न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यावर यजमान ऑस्ट्रेलियाने तिसर्या दिवसअखेर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. पहिल्या डावाच्या आधारे २०३ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात बिनबाद ४० अशी मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५४ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडने दुसर्या दिवसअखेर बिनबाद ६३ अशी आश्वासक मजल मारली होती. काल तिसर्या दिवशी मात्र या चांगल्या सुरुवातीचा लाभ त्यांना उठवता आला नाही. नॅथन लायनने ब्लंडेलला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. यानंतर जीत रावल (३१) याने कर्णधार लेथमसह दुसर्या गड्यासाठी ४९ धावा जोडल्या. ही भागीदारी फुलत असतानाच लायन पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला. लायनने रावलला पायचीत करत ही जोडी फोडली. पुढच्याच षटकात कमिन्सने लेथम (४९) याला परतीचा रस्ता दाखवला. त्यामुळे १ बाद ११७ वरून ३ बाद ११७ अशी त्यांची घसरगुंडी उडाली. यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले. पदार्पणवीर ग्लेन फिलिप्सने ५२ धावांची खेळी केली. टॉड ऍस्टलने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने ६८ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने यानंतर दुसर्या डावात वॉर्नर (नाबाद २३) व ज्यो बर्न्स (नाबाद १६) यांच्या बळावर आपली आघाडी २४३ धावांपर्यंत फुगवली.