अमेरिकी दुतावासावर इराणचा प्रतिहल्ला

0
122

इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युुत्तर म्हणून शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवला. इराणकडून बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागण्यात आले आहेत. तसेच इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला असून यातून इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचेच संकेत असल्याचे समजण्यात येत आहे.

इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनला इराणने लक्ष्य केले. अमेरिकी दूतावासाच्या आत क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे अद्याप कोणतेही वृत्त नाही. या हल्ल्यानंतर बगदादमध्ये अमेरिकेच्या विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, इराणने केलेल्या युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या कोणत्याही ठिकाणावरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. असा हल्ला करणार्‍यांना हुडकून त्यांचा खात्मा करू अशी धमकी ट्रम्प यांनी म्हटले आहे.