फेडरेशन संघात सानियाचा समावेश

0
110

दुहेरीतील भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिचे भारताच्या फेडरेशन कप संघात तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन झाले आहे. एकेरीतील भारताची आघाडीची खेळाडू अंकिता रैना हिचादेखील या संघात समावेश आहे. २०१६ साली सानियाने शेवटच्या वेळी फेडरेशन कपमध्ये सहभाग नोंदविला होता. ऑक्टोबर २०१७ पासून ती स्पर्धात्मक टेनिसपासून दूर आहे. विवाहानंतर कुटुंबाला वेळ देण्यासाठी तीने दोन वर्षांचा ‘ब्रेक’ घेतला होता. रिया भाटिया (३७९), ऋतुजा भोसले (४६६) व करमन कौर थंडी (५६८) हे त्रिकुटही भारतीय संघात आहे. डब्ल्यूटीए क्रमवारीत १८०व्या स्थानावर असलेला अंकिता व इतरांमधील अंतर बरेच आहे. भारताचा माजी डेव्हिस कप खेळाडू विशाल उप्पल संघाचा कर्णधार असेल. फेडरेशन कपमधील माजी खेळाडू अंकिता भांब्री भारताची प्रशिक्षक असेल. राखिव खेळाडू म्हणून सौजन्या बाविसेट्टी हिची निवड करण्यात आली आहे. सानिया ११ ते १८ जानेवारी या कालावधीत होणार्‍या होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणार असून जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर असलेली युक्रेनची नादिया किचेनोक तिची जोडीदार असेल. सानियाच्या नावावर दुहेरीतील सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे असून यातील तीन मिश्र दुहेरीतील आहेत.