तेजपूर येथील आसाम व्हॅली स्कूलच्या मैदानावर कालपासून सुरू झालेल्या कूच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याने मेघालयचा पहिला डाव १५४ धावांत संपवला. दिवसअखेर गोव्याने ५ बाद १२६ धावा केल्या असून २८ धावांची पिछाडी भरून काढण्याचा गोव्याचा प्रयत्न असेल.
गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अष्टपैलू मोहित रेडकर याने भेदक मारा केला. डावातील १६व्या षटकात त्याने मृणाल व जॉयदीप यांना माघारी धाडले. ऋत्विक नाईकने दिव्यांश व थापा यांना भोपळाही फोडू न दिल्याने मेघालयची बिनबाद ३५ वरून ४ बाद ४० अशी घसरगुंडी उडाली.
दुसरा सलामीवीर ऋतिक शर्माला बाद करत मोहितने आपला तिसरा बळी घेतला. मेघालयचा संघ ५ बाद ५९ असा संघर्ष करत असताना गोव्याच्या संघाला शेपटाचा तडाखा बसला. बिबेक (४७), सुधीर (१६), बिपीन (२२) यांनी उपयुक्त योगदान देत संघाला दीडशेपार नेण्यास मदत केली.
गोवा संघाकडून मोहित सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २३ धावांत ४ गडी बाद केले. ऋत्विकने ३७ धावांत ३, राहुुल मेहताने ३० धावांत २ तर हर्ष जेठाजीने १ गडी बाद केले.
मेघालयला लवकर गुंडाळल्याचा फायदा गोवा संघाला उठवता आला नाही. राहुल मेहता (३), योगेश कवठणकर (१) हे आघाडीचे फलंदाज तसेच अष्टपैलू मोहित (०) यांनी निराशा केली. कौशल हट्टंगडीने ४४ धावांचे योगदान दिले.
दिवसअखेर आयुष वेर्लेकर ३० व ऋत्विक नाईक १६ धावांवर खेळत होते.