– डॉ. सोमनाथ कोमरपंत
गोमंतकाला निसर्गसौंदर्याचे फार मोठे वरदान लाभलेले आहे. पश्चिम सागराचे सान्निध्य आणि पूर्वेकडून सह्याद्री पर्वताची रांग असलेला हा छोटासाच प्रदेश. त्याची रचनाच अशी की, निसर्गदेवतेच्या कोंदणातील तो कौस्तुभच वाटतो. अशा संपन्न निसर्गाचा संस्कार झालेला आणि समृद्ध अशा संचिताचा वारसा घेऊन आलेला येथला माणूस कलासक्त झाला तर नवल वाटायला नको. येथील भूमी, येथील डोंगर, येथील मांडवी- झुवारीसारख्या नद्यांची पात्रे आणि छोटे-मोठे सरिताप्रवाह, वृक्षराजी नितांत रमणीय आहेत. पण आपल्या चैतन्यरूपाने सृजनशील आणि शुभंकर हातांना येथील सृष्टी सतत आवाहन करीत असते. अभिरूचीसंपन्न आणि सव्यसाची साहित्यिक गोपाळकृष्ण भोबे म्हणतात :
‘‘शैल्य, माधुर्य, सौंदर्य आणि शुचिता या अभिजात गुणांची खैरात देवाने आपल्या चारही हातांनी गोमंतकावर केली. त्यामुळे गोमंतकात जन्म घेतलेल्या व्यक्तिमात्रांचे मन आपोआप कलासक्त व अपार उत्साही बनले.’’ (कलात्म गोमंतक/पृ. ५)
याच पुस्तकातील आठव्या प्रकरणात त्यांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे ः ‘‘मानवी आयुष्यात नशीब नावाची एक महान अदृश्य शक्ती आहे. शक्तीच ती! तिचे विवरण कोण करणार? समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून तिच्याच अनुग्रहाने कुणी तिचे चरित्रगायन केले तर.’’
याच चालीवर असे म्हणावेसे वाटते, ‘‘गोमंतभूमीतील सृष्टिसौंदर्य ही अपूर्व चीज आहे. तिचे विवरण कोण करणार? समुद्राचे रंग आणि आकाशाचा रंगफलक करून तिच्याच अनुग्रहाने कुणी तिचे रेखाटन केले तर.’’
सुदैवाने गोमंतकाला असा चित्रकलेचा समृद्ध वारसा लाभलेला. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य संस्कृतीच्या संगमातून येथील चित्रकलेची परंपरा विकसित झालेली आहे. दुर्दैवाचा भाग असा की, या समृद्ध प्रदेशाला परकीय राजवटीमध्ये दिवस कंठण्याचा अभिशाप जडला. या प्रतिकूलतेत येथील माणसांच्या कलागुणांना वाव मिळाला नाही. आत्मतत्त्वाचाच विसर पडल्यामुळे जीवनाच्या सर्वंकष उन्नतीचा मार्गच खुंटला. त्यातही अपवादभूत प्रतिभावंत दाखवता येतील की, त्यांनी आपल्या चित्रकला माध्यमातून येथील संचितांचे विभ्रम रंग-रेषांनी प्रकट केले. येथील लोकजीवनाच्या छटा रंगवल्या. येथला निसर्ग चिरबद्ध करून ठेवला. पूर्वपरंपरा टिकवलीच; शिवाय गतिमान काळानुसार नवी प्रयोगशीलता आणली. मुक्तीनंतरच्या काळात गोवा शासनाने कॉलेज ऑफ आर्ट स्थापन केल्यामुळे येथील नव्या पिढीच्या चित्रकारांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळाले. योग्य ते मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आजवर चालत आलेला समृद्ध वारसा अखंडितपणे चालू राहिला. त्याला अन्य मितीही प्राप्त झाल्या. ही अत्यंत श्रेयस्कर बाब होय. आदान-प्रदान प्रक्रियेने येथील नवोन्मेषांना धुमारे फुटले.
गायन, वादन, नाट्य, साहित्य आणि चित्रकला या कलांचा आस्वाद घेणारी माणसे गोमंतकात जुन्या काळातही होती. समाज या कलांना आश्रय देत होता. पण पुरेशा प्रमाणात या क्षेत्रात वावरणार्या व्यक्तींना त्या काळात प्रतिष्ठा नव्हती. तो उपजीविकेचा व्यवसाय होऊ शकत नव्हता. अंगात कलागुण असूनही त्याकडे वळणे म्हणजे त्या व्यक्तीला भिकेचे डोहाळे लागले आहेत असा दृढ समज सुसंस्कृत म्हणविल्या जाणार्या घटकांमध्ये होता. अशाही प्रतिकूल काळात अनेक चित्रकारांनी नाव काढण्यासाठी पुण्या-मुंबईला आणि अन्यत्र जाऊन कलासाधना केली. गोमंतकीय तरुण चित्रकार त्या काळात आपल्या उपजत गुणांचा विकास करण्यासाठी एकाकीपणे बाहेर पडले. या व्यक्तींचा चरित्रपट न्याहाळला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना वाटचाल करावी लागलेली आहे असे दिसून येते. त्याही काळात अनेकांनी दीर्घ आणि समृद्ध परंपरा असलेल्या मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन कलाशिक्षण घेतलेले आहे.
आन्तोनिओ झेवियर त्रिनिदाद, अनंत आत्माराम भौंसुले, अन्जेलो फोन्सेका, रघुवीर गोविंद चिमुलकर, मंगेश केंकरे, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, लक्ष्मण पै, व्ही. एस. गायतोंडे, शांताराम आमोणकर, न्यूटन सोझा, मारियो मिरांदा आणि प्रफुल्ल डहाणूकर इत्यादी चित्रकारांनी नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेली आहे. रघुवीर चिमुलकारांचे समकालीन चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांनी पॅरीसला पुढचे शिक्षण घेऊन ते परदेशातच स्थायिक झाले. त्यांनी या क्षेत्रात ख्याती मिळविली आहे. अनंत भौंसुले हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक झाले. ‘पोट्रेटपेंटर’ म्हणून ते नावाजले.
या चित्रकारांच्या चित्रशैलीच्या गुणवैशिष्ट्यांचा आणि भारतीय चित्रकलेला त्यांनी दिलेल्या योगदानाचा परामर्श घेणे हा स्वतंत्र विषय होईल. शिवाय तो विस्ताराने घ्यावा लागेल. इथे तो हेतू अभिप्रेत नसून संक्षेपाने त्यांच्या चित्रकलेच्या साधनेविषयीचे विवेचन करायचे आहे.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील युरोपीय तंत्र आणि वास्तववादी शैली यांचा प्रभाव असलेल्या ‘बॉम्बे स्कूल’ पठडीतील एक श्रेष्ठ गोमंतकीय चित्रकार आणि कलाशिक्षक म्हणून त्रिनिदाद ओळखले जातात. १८९५ मध्ये चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी जे. जे. स्कूलमध्ये ते दाखल झाले. १९१० ते १९२८ हा कालखंड त्रिनिदाद यांच्या कलाविकासाचा परमोच्च बिंदू होता. विविध माध्यमे आणि चित्रप्रकार त्यांनी हाताळले. निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण यांत त्यांना विशेष रस होता. धार्मिक विषयावरही त्यांनी काही चित्रे काढली आहेत. पण त्यांना खर्या अर्थाने दाद मिळाली आहे ती त्यांच्या तैलरंगातील व्यक्तिचित्रांना. सावळ्या देहरंगातील विविध रंगछटांमधील त्यांच्या नैपुण्याद्वारे त्यांच्या चित्रविषयांचे अस्सल भारतीयत्व अधोरेखित होते. या चित्रांवर डच शैलीचा प्रभाव जाणवतो.
आंजेला त्रिनिदाद या त्यांच्या कन्याही प्रख्यात चित्रकार होत्या. जे. जे. स्कूलच्या त्या पहिल्या स्त्री चित्रकार. वास्तववादी व्यक्तिचित्रे, तांत्रिक कलाचित्रे आणि ख्रिस्ती धर्मातील कथाचित्रे यांसाठी त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला. त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. तैलरंगातील युरोपीय तंत्राबरोबरच पारंपरिक भारतीय सौंदर्यशैलीचा त्यांनी अभ्यास केला.
अनंत आत्माराम भौंसुले यांचा जन्म रायबंदर येथे झाला. बालपणापासून मातीच्या गणपतीच्या मूर्ती करणे आणि रेखाचित्रे काढणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. यातून पुढे त्यांनी आपल्या कलेचा विकास केला. विसाव्या वर्षी त्यांनी मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केला. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होत असे. १९२८ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कला-शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्यावर तत्कालीन ब्रिटिश चित्रकारांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांतील रंगसंगती, रंगलेपन आणि छायाप्रकाश त्या काळच्या चैत्रशैलीला अनुसरून होता. ‘पोट्रेट पेंटिंग’ हा त्यांचा खास विशेष. त्यांनी काढलेली ग्लॅडस्टन सालोमन, पठाण आणि महात्मा गांधी यांच्या व्यक्तिचित्रणात रंगलेपनाच्या ताजेपणाचा स्पर्श आहे.
रघुवीर गोविंद चिमुलकर यांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या आयुष्यात आपल्या चित्रशैलीचे अनोखेपण सिद्ध केले. त्यातील आठ वर्षे आजाराशी तोंड देण्यात त्यांनी घालवली. पोंबुर्पा येथे जन्मलेल्या चिमुलकरांनी कांदोळीला आपले बालपण घालविले. गिरगावमधील चिकित्सक समूह या नामांकित शाळेत त्यांनी इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. ‘प्रार्थना समाज’जवळच्या कॉंट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये राहत असताना गोमंतकीय चित्रकार पुंडलिक घोटिंग यांच्या संपर्कात ते आले. त्यामुळे चिमुलकरांना चित्रकलेची गोडी लागली. एवढेच नव्हे तर त्यांच्यामार्फत जे. जे. स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळचे तेथील डायरेक्टर सॉलोमन यांच्या चित्रशैलीचा चिमुलकरांवर प्रभाव होता. काव्यात्म आणि गूढभाव आविष्कृत करणारी चित्रशैली हा चिमुलकरांचा खास विशेष. त्यांच्या अभिरूचीसंपन्न, शांत, संयम व्यक्तिमत्त्वाचे सारे गुणविशेष जसेच्या तसे त्यांच्या चित्रकृतीमधून साकार झालेले दिसतात. नाव न लिहिता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा त्या चित्रांत आढळून येते. त्यांना आणखीन आयुष्य लाभले असते तर आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्रात त्यांचे नाव गाजले असते. कला अकादमी, जुन्ता हाउस, विवेकानंद सोसायटी, गोवा राज्य संग्रहालयात चिमुलकरांची चित्रे पाहावयास मिळतात. काही चित्रे शशिकलाताई काकोडकर यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी आहेत. कविवर्य दा. अ. कारे यांच्या ‘नंदादीप’ या काव्यसंग्रहाला चिचिमुलकरांचे देखणे मुखपृष्ठ लाभलेले आहे.
प्रख्यात निसर्गचित्रकार प्रल्हाद अनंत धोंड यांनी ‘रापण’ या आपल्या आत्मचरित्रात रघुवीर चिमुलकरांची हृद्य व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे. ते म्हणतात, ‘‘चिमुलकरांच्या चित्रातील रेषा अत्यंत सफाईदार, गतिमान आणि तरल असत. पन्नास-शंभर मनुष्याकृतीचे रचनाचित्र करणे हा त्यांचा हाताचा मळ. ते वास्तववादी चित्रपद्धतीत काही फारसे चमकले नाहीत. पण भारतीय पद्धतीत मात्र त्यांनी आपली अगदी स्वतंत्र अशी खास चिमुलकरी शैली निर्माण केली…
आधुनिक जगामध्ये साल्वादोर दालीसारख्या अतिवास्तववादी कलावंताची भयानक स्वप्नसृष्टी चिमुलकरांच्या चित्रांतूनही एका वेगळ्या पद्धतीने येऊन गेली. त्या वस्तुस्थितीचा आता सार्थ अभिमान वाटतो.’
अन्जेलो दा फोन्सेका यांचा जन्म सान्तइस्तेव्ह येथे झाला. त्यांनी पाश्चात्त्य पद्धतीचे चित्रकला शिक्षण न घेता रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निसर्गचित्रे, मनुष्याकृती, परिसर, प्राणी, पक्षी आणि पौराणिक विषय घेऊन त्यांनी आपल्या चित्रकृती तयार केल्या. त्यांच्या चित्रांत बंगाल स्कूल, मुघल शैली आणि जपानी तंत्र यांचा प्रभाव दिसून येतो.
मंगेश केंकरे यांनी मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यांनी जलरंगांमध्ये निसर्गचित्रण करून त्यात स्वतःची खास शैली निर्माण केली.
लक्ष्मण पै यांचा जन्म मडगाव येथे झाला. शालेय शिक्षण घेताना त्यांचे मामा रामनाथ मावजे यांचा सहवास त्यांना लाभला. १७ व्या वर्षी मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पेन्सिल रेखाचित्रावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. १९४७ साली त्यांनी डिप्लोमा प्राप्त केला. १९४८ साली ते मयो मेडलचे मानकरी ठरले. दोन वर्षे जे. जे. स्कूल आर्टमध्ये अध्यापनकार्य केले. १९५१ साली नोकरी सोडून ते पॅरिसला गेले. तेथे त्यांनी मुद्राचित्रे आणि सिरॅमिक्समध्ये केलेली कामे पाहिली.
प्रारंभी लक्ष्मण पै यांच्या चित्रात गोव्याचा निसर्ग, परिसर, परिसरातील जनजीवनाच्या छटा, त्याचप्रमाणे देवळे, चर्चेस, सूर्य, चंद्र, समुद्राच्या लाटा आणि मासे इ.चे चित्रण आढळत असे. या ममत्वातून ‘माझा गोवा’ हे चित्र त्यांनी १९७५ मध्ये साकार केले. काळ्या रंगाचा वापर, लयदार रेषा, अलंकार-भूषणे, मत्स्य, फुले, पाने, मानवाकृती आणि रागावर आधारलेली चित्रे त्यांनी तयार केली. मुंबईच्या आर्ट गॅलरीत त्यांनी प्रदर्शने भरवली.
गोवा मुक्तीनंतर गोवा शासनाचे गोवा कॉलेज ऑफ आर्ट १९७२ साली सुरू झाले. प्रा. व्ही. के. पाटील यांनी पहिले प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाची धुरा वाहिली. या वर्धिष्णू संस्थेच्या वाढीसाठी त्यांनी द्रष्टेपणाने पावले टाकली. नंतर चित्रकार लक्ष्मण पै या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराचे नेतृत्व लाभल्यामुळे या संस्थेची सर्वांगाने वाढ झाली. ४० वर्षांची तिने यशस्वी वाटचाल केलेली आहे.
वासुदेव गायतोंडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांना चित्रकलेच्या शिक्षणाला घरातून विरोध असतानादेखील त्यांनी जे. जे. स्कूल आर्टमध्ये शिक्षण घेतले. १९४८ साली त्यांनी पेंटिंगचा डिप्लोमा घेतला. त्यांची सुरुवातीची चित्रे भारतीय चित्रशैलीत होती. रेखाचित्रांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. व्यक्तिचित्र आणि रचनाचित्रांत ते प्रख्यात चित्रकार शंकर पळशीकर यांचे अनुयायी होते. त्यांच्या चित्रशैलीवर पॉलवली आणि रेनॉल्ड या चित्रकारांचा प्रभाव होता. १९६४-६५ मध्ये त्यांना ‘अमेरिकन रॉकफेलर’ स्कॉलरशिप मिळाली. तेथील वास्तव्यात त्यांच्या चित्रांवर अमेरिकन चित्रशैलीची छाप पडली. त्यांची शैली बदलली. पातळ रंगलेपन रोलरने पेंटिंग नाईफ ब्रशशिवाय होऊ लागले.
भारतीय चित्रकलेमध्ये ‘अमृतशैली’ची सुरुवात वासुदेव गायतोंडे यांनी केली. त्यांच्या चित्रांत वेगवेगळ्या रंगाचे पोत, निरनिराळ्या पद्धतीची रंगसंगती आणि प्रकाश, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन असे आकार असत. त्यांच्या चित्रांमध्ये गूढ सौंदर्याचा प्रत्यय येत असे.
गोमंतकातील थोर चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म मडगावला झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर एकविसाव्या वर्षी ते मुंबईत आले. गिरगावमध्ये चित्रकार कातकर यांची चित्रशाळा होती. तेथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे घेतले. नंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी डिप्लोमा प्राप्त केला.
दीनानाथ दलाल यांचे चित्रकलेच्या क्षेत्रातील कार्य नेत्रदीपक आहे. तसेच वाङ्मयीन संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी व अभिरुची संपन्न करण्यासाठी केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. ‘दीपावली’सारख्या वाङ्मयीन नियतकालिकाची त्यांनी निगुतीने निगराणी केली. विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या साहित्यिकांची मांदियाळी निर्माण करून मराठीच्या मुख्य धारेतील वाङ्मयीन व्यासपीठ म्हणून ‘दीपावली’ मासिकाला प्रतिष्ठा मिळवून दिली. दीनानाथ दलाल यांची विविध शैलीतील चित्रे पाहणे हा एक आनंदानुभव होता. आनंद साधले यांच्यासारख्या समर्थ साहित्यिकाने संस्कृत साहित्यातील अभिजात ग्रंथाचा रसमयतेने परामर्श घेतलेला होता. मराठीतील अलीकडच्या वळणा-वाकणाचे प्रतिबिंब तितक्याच प्रभावीपणे ‘दीपावली’त पडलेले होते. १९४० ते १९७० या तीन दशकांत तर चित्रकार दीनानाथ दलाल या नावाची मोहिनी मराठी रसिकांवर पडलेली होती.
देखण्या मनुष्याकृती, तजेलदार रंग, लयदार रेषा, कुंचल्यांचे फटकारे, जलरंग आणि अपारदर्शक रंग यांचा साधलेला मिलाफ दीनानाथ दलालांच्या चित्रांत आढळतो. परंपरा आणि नवता यांचा स्वरसंगम त्यांच्या शैलीत आढळतो.
त्यांच्या प्रतिभासंपन्न कुंचल्याने मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींची मुखपृष्ठे न्याहाळल्यावर त्यांच्या कलासौष्ठवाबरोबरच मर्मदृष्टीचाही प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील कलाक्षेत्रात व साहित्यक्षेत्रात सेतू निर्माण करण्याचे कार्य दीनानाथ दलाल यांनी केले.
गोवामुक्तीपूर्वी गोव्यात चित्रकलेचे शिक्षण देणारी दोन-तीन खाजगी कलागृहे होती. त्यात शंकरराव मुळगावकर यांच्या कलागृहात कलाजिज्ञासू विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यापुरती सोय होती. शंकरराव मुळगावकर हे जसे चित्रकलेचे मार्गदर्शक होते, तसेच वाङ्मयाचा गाढा व्यासंग असलेले गृहस्थ होते. ज्याच्यावर त्यांची सारी भिस्त होती तो त्यांचा मुलगा चित्रकार प्रभाकर, चित्रकलेतली पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन व नावारुपाला येऊन अकाली वारला. शंकररावांचे तिसरे चिरंजीव चित्रकार रघुवीर मुळगावकर. मुंबईत चित्रकार एस. एम. पंडित यांच्या चित्रशाळेत रघुवीर मुळगावकरांनी प्रवेश घेतला. रंग, रेषा, रंगसंगती आणि संकल्पना यांचे प्राथमिक धडे घेतले. त्यांनी स्वतःची अशी शैली संपादन केली. रिऍलिस्टिक शैलीत पौराणिक, ऐतिहासिक विषयांवर त्यांनी विपुल चित्रे काढली; अमाप लोकप्रियता मिळवली.
फ्रान्सिस न्यूटन सोझा यांचा जन्म साळगाव येथे झाला. लहानपणापासून त्यांना चर्चेसबद्दल ओढ होती. साहजिकच त्यातील कोरीव काम, शिल्पकाम यांचा त्यांच्या चित्रशैलीवर प्रभाव पडला. ‘पॅरिस स्कूल’च्या प्रभावाखाली त्यांनी पुढच्या कालखंडात चित्रे तयार केली. नवचित्रकलेच्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व श्रेष्ठ दर्जाचे आहे. मानवी मनाच्या करुणा, क्रौर्य या आंतरिक प्रवृत्ती त्यांनी चित्रकृतीद्वारा रेखाटल्या आहेत. शिवाय स्थिरचित्रे, रचनाचित्रे, चर्चेस, निसर्गचित्रात वाकड्या झालेल्या इमारती इ. बाबींना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. प्रफुल्ल डहाणूकर या सिद्धहस्त चित्रकार. अन्य ललित कलांविषयी त्यांना तितकेच ममत्व वाटते. जे. जे. स्कूलमधील त्या हुशार विद्यार्थिनी. मुंबई, दिल्ली, कोलकाता, पॅरिस, गोवा आणि लंडन या ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत ५२ प्रदर्शने भरविली आहेत. गोव्याचा रमणीय निसर्ग, समुद्र, नारळीची झाडे, दगड, वृक्षराजी यांची चित्रे आणि त्यांची प्रतिबिंबे असे विषय घेऊन त्या चित्ररेखाटन करतात.
याशिवाय ज्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल ते चित्रकार म्हणजे शांताराम आमोणकर. विवेकानंद आर्ट सोसायटीतर्फे एलिमेंटरी व इन्टरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड (महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे) परीक्षेचे वर्ग चालत असत. ते वर्ग आमोणकर चालवीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकून गेलेले विद्यार्थी पुढे चित्रकार म्हणून नावारूपास आले. चंद्रकांत केरकर, त्यांचे सुपुत्र डॉ. सुबोध केरकर आणि सुकन्या हर्षदा केरकर यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केलेले आहे. डॉ. सुबोध केरकर यांच्या उपजत प्रतिभेचे मोल फार मोठे आहे. त्यांची कल्पकता आणि प्रयोगशीलता प्रशंसनीय आहे. कागद, रंग, कुंचला हेच त्यांचे माध्यम राहिलेले नसून निसर्गातील चिजा आणि साड्या यांचा ते ‘कॉम्पोझिशन’साठी आणि रंगसंगतीसाठी कलात्मक उपयोग करून घेतात. कलेचे हे नवे क्षितिज आहे.
चित्रकार उमाकांत भिसे यांचाही येथे आवर्जून उल्लेख करायला हवा.
गोवा कॉलेज ऑफ आर्ट स्थापन झाल्यानंतर ज्या नामवंत चित्रकारांनी तेथे अध्यापन केले आणि कुशल प्रशासक म्हणूनही काम पाहिले त्यात प्राचार्य दत्ता नावेलकर, प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, प्रा. सद्गुरू चेंदवणकर, प्रा. डी. हरिहर, प्रा. हमीद फरुकी, प्रा. दिगंबर सिंगबाळ, प्रा. राजीव शिंदे, प्रा. सौ. रोहिणी काकोडे आणि प्रा. महेंद्र चोडणकर इत्यादींचा समावेश आहे. वास्तविक पाहता यांतील प्रत्येकाचे कलादालन स्वतंत्र आहे. त्याचा परामर्श वास्तविक विस्ताराने घ्यायला हवा. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कॉलेज ऑफ आर्टमधून नव्या उन्मेषशाली चित्रकारांची पिढी घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी गोवा कॉलेज ऑफ आर्ट स्थापन झाले त्याचे हे उत्तम फलित आहे. निरूपा नाईक यांची चित्रे यादृष्टीने अभ्यासनीय वाटतात.
चित्रकार संजय हरमलकर पोटर्रेट पेंटिंगमध्ये कुशल आहेत. श्रीधर कामत बांबोळकर अनेकविध शैलीची चित्रे काढतात. निसर्गचित्रे हाही त्यांचा विशेष आहे. गोविंद नाईक यांची ‘कॅलिग्राफी’ उत्कृष्ट दर्जाची. अन्य प्रकारचीही चित्रे ते काढतात. बा. भ. बोरकरांच्या निसर्गविभ्रमांची तरल रंगांमध्ये त्यांनी पकडलेली बाकीचित्रे संस्मरणीय स्वरूपाची. उत्तम कवी, नाटककार असलेले विष्णू वाघ हे उत्तम चित्रकार आहेत. गोमंतकातील लोकपरंपरा आणि लोकधून यांची त्यांनी उत्कृष्ट चित्रे काढलेली आहेत. उत्तम चित्रकार आणि कलाशिक्षक असलेल्या चित्रकार चित्रसेन शबाब (य. बा. सुतार) यांनी चित्रकला आपल्या काव्यकलेत मुरवून घेतलेली आहे. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांनी जोपासलेला चित्रकलेचा छंद या संदर्भात आठवावासा वाटतो.
गोमंतकाच्या चित्रकलेच्या वारशाची ही प्रातिनिधिक झलक. हा मागोवा घेताना अनेक नामवंत चित्रकारांचा उल्लेख राहून गेल्याची शक्यता आहे. पण गोमंतकाच्या निसर्गाचे आणि संचिताचे चित्रकलेसारख्या वैश्विक माध्यमातून ज्यांनी ज्यांनी प्रतिभादर्शन घडविले त्यांचा पूर्वसुरींची वाट पुसत करून दिलेला हा संक्षिप्त परिचय. हे समग्र दर्शन नव्हेच नव्हे.
संदर्भ :
१) कलात्म गोमंतक – गोपाळकृष्ण भोबे, कला अकादमी, गोवा. पणजी, १९७२
२) असा आहे माझा गोमंतक – गोपाळकृष्ण भोबे, न. पु. सुकेरकर, सरचिटणीस, महाराष्ट्र साहित्य संमेलन, अधिवेशन ४५ वे, मडगाव १९६४
(गोमंतवैखरी- कोकण मराठी परिषद – स्मरणिका. अ. भा. मराठी साहित्य-संस्कृती संमेलन – १४ ते १७ जानेवारी, २०१०)
३) ‘गोमंतकीय चित्रकार’- प्रा. सद्गुरू चेंदवणकर.
४) गोवापुरी- इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजी, ऑक्टोबर-डिसेंबर २०१०.