नाताळनिमित्त राज्यभर उत्साहाची धूम

0
132

‘मेरी ख्रिसमस’ असे म्हणत नाताळसणाच्या पर्वाला काल बुधवारी राज्यभरात उत्साहाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी रात्री १२च्या ठेक्याला विविध चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व ख्रिस्ती बांधवांनी या प्रार्थनासभांना हजेरी लावली होती. वास्कोतील टिळक मैदानावर यंदा सेंट ऍण्ड्र्यू चर्चला ४५० वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने महाप्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नाताळनिमित्त राज्यातील पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा पेडणे आदी महत्त्वाच्या शहरी भागात तसेच इतर जवळपासच्या भागात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. स्टार, विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री सजावटीचे विविध साहित्य, येशू जन्माचा देखावा दाखवणारे लहान मोठ्या आकाराचे गोठे दृष्टीपथास पडत आहेत. तसेच चर्च परिसरातही येशू जन्माचे सुंदर देखावे दाखवण्यासाठी खास गोठे तयार केले आहेत.

काही ठिकाणी गोठा तयार करण्याच्या स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आल्या आहेत. मंगळवार मध्यरात्रीपासूनच मित्रपरिवारांवर नाताळाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. ख्रिश्‍चन धर्मिंयाबरोबरच सर्व धर्मिय लोकांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील सहा ते सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नववर्षानिमित्त राज्यात धुमधडाका सुरू राहणार आहे.