१० फुटिरांविरोधी याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी

0
203

>> कॉंग्रेसची सभापती राजेश पाटणेकरांकडे याचिका

गोवा प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर एक याचिका सादर करून कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती काल केली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी गेल्या ८ ऑगस्ट २०१९ मध्ये सभापतीसमोर कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, जलस्रोत मंत्री फिलीप रॉड्रीगीस, आमदार नीळकंठ हर्ळणकर, आंन्तोनियो फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फे्रड डिसा, क्लाफासियो डायस, बाबुश मोन्सेरात यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे.

या अपात्रता याचिकेवरील प्राथमिक सुनावणी १५ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात आली होती. या याचिकेवरील पुढील कार्यवाहीबाबत याचिकादार किंवा त्यांच्या वकिलांना कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. तथापि, प्राथमिक सुनावणी होऊन कित्येक दिवस उलटले तरीही याचिकादार किंवा त्यांच्या वकिलांना पुढील कार्यवाहीबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही, असे सभापतींसमोर दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

१० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करून पाच महिने उलटले तरी याचिकेवरील सुनावणीबाबतच्या प्रक्रियेला चालना दिली जात नाही, अशी चोडणकर यांची तक्रार आहे.
आमदार सुदिन ढवळीकर यांनी मगोपमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर आणि बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याविरोधात सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल केलेली आहे.