गोवा-चेन्नईन संघ आज आमनेसामने

0
109

एफसी गोवा आणि चेन्नईन एफसी या दोन मातब्बर आणि बहरात असलेल्या संघ आज हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर आज आमनेसामने येणार आहेत.

चेन्नईनचा संघ अलिकडे चांगल्या फॉर्मात आला आहे. गेल्या चार सामन्यांत ते अपराजित आहेत. दोन बरोबरी आणि दोन विजय अशी त्यांची कामगिरी आहे. नवे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा फॉर्म अखेर उंचावला. पहिल्या चार सामन्यांत त्यांना केवळ एकच गुण मिळविता आला होता. चेन्नईन आठव्या स्थानावर असून जिंकल्यास ते सहावे स्थान गाठू शकतील, पण हे आव्हान सोपे नसेल.
कॉयल यांनी सांगितले की, आम्ही एका अप्रतिम संघाचा सामना करीत आहोत.

गोव्याने गुणवत्तेच्या बळावर अव्वल स्थान मिळविले आहे. माझ्या दृष्टीने हा संघ देशात सर्वोत्तम आहे. गुणतक्ता खोटे चित्र दाखवत नाही. त्यांचे इतरांपेक्षा जास्त गुण आहेत, कारण त्यांच्याकडे दर्जा आहे. आम्हाला त्यांचा आदर वाटतो, पण भीती नाही.
गोवा संघही चांगल्या फॉर्मात असून त्यांचे नऊ सामन्यांत १८ गुण आहेत. त्यांनी तीन सामन्यांत विजयाची मालिका राखली आहे. मागील सामन्यात त्यांनी ओदिशा एफशीला ३-० असे हरविले. पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्याची संधी म्हणून गोवा या लढतीकडे बघेल.

चेन्नईनचा स्टार फॉरवर्ड नेरियूस वॅल्सकीस आपला फॉर्म कायम राखेल अशी कॉयल यांची अपेक्षा असेल. लिथुआनियाच्या कॉयलने गेल्या चार सामन्यांत पाच गोल केले आहेत. क्रमवारीत तो तिसरा आहे. संघाचे ६२.५ टक्के गोल त्याने केले आहेत. यावरून संघाचा तो आधारस्तंभ असल्याचे दिसते. असे असले तरी बरेच काही लालियनझुला छांगटे याच्या कामगिरीवरही अवलंबून असेल. त्याने मागील सामन्यात केरला ब्लास्टर्सविरुद्ध मोसमातील खाते उघडले.
त्याचा वेग आणि क्षमता बचाव भेदणारी आहे. त्यामुळे चेंडूवर ताबा ठेवणारा गोव्याविरुद्ध भक्कम बचावासाठी कॉयल यांची त्याच्यावर मदार असेल. प्रतिआक्रमणात तो उपयुक्त ठरेल.

कॉयल यांनी सांगितले की, ब्लास्टर्सविरुद्ध केला तसा खेळ केल्यास तीन गुण मिळवू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. उद्या आक्रमक शैलीचे दोन संघ जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. आम्ही आतूर असून जिंकू शकतो असा विश्वास वाटतो.
चेन्नईनला सेट-पीसवरील कामगिरी सुधारण्याची गरज असेल. याबाबतीत बचाव तसेच आक्रमणातही ते झगडत आहेत. त्यांना सेट-पीसेसवर एकच गोल करता आला आहे, तर त्यांच्याविरुद्ध १२ पैकी चार गोल सेट-पीसेसवर झाले आहेत.
दुसरीकडे गोवा सेट-पीसेसवर बराच परिणामकारक ठरला आहे. सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाविरुद्ध अशा पद्धतीने एकच गोल झाला आहे. हेच आक्रमणात मुर्तडा फॉल आणि कार्लोस पेना हे सेट-पीसेसवर प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादायक ठरलेले आहे.
चेन्नईनच्या बचाव फळीसमोर गोव्याची आघाडी फळी बरेच आव्हान निर्माण करेल. फेरॅन कोरोमीनास दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर चांगल्या फॉर्मात आला आहे. त्याने सहा गोल केले आहेत. ब्रँडन फर्नांडीस आणि ह्युगो बौमास त्याला चांगली साथ देत आहेत. संघाने संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्याचे प्रमाण वाढवावे अशी मात्र लॉबेरा यांची अपेक्षा असेल.

लॉबेरा यांनी सांगितले की, ओधीशाविरुद्धच्या लढतीनंतर मी सांगितले होते की आम्हाला चुका टाळून सुधारणा करावी लागेल. पुढील सामन्यात शंभर टक्के कामगिरी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्या प्रशिक्षकांमुले चेन्नीनच्या संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. ते आणखी चुरशीने खेळतात. आक्रमण आणि बचावात त्यांचे संतुलन चांगले आहे. हा सामना आमच्यासाठी सोपा नसेल.
चेन्नईनच्या बचाव फळीला एली साबियाची उणीव जाणवेल. तो निलंबित आहे. त्यामुळे आव्हान खडतर असेल. याशिवाय चेन्नईत गोव्याचे रेकॉर्ड उत्तम आहे. साखळीत येथील पाच पैकी चार सामने त्यांनी जिंकलेले आहेत. याशिवाय मोसमाच्या प्रारंभी गोव्यात झालेल्या ०-३ अशा पराभवाचे कोणतेही दडपण न घेण्याचे आव्हान चेन्नईनसमोर असेल.

गोवा-चेन्नई संघादरम्यानची ठळक वैशिष्ठ्ये
एफसी गोवा-चेन्नईन एफसी संघ इंडियन सुपर लीगमध्ये १५वेळा आमनेसामने ठाकले. त्यापैकी एकही सामना गोलशून्य बरोबरीत संपला नाही. केवळ एक सामना गोलबरोबरीत संपला होता. जर आज एफसी गोवाने चेन्नईन एफसीवर मात केली तर ते आयएसएलच्या इतिहासात दुसर्‍यांदा सलग चार सामने जिंकण्याची संधी आहे. गोव्याने यापूर्वी स्पर्धेच्या शुभारंभी पर्वात अशी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी पुणे एफसी सिटी, केरला ब्लास्टर्स, नॉर्थईस्ट युनायटेड आणि चेन्नईन एफसी संघावर मात केली होती. गेल्या चार लढतीत एफसी गोवाने चेन्नईन एफसीवर वर्चस्व राखले आहे. एफसी गोवाने मरिना अरेनावर७ लढती खेळल्या आहेत. त्यापैकी गोव्याने गेल्या पाच लीग लढतींपैकी चारमध्ये विजय मिळविलेला आहे. केवळ २०१६मध्ये त्यांना लीग सामन्यात चेन्नईनकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागले होते. तर त्यानंतर २०१८मध्ये उपांत्य फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये त्यांना चेन्नईनने पराभूत केले होते.
गोव्याने चेन्नईनवर ९ पैकी ६ सामन्यांत विजय मिळत आयएसलमध्ये वर्चस्व राखलेले आहे. केवळ १ सामना बरोबरीत संपला आहे.