्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. त्यामुळे पैसा खर्च करण्यास तो केव्हाही मागेपुढे पाहत नाही. त्याचा देशभरात प्रवास असतो व तो मुंबईत बर्‍याचवेळा मुक्कामही करतो. त्याच्या पक्षाचे आसाम विधानसभेत पंचवीस आमदार आहेत. सर्व घुसखोरांची मतदारयादीत नावे आहेत. त्यांच्याजवळ रेशनकार्डस् आहेत. आणि याच जोरावर त्याने घोषणाही केलेली आहे की आसामचा भावी मुख्यमंत्री एकतर मी असणार किंवा मी सांगेन तो असणार. त्याची ही घोषणा अशक्यकोटीतील वाटत नाही. हा बद्रुद्दिन फक्त राजकीय नेता नाही तर तो धार्मिक नेताही आहे. तो त्याच्या शिष्यांना गंडेदोरे बांधतो, प्रसादात थुंकतो व नंतर तो भक्तगणांत वाटला जातो. आसामात भारतबांगलादेश सीमेवर त्याने तीन मदरसे उभे केलेले आहेत. त्यात प्रत्येकी दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.

ही संपूर्ण देशाची समस्या

आपल्या देशात विदेशी नागरिक घुसतात व ते गावागावांतील मूळ रहिवाशांना हाकलून लावतात, ही केवळ त्या प्रदेशाची समस्या नाहीती संपूर्ण देशाची समस्या आहे. आसामातील कोक्राझार व धुब्री हे दोन जिल्हे देशापासून तोडले गेल्यास आसाम संपूर्ण देशापासून अलग होईल. बिहारमध्ये किशनगंज जिल्ह्यातही असेच घुसखोर आहेत. त्याला तर देशाची चिकन नेक असे समजतात. त्यामुळे या दुसर्‍या फाळणीची लक्षणे दाखवणार्‍या घटना आहेत.

जसे बंगलादेशी घुसखोर भारतात घुसलेले आहेत तसेच ते शेजारच्या म्यानमार देशातही घुसलेले आहेत. त्यांना रोहिंग्या मुसलमान असे म्हणतात. येथील सरकार आपल्या सरकारसारखे गुळचट नसल्यामुळे त्यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. याच काळात रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये स्थानिक रहिवाशांना क्लेश उत्पन्न केला तेव्हा येथील रहिवासी त्याहून दुप्पट शक्तीने त्यांच्यावर तुटून पडले.

दि. ११ ऑगस्ट रोजी मुंबईत रजा अकादमीने एक सभा बोलावली व त्यात आसाममधील बांगला घुसखोर व म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान त्यांच्यावर हल्ले होत आहेत यासारखी प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. कित्येक ठिकाणी पूर्वांचलातील लोकांवर व रेल्वेच्या डब्यांत घुसून हल्ले करण्यात आलेले आहेत. एका परीने रजा अकादमीने देशाविरुद्ध बंड पुकारलेले आहे.

यांची परत पाठवणी करा

हे सर्व घडण्याच्या काही दिवस पूर्वीच गृहमंत्रिपद पी. चिदंबरम् यांच्याकडून काढून घेऊन सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे गृहखात्यावर पूर्ण नियंत्रणही नव्हते. सर्व कॉंग्रेसी नेते बोडोपेक्षा घुसखोरांचीच अधिक काळजी करताना दिसून येतात. विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनीही या भागाला भेट दिली, परंतु एवढ्याने हा प्रश्‍न सुटणार नाही.

हा घटनाक्रम म्हणजे नेहमीचीच बाब नव्हे. ही जातीय दंगल नव्हे जी वातावरण निवळले की थांबते. हे देशाविरुद्ध पुकारलेले लोकसंख्येचे आक्रमण आहे. मुस्लीम लिगच्या पूर्वपाकिस्तानच्या कल्पनेत पूर्ण आसाम म्हणजे आजचा आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा व मणिपूर होते. सुर्र्‍हावर्दीनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. आज ही त्यांची महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी देशभरातून त्यांना पाठिंबा देणार्‍या रजा अकादमीसारख्या संघटना आहेत. रात्र वैर्‍याची आहे. घुसखोरांना शोधणे, त्यांची मतदारयादीतून नावे काढून टाकणे व त्यांची परत पाठवणी करणे हे या प्रक्रियेतील तीन टप्पे आहेत. त्यातील घुसखोर कोण व कोठे आहेत हे आता सिद्ध झाले आहे. आता राहिलेली पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ अटळ आहे. ‘आसाम वाचवा, देश वाचवाहीच आता आपली घोषणा पाहिजे व तिचाच सर्वांनी ध्यास घेतला पाहिजे.